Wednesday, June 11, 2008

शीएमचा आल्बम

परधानजी, राज्याची काय हलवाहलव हाये?
म्हाराज, सम्दं ठिक हाय. चोर तेवढं चोऱ्या करत्यात. दरोडेखोर तेवढं दरोडं घालत्यात. पेपरवाले कायबाय लिव्हत्यात, लोकं वाचून इसरून जात्यात. बाकी सम्दं आलबेल हाये....

अशा आलबेल वातावरणात आबा पाटील मात्र खिन्नपणे आपल्या केबिनमध्ये बसलेले होते. त्यांच्या (देशी) डोळ्यांत विषण्णता दाटलेली होती. वेलदोडे खाऊनही तोंडाला चव नव्हती. समोर मटापासून संध्यानंदपर्यंत विविध पत्रांचे चघाळ पडलेले होते. पण आबांचे लक्ष त्यात नव्हते. राज्याच्या इतिहासाची पराणी आबांच्या मनाला टोचत होती. डीसीएम सीएम बनत नाही, हा इतिहास आपण सांगितला खरा. पण आता तोच बैलाच्या कानाला गोमाशी चावावी तसा काळजाला डाचत होता.
तेवढ्यात केबिनचं दार ढकलून चित्कलाबाई आत आल्या.
टेबलावरची वृत्तपत्रं पाहून त्या म्हणाल्या, "आबा, वाचली ना ती बातमी?''
"कोणती? दरोड्याची?''
"तुमचं बाई काईतरीच! अवो, ती नै का ती अल्बमची...''
"कोणत्या अल्बमची? आता लग्नाच्या आल्बमच्या बातम्यासुद्धा पेपरात यायला लागल्या काय? बघू बघू.,'' असं म्हणत आबांनी मटाला हात घातला. अशा बातम्या दुसरं कोण छापणार, असं म्हणत मटाकडे पाहता पाहता त्यांना तिथल्या तिथे एक कवन सुचले (ही त्यांची महाविद्यालयातली फुटाणी सवय. तंबाखूबरोबरच जडलेली.) : "किती छान हा कागद । किती देखणी छपाई ।। आत मांडलेत बाबा । वर टांगलीय बाई ।।' हे गुणगुणत ते नेहमीप्रमाणे स्वतःवरच खुश होत होते, तेवढ्यात बाई कृतक्‌कोपाने म्हणाल्या, "छे बाई, तुमाला काईच माईत नसतं... अहो, सीएमसाहेबांचा अल्बम येतोय. गाण्यांचा!''
"आं'', आबा अवाक्‌.
"हो. ही बघा ना बातमी. आणि हा आमचा इंटेलिजन्स रिपोर्ट. त्या बातमीवरूनच बनवलाय,'' बाई म्हणाल्या, "तुमच्यावर एक सिनेमा येतोय ना, म्हणून सीएमसाहेबांवर एक आल्बम काढणार आहेत.''
"अहो पण काढणार कोण तो आल्बम? रितेश?''
त्या अभिषेकच्या नादानं रितेशनं नसतं खूळ भरवलेलं दिसतंय सायबांच्या मनात. मावळात शेती करायची सोडून ते बापलेक नाचत्यात पिक्‍चरमध्ये. त्यांचं बघून रितेशनीबी डॅडींना नाचवलं असनार आल्बममध्ये.
"नै बाई. तो नाही. आम्ही सगळा पंचनामा केलाय.'' गृहखात्यात आल्यापासून बाईंची राजभाषा भल्तीच बदललीय. "आमच्या रिपोर्टनुसार काल व्हाईट हाऊसमध्ये सीएमसाहेब, काकाजी उल्हास पवार आणि लोकमुद्राकार कपिलजींची एक बैठक झाली. त्यात हे ठरलं.''
"व्हाईट हाऊसमध्ये? कुठं पुण्यात, रोहिणीच्या हापिसात? पोराचं लग्न काढलंय की काय त्यांनी?''
""छे बाई, तुमाला काईच माईत नसतं. साहेबांना दृष्टी आलीय ना, तेव्हा त्यांनी सामान्य प्रशासनातून नामांतराचा जीआर काढलाय. "वर्षा'ला आता "व्हाईट हाऊस' म्हणायचं.'' बाई पदरात तोंड लपवत खुखु हासत म्हणाल्या.
""असाहे का ते? बरं मग काय झालं त्या बैठकीत?'' आबांनी डोळे नेहमीप्रमाणे लहान-मोठे करीत विचारले.
""तिथं किनई असं ठरलं म्हणे... म्हंजे आमचा अहवाल अजून किनई पूर्ण व्हायचाय, पण त्याचे सॅलिएंट फीचर्स सांगते... की कोणी गाणी लिहायची, कोणी गायची असं सगळं ठरवलं बाई त्यांनी तिथं.''
""कोण लिहिणारे गाणं?''
""कोण काय? कपिलजी!''
आबांना कोणीतरी सांगितलेलं आठवलं, छात्रभारतीत तो काय गाणी म्हणायचा... युग की जडता के खिलाफ एक इन्किलाब है वगैरे. त्यातली निम्मी सरफरोशी की तमन्ना महानगरात गेली, निम्मी दिनांकात. बाकी मग सगळ्या साथींचं होतं तेच झालं. साथी "हात' बढाना...
बाई सांगतच होत्या, ""लोकगीत लिहिलंय म्हणे त्यांनी सीएमसायबांवर...
इंटरनॅशनल डोले तुजे कोल्याचे जाले
जाल्यात मी कुनाच्या गावायचा नाय...
आणिक त्याला संगीतबद्ध कुणी केलेय ठाऊकै का?''
""नाही.''
""मलाही माहित नाही,'' बाईंनी गृहखात्याला न शोभणारी प्रांजळ कबुली दिली, ""पण कोणीतरी पत्रकारच असेल बघा.''
""सगळेच पत्रकार काही तसे नाहीत. परवा लोकसत्ताने कसं ठोकलं त्यांना पाहिलं ना?'' आबा म्हणाले.
""ते त्या प्रधानजींचं काम. वुमन हेटर कुठले!'' बाईंना प्रधानांची ही बाजू कुठून कळली कोण जाणे?
""अहो पण मटानेसुद्धा सगळं बैजवार दिलं होतंच की!''
""बाई बाई किती हो भोळे तुम्ही! ती साप भी मरे आणि लाठी भी ना टुटे अशी पत्रकारिता होती. सीएमची सगळी प्रश्‍नोत्तरं छापून त्यांनी जो मेसेज जायला हवा तो दिलाच की!''
""मग नक्की तो प्रताप त्यांचाच.'' आबांना का कोण जाणे पण आनंद झाला!
""पण हे पत्रकार मुळात वाईट्टचं असतात बाई. आपल्या खात्यात थोड्या बदल्या केल्या तरी लगेच काहीच्या काही छापतात म्हणे,'' बाईंना अजून खातं नवं असल्याने बऱ्याच गोष्टींचा अंदाज यायचा आहे.
""हो ना,'' आबा पुन्हा खिन्न झाले. मग उसळले, ""आमच्या बदल्यांच्या बातम्या छापता. आणि त्यांचं कोण छापणार? परवा त्या लोकमतमध्ये एवढ्या बदल्या झाल्या. गुन्हेवार्ताहर चक्क मंत्रालयात पाठवला त्यांनी. कोण काय बोललं त्यांना?''
""ही गंभीर बाब आहे,'' बाई एकदम सिरियस झाल्या, ""यात काही तरी गडबड असणार बघा. क्राईम रिपोर्टरला मंत्रालयात पाठवतात म्हणजे याचा अर्थ काय? मी बरोबर छडा लावते याचा.''
आबांना मोठीच गंमत वाटली. ते म्हणाले, ""कसा काय लावणार पण तुम्ही छडा?''
त्यावर बाईंनी समोरची कागदपत्रं उचलली. त्यांची लाटण्यासारखी सुरनळी केली. आणि जाता जाता त्या म्हणाल्या, ""साहेब, तुम्ही वेलदोडे खातो असं सांगता. पण कोणी नसताना गुपचूप तंबाखूचा बार भरता हे सिक्रेट जसं आम्हाला कळलं ना अगदी तसाच याचाही छडा लावू! अखेर पत्रकारांची बिंगं काय! कधी ना कधी फुटतातच!!''

Wednesday, June 4, 2008

सुसंगती सदा घडो, सुजनवृत्त कानी पडो...

हाथरूणात उन्हे शिरली अन्‌ आम्ही उठलो. हाती मशेरी घेतली. दूरचित्रवाणीसंच लाविला. आमची आवडती वाहिनी म्हणजे इंड्या टीव्ही! रामसे बंधु पिक्‍चरवाले, "नगिना'कार हरमेश मल्होत्रा, डेव्हिड धवन प्रभृतींना एकसमयावच्छेदेकरून पाहण्याचे भाग्य आम्हांस तेथे लाभते! आताही प्रातःसमयी तेथे ब्रेकिंग न्यूज सुरूच होती. - "नागिन से शादी!'
ते पाहताच आम्ही चमकलोच! मुदपाकखान्यात नजर टाकिली. मनीं म्हटले, असे कार्येक्रम आपण पाहतो हे आत समजले तर गहजब व्हायचा! ही वृत्तवाहिनी खरे तर लेट नाईटच पाहावी!
त्या सरीसृपवंशीय प्राण्यांच्या वैवाहिक आयुष्याचा राष्ट्रभाषिक हैदोसदुल्ला जोरात सुरू होता. मनीं म्हटले, एखाद्याला नागिण हीच जर त्याची राखी सावंत वाटत असेल, तर आपण बातमी देण्यापलीकडे काय करणार?
ते भूतां परस्परे जडलेले मैत्र जीवांचे एका डोळ्याने अवलोकितानाच दुसऱ्या डोळ्याने आमचे वृत्तपत्रवाचनही सुरू होते. हे आम्ही खास कमावलेले योगसामर्थ्य! कचेऱ्यांतील राजकारणात बहुउपयोगी! एक डोळा संगणकाच्या पडद्यावर, दुसरा संपादकांच्या केबिनमध्ये कोण जाते-येते यावर, या सवयीच्या योगे हे सामर्थ्य प्राप्त होते!
असो. मशेरी लावताना आम्ही नेहमीच असे भरकटतो!

तर मुद्दा असा, की येणेप्रकारे आमचे पाहणे व वाचणे व लावणे सुरू असताना अचानक आमच्यासमोर कुंद काही धुरकटले! दृष्टी उर्ध्वात गेली! मेंदूला पहिल्याच पेगात येतात तशा मुंग्या आल्या! आणि...
... आणि समोर शनिवारवाड्याची मागची बाजू अवतरली. सकाळवाड्याच्या भव्य नेपथ्यावरील नाट्य आमच्या चर्मचक्षुंसमोर उलगडू लागले. पाहतो तो समोर साक्षात्‌ संभाजी महाराजांचा पार्टी!
तोच गोरापान चेहरा. तोच कपाळावरून मागे सरकलेला कुरळा कोंबडा. तीच सरळ नासिका. तेच लालचुटूक ओठ. त्यावर तेच खिरे-खुरे उद्वेगी हास्य! डिट्टो कॉन्वहर्जन्सकेसरी!!
पाहता पाहता त्यांनी कंसात लेखणी उपसून स्वगत सुरू केले. -
""मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना? वडवानलाने समुद्र तर प्राशन केला नाही ना? लोकमतचा सेल तर वाढला नाही ना? मग आम्हीच का बरे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मागे लागून अनावश्‍यक आणि अतिरंजित वृत्तांकन करावे? निघेल तेव्हा निघेल. पण आम्ही आमची वाहिनी काढू आणि तिच्या मागे लागू!... नाही आबासाहेब, नाही. यापुढे पहिल्या पानी आम्ही अनावश्‍यक आणि अतिरंजित बातम्या कदापि छापणार नाही...''

अचानक नभोवाणी व्हावी तसा आवाज आला - "अहो दात घासताय की मोरी? किती वेळ लावताय?' ही आमची औरंगजेब. तिच्या त्या नर्मकर्कश प्रेमकुजनाने आमच्या नजरेसमोरील धुंद एकदम दूर झाले.
चूळ भरता भरता आमच्या लघुगुरू अशा दोन्ही मेंदूंनी आम्ही विचार करू लागलो.
आपण भल्यासकाळी असे कोंडुऱ्यात कसे सापडलो? मशेरी जास्तच कडक होती की पेपरातच काही गारूड होते?
म्हणून पुन्हा ते पत्र हाती घेतले. तर त्याच्या पहिल्याच पानी एक चौकट. - "... या प्रकारच्या (पक्षी ः अनावश्‍यक आणि अतिरंजित) वार्तांकनापासून दूर राहण्याचा निर्णय "सकाळ'ने घेतला आहे; त्यामुळे गुन्हेगार ठरविलेल्या संजय दत्तबाबतच्या बातम्या आतील पानात प्रसिद्ध करण्याचा निर्णय "सकाळ वृत्तपत्र समुहा'ने घेतला आहे. - कार्यकारी संपादक.'

मुंबै सकाळमधील ही चौकट वाचून आम्हांस अगदी गदगदून आले!
श्‍वासनलिकेत हुंदका दाटला! पापण्यांचे केस ओलावले!
केवढी ही विधायकता!
केवढी ही वाचकाभिमुखता!
केवढी ही निरागसता!!

योग्य आणि बरोबरच आहे त्यांचे!
काय म्हणून सभ्य-सुसंस्कृत विधायक वाचकांनी वाचायच्या त्या तुमच्या गुंडा-पुंडांच्या बातम्या, पुढाऱ्यांचे कलगीतुरे, नट्यांचे नखरे, भामट्यांच्या भानगडी अन्‌ कुलंग्यांची कुलंगडी?
हाच कित्ता सर्व वृत्तपत्रांनी गिरविला तर...?

आणि आम्हांस विविध वृत्तपत्रांची निरागस गोंडस स्वच्छ सुंदर आवश्‍यक व नरंजित बातम्यांनी विनटलेली पहिली पाने दिसू लागली.
अहाहा! ओहोहो!!
काय ते पेपर, काय ती पाने...
कोरी करकरीत!!!
फक्त जाहिराती.
त्याही केवळ वुडवर्डस्‌ ग्राईपवॉटरच्या!
""काय झाले? बाळ रडत होते...
अगं मग त्याला दोन थेंब पगारवाढ का देत नाहीस?
तू उपसंपादक असताना तुलाही मी हेच दिले होते...'' अशा.

पण स्वप्ने कशास पाहावयाची?
आजचेच वास्तव पाहा ना!
मुंबै सकाळच्या पहिल्या पानावर आहेत फक्त आवश्‍यक व नरंजित बातम्या.
नक्षलवादी जेरबंद, मित्राकडून हत्या, संप अटळ....
अहाहा! ओहोहो!
किती धोरण-सुसंगत! किती विधायक!

आमच्या (व सर्क्‍युलेशन मॅनिजरांच्या) मनीं आले, ही अशीच सुसंगती सदा घडो, सुजनवृत्त कानी पडो!
तथास्तु!!

Sunday, June 1, 2008

कविता : एक विणे!

हम आह भी भरते हैं
तो हो जाते है बदनाम
वो कविताभी करते हैं
तो चर्चा नही होता...

आम्हांस एक कविता काय झाली अन्‌ जणू काही सकाळमध्ये एक्‍स्‌क्‍स्युजिव्ह बातमी प्रसिद्ध झाली असा गदारोळ झाला! (आता कविता म्हणजे काय व झाली म्हणजे काय असे तुम्ही विचाराल. तर कविता म्हणजे एरवी सरळ लिहावयाच्या ओळी मध्येच कुठेही तोडून एका खाली एक लिहिल्या की जे होते त्यास कविता म्हणतात! आय ऍम राईट ना, संजीवजी खांडेकर?) पण यात आमची काडीमात्र चूक नाही! पत्रकार म्हटला की त्याला काही दोष-दुर्गुण आपोआपच चिकटतात. एक म्हणजे तो स्वतःला विकिपेडिया समजू लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाने भरण्यासाठी "लळीत' वगैरे लिहिता लिहिता कविता पाडू लागतो. (आता कविता पाडणे म्हणजे काय असे तुम्ही विचाराल, तर काही काहींना म्हणे असे असते, की आधी पाऊस पडतो आणि मग जंत पडावा तशा कविता पडतात! त्याला 'पाऊसवेणा' म्हणतात!)

पत्रसृष्टीला ही कविताकारांची लागण फार पूर्वीपासूनची आहे. पण पूर्वी एक बरे असायचे, की तेव्हाचे कविताकार थोर थोर तरी असायचे. उदाहरणार्थ एकेकाळी सकाळमध्ये कुसुमाग्रज (पक्षी : वि. वा. शिरवाडकर) होते. (पण तेही नाही टिकले! आता ते टिकले नाही, म्हणजे काय असे तुम्ही विचाराल, तर त्याचाही एक थोर किस्सा आहे. थोर संपादक नानासाहेब परूळेकर यांनी शिरवाडकरांना सांगितले होते, की "तुम्हाला सरळ लिहिता येते हे एकच तुमचे क्वालिफिकेशन मानतो!' तर बहुधा शिरवाडकरांना सरळ लिहिता न आल्याने त्यांनी सकाळ सोडला असावा! असो.)

तर बहुधा या प्रसंगाचा धडा घेऊन तमाम कविताकार जे भूमिगत झाले ते झालेच! (आता भूमिगत झाले म्हणजे काय, असे तुम्ही विचाराल तर हे कविताकार हल्ली फक्त छायाचित्र ओळी यांसारख्या माध्यमातूनच प्रकट होतात व एरवी एखाद्या पानगृहात बसून बेसावध सहकाऱ्यांना पीळ मारतात!) तर अशा या भूमिगत कविताकारांचा शोध घेण्याची एक दंशमोहिम (पक्षी ः स्टिंग ऑपरेशन) आम्ही आमच्या बहिर्जी नाईक्‍सच्या साह्याने नुकतीच पार पाडली. आणि अहो आश्‍चर्यम्‌! ज्यांचा कुणाला संशयही येणार नाही, असे बोरूबहाद्दरही कविता रचत असल्याचे आम्हांस आढळून की हो आले!!
पेश करीत आहोत त्यातील काही निवडक कविता -

तर आमच्या पहिल्या कविताकाराचे नाव आहे चंदुअंकल कुलकर्णी! ठाण्यातील लोकसत्ताच्या कार्यालयात ते एकदा गेले असता त्यांना सदरहू कविता स्फुरली असा प्रवाद आहे. ते लिहितात :
""मी येतोऽऽऽ आणिक जातोऽऽऽ
येताना कधी चॉकलेट आणितो...
आणि जाताना टिफिन मोकळा नेतोऽऽऽ...
येतोऽऽऽ आणिक जातोऽऽऽ''


"जय महाराष्ट्र'कार साथी प्रकाश अकोलकरांचे काव्य त्यांच्या प्रकृतीला साजेल असेच शायरीबाजाचे असते. त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये अनेक कविता असल्याची चर्चा प्रेस क्‍लबमध्ये आहे. परवा म्हणे त्यांनी प्रेस क्‍लबमध्ये ही कविता सादर केल. सुदैवाने तेव्हा त्यांच्याकडे अन्य कोणाचे नसले, तरी आमच्या बहिर्जी नाईक्‍सचे लक्ष होते. ते गात होते. -
"जै जै महाराष्ट्र घ्या ना, जै जै महाराष्ट्र घ्या ना...
पुस्तक आमुचे किती मोलाचे, शिवसेनेच्या इतिहासाचे
कन्सेशन त्यां कसले मागता विकत घेऊनी वाचा ना...''
(वास्तविक साथी प्रकाशभाईंनी आपले हे पुस्तक अनेकांना तसेच दिले असल्याचीही आमची माहिती आहे. पण लोकांना कदर आहे का कशाची?)

आमचे पुढचे कविताकार आहेत समस्त कास्तकारांचे तारणहार क्रांतिवीर निशिकांतजी भालेराव! कवितेचे नाव आहे ः "जट्रोफाचा मळा'
"जट्रोफाच्या मळ्यात कोण गं उभी
ऍग्रोवन वाचिते मी रावजी
रावजी, पेपर काढण्यापरी वो आमची शेती बरी...
द्राक्षाची गं तु चांदणी
भरला बांधा केळीवाणी
मंजुळा, इव्हेंट करू एखांदा गं तुझ्या बांधावरी!''
(सकाळने भरविलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये त्यांना हे काव्य सुचले असे सांगणारे सांगतात! त्यांच्या "ग्रीनहौस पुरवा महाराज, मला आणा इस्त्रायली साज...' या कवितेला यंदाचा जैन ठिबक सिंचन पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आमचे बहिर्जी नाईक्‍स कळवितात.)

कविता आणि प्रेमभावना यांचा अन्योन्य (जैसा पत्रकार आणि पाकिट!) संबंध आहे. पण बोरूबहाद्दरांचा मात्र या भावनेवर फारसा विश्‍वास दिसत नाही. (त्यांचे लफड्यावर अधिक प्रेम!) परवा तर सकाळच्या एका लहानखुऱ्या महिला पत्रकाराने मुंबईतल्या कुठल्याशा किल्ल्यावर प्रेमकूजन करीत बसलेल्या जोडप्यांना चांगलेच घाबरवून सोडले! (म्हणून आम्ही मुलींना सांगतो, की मुंबई सकाळमध्ये जाऊ नका. अकाली म्हाताऱ्या व्हाल!!) असो. तर असे असले, तरी आमच्या बहिर्जी नाईक्‍सच्या म्हणण्यानुसार अनेक पत्रकार लपूनछपून प्रीतीकाव्यही लिहित आहेत. त्यातलीच ही एक विदग्ध कविता. शीर्षक आहे - "क्राईम रिपोर्टरची कविता'
तुझं खळबळजनक चालणं
तुझं सनसनाटी पाहणं
तुझ्या सुसाट स्मितानं
धाडकन्‌ कोसळतं चांदणं
ही चकमक चकमक नजर
हे एन्काऊंटरी कटाक्ष
किती हृदयांचं हत्यकां
तू केलं सर्वांसमक्ष
इश्‍काच्या टोळीयुद्धात
तू असशील महामाहीर
नाही ऐरागैरा
प्रणयाचा खंडणीखोर!

नक्कीच भारतीय दंडविधानाच्या कुठल्याशा कलमाखाली ही कविता लिहिण्यात आली असणार. तिचे कवी आहेत लोकमतचे श्‍यामसुंदर सोन्नार. किती पोएटिक नाव! जणू फडक्‍यांच्या कादंबरीचा नायक. पण हा माणूस क्राईम करतो! नावात काय आहे म्हणतात तेच खरे! काही काही नावं अशीच फसवी असतात.

आमच्या प्रशांत दीक्षितांचे मात्र तसे नाही. नावाप्रमाणेच ते हल्ली अगदी प्र-शांत असतात. सध्या ते कोटातल्या कचेरीत एकांतवास अनुभवत आहेत. मात्र त्यामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला कसा सर्वोदयी बहर आला आहे. अलीकडेच "टेलिग्राफ' वाचता वाचता ते विनोबांच्या साहित्याचेही परिशिलन करीत असतात. त्यांची ही कविता काहीशी "संथ वाहते कृष्णामाई'च्या चालीवर जाते. -
""संथ वाचतो मी गीताई
अंकामधल्या कशाकशाशी मजला घेणे नाही...''

अशा उदंड कविता आहेत. पण यातील आम्हांस भावली ती कविता काही वेगळीच आहे. दुर्दैवाने तिचे कविताकार कोण आहेत व ती कोणत्या संदर्भात लिहिली याचा पत्ता आमच्या बहिर्जी नाईक्‍सनाही लागू शकलेला नाही.
या अत्यंत चिंतनगर्भ कवितेचे नाव आहे "अभिनंदनाचे अभंग.' (तुकोबांच्या गाथेत जसे सालोमालोचे अभंग तसेच हे अभिनंदनाचे अभंग दिसतात. संशोधन व्हायला हवे!) तर ती कविता अशी आहे. -
घालीन लोटांगण वंदिन चरणम्‌
डोळ्याने पाहिन रुप तुझे
प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन
भावे ओवाळीन म्हणे थोरा!

तथास्तु!!

Friday, May 30, 2008

हॅपी बर्थ डेची गोष्ट

वृत्तपत्रसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात जून महिन्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की याच मासोत्तमात "लोकसत्ता'च्या कमनीय आणि सप्तरंगी "विवा'चा, तसेच "सकाळ'च्या सचित्र आणि रंगीत "टुडे'चा जन्म झाला. या दोन पुरवण्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे केवढे तरी भले केले आहे! म्हणजे तुम्हीच हिशेब करा, की एक पुरवणी म्हणजे किती अधिक नोकऱ्या!! अशा नोकऱ्या नसतील, तर पत्रकारितेतल्या कच्च्या-बच्च्यांनी जायचे कुठे? लिहायचे कुठे? असो.
तर या दोन्ही पुरवण्यांचे "हॅपी बर्थ डे' नुकतेच (जून 2007) साजरे झाले. "टुडे' चा वर्धापनदिन सोहळा 15 जूनला झाला, तर "विवा'चा केक 25 जूनला लोकसत्ता आणि विवा परिवाराने खाल्ला. आम्हालाही त्यातला एक बाईट मिळाला म्हणा. खोटं कशाला बोला!
तर सांगायची गोष्ट अशी, की "टुडे'चा वर्धापनदिन अगदी झोकात साजरा झाला म्हणतात. हे म्हणजे अजि नवलच वर्तले म्हणायचे. कारण की जसा विदर्भ-मराठवाड्यातला शेतकरी म्हटले की तो आत्महत्याग्रस्त असतोच, तसा "सकाळ' म्हटले की तो परंपराग्रस्त असतोच असतो. (म्हणजे पुन्हा आत्महत्याग्रस्तच की!) तर असे असतानाही "सकाळ'ने चांगला (व्हाऊचर तब्बल चारशेचं होतं म्हणतात!) केक आणला, तो कापला आणि खाल्लासुद्धा. (त्यासोबत वाईन नव्हती, हे परूळेकरांवरील उपकारच म्हणायचे!) तर हा व्हाऊचर तब्बल चारशेचं असलेला केक कापण्यासाठी समीरा गुर्जर नावाची मराठी अभिनेत्री आणि नीलम शिर्के नावाची पुन्हा मराठी अभिनेत्रीच (अनुक्रमे परळ व ठाणे कार्यालयात) पाचारण करण्यात आली होती. हे अर्थात आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या ठाणे टुडेमधूनच समजलं. (आम्ही तो वाचत नाही. आमच्या अभिरूचीबाबत गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा.) पण ही पुरवणी पाहून एक प्रश्‍न पडलाच, की ठाण्यात प्रमुख पाहुणी कोण होती? नीलम शिर्के (मराठी अभिनेत्री) की स्वाती जोशी (ज्येष्ठ उपसंपादिका, सकाळ)? कारण की जिकडे पाहावे तिकडे फोटो तर या ज्येष्ठ भगिनीचेच दिसत होते. तर तेही असो.
एकूण सकाळमध्ये मटा संस्कृती हळूहळू रूजत चालली आहे याचेच हे चिन्ह आहे. अखेर संस्कृती ही प्रवाही असते - माणसांबरोबर तीही वाहत जाते - हेच खरे!!
"विवा' ("विवा'हिता हा शब्द नेमका कुठून आला हो?) या पुरवणीची तर बातच काही और. हिंदु कॉलनीतल्या संस्कृतच्या प्राध्यापकाच्या घरात एखादी "निर्मल सुंदर चंचल कोमल' अशी सुबक ठेंगणी अवखळपणा करीत फिरावी, अशी ही पुरवणी. इस्टमनकलर! तिचा लेआऊटच बघा ना नेहमी कसा कमनीयच! (अर्थात कधी कधी आर्टिकलं लावतात, की संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढतात हेच कळत नाही, हा भाग वेगळा!)
तर "विवा'चा हॅप्पी बर्थडे ही चांगलाच उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसासही दस्तुरखुद्द सोनालीजी कुलकर्णी (मराठी अभिनेत्री) उपस्थित होत्या. (मराठी वृत्तपत्रं हल्ली व्हिज्युअल्सला किती महत्त्व देतात नाही!) तिथं आम्हीही होतो. लोकसत्तातल्या फोटोत शंकररावांच्या मागे दिसतो तो काळा ठिपका आमचाच. तर हा वर्धापनदिन सोहळाही चांगलाच झाला. सोनालीजी "विवा'च्या अतिथी संपादिका आहेत. (आता हे फक्त नावालाच बरं का. किंवा नवासाठी म्हणा. अन्यथा "विवा' कोणत्या तिथीला निघतो हेसुद्धा त्यांना ठावकी नसेल. असो.) तर त्या बोलल्या मात्र मस्त. आम्ही तर अगदी पाहातच राहिलो!
पण त्यांच्यापेक्षाही आम्हाला भावलं ते विवातल्या एका विवाईतेचे मनोगत. नेमकं तेच छापून नाही आलं लोकसत्तेत. तिकडं राजकारण खूप. त्याला कोण काय करणार?
पण आम्ही ठरवलं की ते भाषण आपल्या ब्लॉगवर द्यायचंच.
तर ती विवाईता म्हणाली...

""अध्यक्षमहाराज, उपस्थित गुरूजन वर्ग आणि जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, (ही शाळेतली सवय. लवकर नाही सुटत.) ऍक्‍चुअली यू नो, मला मराठीत टॉक द्यायची हॅबिट नाहीये. बट आयल ट्राय. मी खरंतर आज खूप हॅपी आहे. कारण की यू नो आयम अ बिग फॅन ऑफ सोनालीदीदी. त्यांच्या सगळ्या फिल्म मी पाहिल्यात. म्हणजे दिल चाहता है. त्यांच्या गेस्ट एडिटरशिपखाली मी काम करते. सो आयम हॅप्पी. खरं तर मी व्हर्नाक्‍युलरमध्ये येणारच नव्हते. पण कुमारअंकल, चंदू अंकल, सुधीर अंकल हे सगळे माझ्या डॅडचे फ्रेंड्‌स आहेत. तेव्हा डॅड म्हणाले, व्हाय डोंच्यू यू ट्राय इन लोकसट्टा. पॉकेटमनी तरी सुटेल. सो आय ऍग्रीड. शिवाय यू नो आयम व्हेरी सोशली कॉन्शस पर्सन. मग आय बिकेम पार्ट ऑफ विवा फॅमिली.''

येथून ती विवाईता सुटली, ते थेट तिच्या पहिल्या स्टोरीवर आली. ते फारच उद्‌बोधक होते. ती म्हणाली -
"ऍण्ड दॅट डे केम... समबडी टोल्ड मी की आय हॅव टू फाईल अ स्टोरी. म्हणाले, की मजकूर कमी पडतोय. मग मी खूप विचार केला. मग मी कुमारअंकलकडे गेले. ते म्हणाले, पाकिस्तानात सध्या हे चाललंय. क्‍युबात ते चाललंय. डायलेक्‍टिक मटेरियालिझम समजून घे आणि ज्वालामुखीच्या तोंडावर वाच. मला काही ते कळलं नाही, पण कुमारअंकल इज सो ग्रेट. मग मी चंदूअंकलकडे गेले. ते म्हणाले, चॉकलेट खाणार? आणि गुलाम अलीची नवी सीडी ऐकलीस का? आणि मग त्यांनी मला विद्यापीठातलं राजकारण सांगितलं. ही इज सो कूल ना. मग मी सुधीरअंकलकडे गेले, तेव्हा ते म्हणाले नमस्ते सदा वत्सले. मग मीही नमस्ते म्हणाले. मग त्यांनी मला सांगितले, की सोशली रिस्पॉन्सिबल स्टोरी कर. तेव्हा मग मी पुन्हा खूप विचार केला. तेवढ्यात रेश्‍मा टोल्ड मी, की पेपे जीन्सचं नवं कलेक्‍शन आलंय. तू पाहिलंस का? ऍण्ड इट वॉज लाईक लाईटनिंग स्ट्रक मी. आणि मग मी माझी आयुष्यातली पहिली स्टोरी विथ बायलाईन दिली - पेपे जीन्स बाजारात! इट वॉज ए व्हेरी सोशली रिस्पॉन्सिबल स्टोरी. एव्हरीबडी ऍप्रिसिएटेड इट.
आता माझी एकच अँबिशन आहे. मला की नाही सोनालीदीदीसारखी मोठी गेस्ट एडिटर बनायचंय. थॅंक्‍यू.

हे भाषण ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं म्हणतात. त्यावेळी बाहेरही आकाश गळत होतं. रामनाथजी गोयंका वर गदगदले असावेत.

Thursday, May 29, 2008

नाका कामगार

विक्रोळी, कांजूरचा पॉश विभाग सोडला की अचानक एक कळकटलेला, जुनापुराणा भाग तुम्हांला दिसू लागतो. रस्त्यावर रिक्षांची, मोडक्‍या बेस्ट बसेसची गर्दी, पदपथांवर बसलेले फेरीवाले, त्यांच्या मराठी आरोळ्या, डोंगरांवरील चाळी, मधूनच दिसणाऱ्या उंच इमारती आणि काही कारखान्यांचे भग्न अवशेष असे वातावरण एकदम तुमच्या अंगावर येते. हे भांडुप. मुंबईचे शांघाय झाल्यानंतरही तिच्या पोटात अशी काही न पचलेल्या अन्नासारखी बेटं उरलीच. त्यातलेच हे एक. मुंबईचे एक उपनगर.
इकडे कांजूर, पुढे मुलुंडचा स्पेशल झोन यांमध्ये एलबीएस एक्‍स्प्रेस हायवेच्या एका बाजूला भांडुपचा पसारा मांडलेला आहे. या हायवेवरून मुलुंडच्या दिशेने थोडे पुढे गेले की भांडुप नाका लागतो. पूर्वी येथे प्लंबर, कार्पेंटर, रंगारी, कुली असे लोक बसत असत. (अधिक संदर्भासाठी पाहा ः मी पाहिलेले भांडुप - डॉ. अनुजा लेले, ऑक्‍सफर्ड युनि. प्रेस, किं. अ3000). त्यांना "नाका कामगार' असे म्हणत. निळू दामले सांगत होते, की मध्यंतरी आलेल्या आत्महत्येच्या साथीत त्यातील अनेक लोक नामशेष झाले. परंतु गेल्या काही वर्षात तेथे नव्याने नाका कामगार दिसू लागले आहेत.
निळू म्हणजे वेगळेच रसायन आहे. हा माणूस सारखा फिरत असतो. परवाच तो आठवी गल्ली, जुहू येथे जाऊन आला. आता त्याचे त्यावरच्या पुस्तकाचे लेखन सुरू आहे. तर मराठीतील काही पत्रकार व लेखक, त्यांना तिकिटाचे पैसे कोण देते, यावर संशोधनात्मक प्रबंध लिहित आहेत.
एका पदपथाकडे बोट करून दामले म्हणाले, ते तिथं उकीडवे बसलेले लोक आहेत ना ते हल्लीचे नाका कामगार.
तिथे अनेक लोक घोळक्‍याने बसलेले होते. काही जण गटागटाने टपरीवरचा कटिंग चहा पीत उभे होते. जवळ जाऊन पाहिलं, तर काहींच्या हातात जुने, कळकटलेले लॅपटॉप होते. काहींच्या गळ्यात कॅमेरे, हॅंडिकॅम लटकावलेले होते. झाडाखाली चारपाच जण एकच सिगारेट फुंकत उभे होते. त्यांच्या खिशाला डिजिटल साऊंड रेकॉर्डर लटकावलेले दिसत होते.
निळू सांगत होते, या कामगारांमध्येही अलीकडे श्रेणीरचना आलेली आहे. त्यातल्या त्यात जे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे मल्टिमिडियाची सगळी हत्यारे असतात. बाकीचे ती पुण्याहून भाड्याने आणतात. तिथं बुधवारात त्याचे मोठे दुकान आहे.
विचारलं, पण यांना कामाला नेतं कोण?
निळू म्हणाले, आता साडे नऊ वाजत आलेत. लवकरच तुला ते कळेल.
ही निळूची नेहमीची सवय. कोणतीही माहिती तो मौखिक पद्धतीने हल्ली देतच नाही. त्यावर लगेच पुस्तक लिहून टाकतो.
थोड्या वेळाने एलबीएस हायवेवरून एक मोठी कार येऊन तिथं थांबली. तिच्यामागे एक टेम्पो होता. कारमधून एक पांढरा मनिला इनशर्ट, पाचसाडेपाच फूट उंचीचा, भांग डावीकडे व्यवस्थित पाडलेला तरूण उतरला. निळू म्हणाले, हा विकास. केतकरांचा वैयक्तिक सहायक. केतकर म्हणजे कुमार केतकर. लोकसत्ताचे एनआरआय एडिटर.
विकासला पाहताच नाका कामगारांमध्ये एकच खळबळ माजली. सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. निळू म्हणाले, सगळे आले, पण बघ, ते मल्टिमिडियावाले मात्र जागचे हललेही नाहीत.
विचारलं, असं का? तर निळू गालात हसले. म्हणाले, लोकसत्ता अजूनही साठीच्या साक्षीदारांसाठीच काढतात!
विकासभोवती आता चांगलीच गर्दी झाली होती. पण तो नेहमीच्या सवयीने शांत होता. आजूबाजूला नजर फिरवित तो म्हणाला, पुढच्या चार महिन्यांच्या पुरवण्या छापून तयार आहेत. तेव्हा आज फक्त मुख्य अंकाचंच काम आहे. एक चीफसब आणि दोन उपसंपादकच लागतील.
त्याबरोबर तिथं एकच रेटारेटी सुरू झाली. एक जण ओरडून म्हणत होता, मला घ्या. मला घ्या. पंधरा वर्षांचा अनुभव आहे पहिल्या पानाचा. दीडशेत येतो.
दुसरा म्हणत होता, मी गार्सियावाला आहे हो. नऊ वर्ष काढलीत पहिल्या पानावर. सव्वाशेतसुद्धा येईन.
असं बराच काळ चालल्यावर विकासने तिघा जणांना शंभरात पटवं. चा वाजता लालबागला या, असं सांगून तो कारमधून भुर्रकन्‌ गेला.
ेत्याची कार एलबीएसवरून टर्न घेतच होती, तोवर लोकमत, मटा, सकाळ अशा विविध कालिकांच्या गाड्या तेथे येऊन उभ्या ठाकल्या होत्या.
निळू म्हणाला, अरे व्वा. आज मटातून प्रत्यक्ष भारतकुमार आलेत. चल भेटू या त्यांना. भारतकुमार म्हणजे गणपतीवाले. कारची काच खाली करून ते बाहेरच्या लोकांचा अंदाज घेत बसले होते. निळूने त्यांना नमस्कार केला. आमची ओळख करून दिली. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले.
निळूच म्हणाले, काय आज स्वतः आलात?
ते म्हणाले, हो. इकडे मुलुंडला शाखेत निघालो होतो. म्हटलं जाता जाता दोन-चार माणसं पाठवून देऊ.
विचारले, तुम्हांला कशाप्रकारची माणसं लागतात?
ते तुटकपणे म्हणाले, त्याचं काही नक्की नसतं. काम असेल तशी माणसं नेतो.
विचारले, मग आज कोणतं काम काढलं आहे?
ते म्हणाले, मुंटा लावायचाय. अंकासाठी मालिकेची पुढची प्रकरणंही लिहायचीत. त्यामुळे डीटीपी आलं तरी पुरे.
असं म्हणून त्यांनी आमच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले. मग आम्ही लोकमतचे दिनकरबाबू उभे होते, तिकडे गेलो. निळू म्हणाले, त्यांना फक्त मराठवाड्याची आणि पेजिनेशन येणारीच माणसं लागतात.
त्यांच्या आड काही जण गळ घेऊन उभे होते. मी विचारलं, ते लोक कोण?
निळू हसत म्हणाले, ते मुंबई सकाळवाले. कोणी एखादा माणूस नापसंत केला, की ते लगेच त्याच्यावर गळ टाकतात. नेहमीचंच आहे ते.
तोवर साडेदहा वाजत आले होते. सगळ्या गाड्या निघून गेल्या होत्या. काम न मिळालेले पत्रकार तिथेच पडक्‍या चेहऱ्याने रेंगाळत होते. वार्ताहर, पुण्यनगरी, नवाकाळच्या गाड्या अजून यायच्या होत्या. तिथं तरी काम मिळेल या आशेने ते उभे होते. अनेकांनी तिथंच बसून बातम्या, लेख लिहायला सुरूवात केली होती. निळू म्हणाले, हे आता दिवसभर फ्री लान्सिंग करणार. युनिक-बिनिकवाले घेतात कधीमधी त्यांच्याकडून असा माल. पण त्यांचं खरं गिऱ्हाईक म्हणजे साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा, चित्रलेखा अशी साप्ताहिकंच.
पण यातूनही ज्यांना काहीच काम मिळत नाही, ते काय करतात?
निळू म्हणाले, अरे त्यातले अनेक जण लग्नपत्रिका वगैरे डिझाईन करून देण्याचं काम करतात. तो कवी पाहिलास? संडे सप्लिमेंटचा संपादक होता. काय रूबाब होता त्याचा तेव्हा. आता शाखाप्रमुखांची भाषणं लिहून देतो.
म्हणालो, त्यातल्या काही जणांशी बोलता येईल का?
निळू उत्साहाने मला त्यातल्या एकाकडे घेऊन गेले. म्हणाले, हे अमुक तमूक. सगळे पेपर फिरून आलेत. काय हवं ते विचार त्यांना.
विचारले, तुम्ही केव्हापासून येता नाक्‍यावर?
तो हातातला लॅपटॉप सुरू करायला लागला. तेवढ्यात निळू घाईघाईने म्हणाले, ते नको. ते नको. तसंच सांगा.
म्हणालो, काय झालं? निळू म्हणाले, ती त्यांची जुनी सवय. पूर्वी सकाळमध्ये होते. त्यामुळे काहीही सांगायचं झालं, तरी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन करतात.
अमुक तमूक कसनुसे हसले. मग सर्व काही पाठ असल्याप्रमाणे सांगू लागले, आमची केतकर-टिकेकर-कुवळेकरांची पत्रकारीता. पण आता त्यातलं काही राहिलं नाही. मी थोडं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न केला. हे पीपी प्रेझेन्टेशन वगैरे. पण आपल्याला काही ते मानवलं नाही. बरीच वर्ष कॉन्ट्रॅक्‍टवर काढली. पण ते संपलं की कोणी रिन्यूच करीना. म्हणायचे पीएमएसमध्ये बसत नाहीत तुम्ही. पुढे पुढे सगळ्यांचंच असं होत गेलं. मग सगळ्यांबरोबर मीही नाक्‍यावर आलो.
सगळे म्हणजे?
सगळे. गार्सियावाले. मल्टिमिडियावाले. वेबवाले. पेजिनेशनवाले.
पण यात पत्रकार कुठे आहेत? आम्ही आश्‍चर्याने विचारले.
तर तो म्हणाला, पत्रकार? म्हणजे तुम्हाला माहित नाही? ते तर ब्रॉडशिटबरोबरच संपले!

Friday, April 25, 2008

लबाड लांडगं ढ्‌वांग करतंय...

आम्हांस प्रसिद्धीपत्रक काढण्यात अत्यंत आनंद होऊन राहिला आहे, की महामहीम सोनियाजी गांधीजी यांच्याप्रमाणेच आमचेही "नैतिक' समर्थन राजमान्य राजेश्री संजूबाबाच्या पाठीशी आहे!

संजूबाबाला शिक्षा होणार की नाही, शिक्षा झाल्यास बॉलिवूडचे किती पैसे बुडणार, त्याचे कोणकोणते चित्रपट "शेल्फ'मध्ये जाणार, त्याच्या शिक्षेचा मान्यताताई आदींवर कोणता "नैतिक' परिणाम होणार वगैरे महत्त्वपूर्ण प्रश्‍न तमाम मराठी पत्रांप्रमाणेच आमच्याही समोर होते. एक क्षण तर वाटले, की आपल्या सर्व बहिर्जी नाईक्‍सना याच कामी जुंपावे आणि संजूबाबाची बित्तंबातमी काढावी. पण नंतर आम्ही सुविचार केला, की विसूभाऊ, जर हेच काम आपली सर्व वृत्तपत्रे (मराठीसह!) व विविध कालिके व वृत्तवाहिन्या करीत असतील, तर ते आपण का बरे करावे? एकच काम अनेकांना देण्याइतपत सहयोगी संपादक का आपल्याकडे आहेत? तेव्हा आम्ही मग त्या बित्तंबातमीसाठी मराठी पत्रेच चाळू लागलो.

आमची ही पत्रे मोठी हुशार व विश्‍वासार्ह व निःपक्षपाती! त्यामुळे संजूबाबाला शिक्षा होताच त्यांनी कसे फटाक्‌न अग्रलेख लिहिले व त्यांत संजूबाबा कसा दोषी व गुन्हेगार व शिक्षेस पात्र आहे व प्रसारमाध्यमे कशी त्यापायी वेडी व पागल व पिसाट झाली आहेत असे विचारसंपृक्त व विचारप्रक्षोभक व विचारगर्भ विचार मांडले! (आमचे हे लेखन काहीसे "सकाळ'च्या अग्रलेखाच्या अंगाने चालले आहे, याची आम्हांस जाणीव आहे. पण नाईलाज आहे! काही काळ आम्हीही तेथे संपादकीये लिहिली, त्याचा वाण व गुण लागणारच!)

हे अग्रलेख अत्यंत व खूपच निःपक्षपाती असल्याने त्यात संजूबाबाचा उदोउदो करणाऱ्या व त्याचीच मोठी व विस्तृत वृत्ते देणाऱ्या माध्यमांवर टीका करण्यात आली होती. ते वाचून आम्ही जरा काळजीतच पडलो होतो, की आता हे संजूबाबाला फारसे महत्त्व देणारच नाहीत की काय! पण महाराष्ट्र टाईम्सपास, लोकमत, सकाळ, सामनादी दैनिके चाळली व संजूबाबाचे कैसे झोपणे, संजूबाबाचे कैसे खाणे, संजूबाबाचे कैसे सलगी देणे याची तमाम सचित्र खबर पहिल्या पानावर पाहिली व आम्ही निःशंक व काळजीहीन व चिंतामुक्त झालो!

तरीही आमचे अंतःकरण व हृदय संजूबाबाच्या काळजीने धपापतच होते, की कारागृहाच्या वसतीगृहात कसलेकसले लोक व गुन्हेगार व पोलिस असतात, त्यांच्या सहवासात संजूबाबा बिघडणार तर नाही ना! "जेलच्या बराकीत तो एकटाच आहे'! (माहिती सौजन्य - मटा, दि. 2 ऑगस्ट). त्याचे तेथे रॅगिंग तर होणार नाही ना? त्याला तेथे कष्ट करून "विनम्रतेने 12 रूपये 12 आणे कमवावे लागणार'! (माहिती सौजन्य - मटा, दि. 3 ऑगस्ट) त्याला त्रास तर होणार नाही ना?
पण "येरवडा कारागृहात संजूबाबास सकाळी सात वाजता दोन केळी, दूध देण्यात आले. न्याहरीस दोन पोळ्या व उसळ देण्यात आली. दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण त्याला कोठडीतच पुरविण्यात आले', हा अत्यंत महत्त्वाचा व विधायक तपशील समजल्यानंतर (माहिती सौजन्य - सकाळ, 4 ऑगस्ट) आम्हांस खूप बरे व चांगले वाटले, की घेताहेत, घेताहेत संजूबाबाची चांगली काळजी घेताहेत... आमची सोन्याहून पिवळी व स्वतंत्रतेहून स्वतंत्र व विधायकतेहून विधायक मराठी वर्तमानपत्रे आणि येरवडा वसतीगृहवाले!!

आता आमच्या मनात एकच प्रश्‍न व सवाल पिंगा व फेर घालतो आहे, की काल (ता. 3 ऑगस्ट) लोकसत्तेला काय असे पिसाटायला झाले होते, की त्यांनी "पिसाटलेला मीडिया' असा अग्रलेखच लिहिला व त्यात उपग्रह वृत्तवाहिन्यांना बदडून व झोडून काढले?

या प्रश्‍नावर आम्ही खूप खोल व गहन विचार करीत होतो, तोच "सह्याद्री'च्या कडेकपारीतून "लबाड लांडगे ढोंग करते...' या छानशा भावगीताचे सूर घुमले! आणि वाहिनीच्या त्या बोधीवृक्षाखाली आम्हांस अचानक व एकदम साक्षात्कार झाला, की अरे, हे तर आपल्या तमाम व अवघ्या पत्रांचेच ब्रीदगीत!!
तुम्हांस काय वाटते?

Friday, April 18, 2008

राजा भिकारी, माझी बातमी "फिरवली'!

काही दिवसांपूर्वीची गोष्ट.
दूरवरून ढोल-ताशांचा आवाज येत होता.
म्हटले, की दह्यकाल्याचो उत्सौ आलाय. कुठे गोपिकांची तर प्रॅक्‍टिस चालू नसेल ना! पाह्यला हवे! म्हणून मजल-दरमजल करीत निघालो, तर काय! लालबागेतल्या वार्ताहरच्या कचेरीत आनंदीआनंद गडे साजरा केला जात होता. मनीं म्हटले, कुणाचा हॅप्पी बर्थडे तर नाही ना इथे? महाराष्ट्र टाइम्सपासमध्ये तर वाचल्याचे स्मरत नाही.
मनीं आले, आयुष्यात एकदा तरी मटामध्ये आपला वाढदिवस छापून आला पाह्यजे! म्हणजे कसे जन्माला आल्याचे सार्थक होईल! पण हे चिंतन बाजूला सारून आम्ही प्रस्तुत कामामध्ये लक्ष घातले, की वार्ताहर का बरे आनंदले आहे?
मनीं आले, कोणत्याही मराठी दैनिकांत दोनदाच खराखुरा आनंदोत्सव साजरा केला जातो, एकदा पगारवाढ झाली की आणि दुसऱ्यांदा... पगारवाढ झाली की! असेच काही आक्रीत नसेल या पत्रात घडले?
या विचाराने आम्ही सरळ आत गेलो, तर फाटकावरील दरवानाने हटकले, ""अबी काम नय है यहॉं. सब पेपर ठोकनेवाले भर गये!''
मनीं आले, आम्ही चेहऱ्यावरून एवढे का बिजले दिसतो?
तरीही मनी श्रेष्ठ धारिष्ट्य धरून आम्ही म्हणालो, ""आम्हांस काम नको! आयुष्यात ते कधी करावे लागू नये म्हणून तर मित्रा आमची सर्वांची खेचरगिरी सुरू असते संपादक होण्याची! तू फक्त आमची एवढीच उत्सुकता शमव, की हे ढोल-ताशे आणि नगारे का बरे वाजत आहेत?''
त्यावर त्या चहाटळ दरवानाने आमच्याकडे अशी नजर टाकली, की मनीं आले, आम्ही चेहऱ्यावरून सुभाष झासुद्धा दिसतो की काय?
"उत्सुकता शमव' या शब्दप्रयोगाचा हा परिणाम असावा! शिवाय त्यात तो दरवान म्हणजे वार्ताहर आणि चौफेरच्या बातम्यांवर वाढलेला जीव! जीव घेऊन आम्ही तेथून सटकलो, ते थेट शिवाजीरावांच्या समोरच येऊन आदळलो.

क्रिकेटमहर्षी शिवाजीराव सावंत. मटाच्या वृत्तसंपादकपदी होते, तेव्हाचे शिवाजाराव आणि आताचे शिवाजीराव, एक वय सोडले तर तसूभरही फरक नाही. मनीं म्हणालो, काय सांगावे, जाकिटसुद्धा तेच असेल... मटाच्या सेंडऑफ पार्टीत घातलेले!
त्यांना आदरयुक्त प्रणिपात करून आम्ही वदलो, ""सलाम आलेकुम सावंतसो! मनीं शंका घेऊन आलोय, की हा उत्सौ कशाचा मनवता आहात तुम्ही?''
त्यांनी आधी टेबलावरील वृत्तपत्रांचे चघाळ गोळा केले. मग शिपायास सौहार्दपूर्ण साद दिली. त्याच्या हाती त्या चघाळातील काही वृत्तपत्रे दिली, व म्हणाले, ""बाहेर उपसंपादकांना द्या आणि सांगा, की खुणा केल्यात तेवढ्याच बातम्या फिरवा. मराठीचं काही अडलं तर मला विचारायला या. डिक्‍शनरी पाहात बसून वेळ घालवू नका. काय?''
सुपारीचे खांड तोंडात सारत त्यांनी सराईत "मटाईता'प्रमाणे राऊंड दी विकेट चेंडू टाकला, ""विसूमियॉं, आजचा दिवस वार्ताहर ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिन आहे! तुम्हांस आमची संस्कृती व परंपरा माहितच असेल...''
"हो...'', आम्ही ज्ञानदिवा पाजळला, ""शतकाची परंपरा आहे वार्ताहरला. म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळीसुद्धा वार्ताहर निघत होता...''
"लाहौल विलाकुवत! साफ गलत!'' आमचा त्रिफळा.
"विसूमियॉ, तो फुल्यांच्या काळातला वार्ताहर वेगळा. आमचा हा ट्रिपलफुल्यांवाला वार्ताहर!... आमच्याकडे किती वार्ताहरी आहेत ठाऊक आहे का?''
"नाही.'' आमचा ज्ञानदीप मघाच विझला होता.
"सगळ्या मराठी-इंग्रजी दैनिकांचे असतील, तेवढे सगळे वार्ताहर आमचे! शिवाय आमचे असे वेगळेच! म्हणजे सगळ्यांहून जास्त वार्ताहरी व हरिणी आमच्याच!''
शिवाजीरावांचा हा स्कोरबोर्ड आमच्या मेंदूत जाम जाईना!
"झापड मिटा विसूमियॉं! अहो, आम्ही सगळ्याच दैनिकांच्या बातम्या फिरवून छापत असतो. तेव्हा त्यांचे ते आमचेच नाही का झाले?''
आम्ही मनीं म्हणालो, अच्छा, तर ही संस्कृती आहे होय येथे? म्हणजे तिलाही शतकांची परंपरा आहेच की! पहिले ज्ञात मराठी पत्र म्हणजे "मुंबई अखबार'. त्यातही प्रातोप्रांतीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या फिरवून घेतल्या जात असत. तेच त्यांचे बातम्यांचे प्रमुख साधन होते, असे लेल्यांचा इतिहास सांगतो!
आम्ही फ्रंटफूटवर जाऊन विचारले, "पण त्यात काय येवढा आनंद मानायचा?''
"आनंद त्याचा नव्हे, विसूमियॉं. आनंद याचा आहे, की पह्यल्यांदाच एका बड्या मराठी दैनिकाने आमची बातमी फिरवून छापली आहे. तीही पहिल्या पानावर! मुंबैत फ्लायर म्हणून! पुण्यात अँकर म्हणून! म्हणून आमचे लोक खुश आहेत.''
शिवाजीरावांच्या या बाऊन्सरने आम्ही गारदच झालो.
पाहतो तो खरेच की तेथील एक वार्ताहरिणी गुणगुणत होती : राजा भिकारी, माझी बातमी फिरवली!
"छे छे! तुमची काही तरी गफलत होतेय. असे होणे शक्‍यच नाही. आता लोक उचलतात आंग्ल दैनिकांतल्या बातम्या. पण तेवढे चालतेच ना! बिच्चारे वार्ताहरी आणि वार्ताहरिणी रोज रोज कुठून आणणार बरे नव्या नव्या बातम्या?... आणि समजा चोरल्या अन्य दैनिकांतल्या बातम्या, तरी त्यात शर्मो-हया वाटण्याचे काय कारण? त्यांचा उद्देश तर निर्मल, कोमल, मंगल असाच असतो ना?... वाचकांचा माहितीचा अधिकार जपण्याचा!..''
आमच्या या बॅटिंगनंतर शिवाजीरावांनी एक तुच्छतादर्शक पॉज घेतला.
जरा खुर्चीवर रेलले आणि मग म्हणाले, ""हेच तर आम्हीही म्हणतोय ना केव्हापासून, तर आम्हांला तुम्ही फालतू समजता! तेव्हा आता विसूमियॉं चला, आपण सगळी वृत्तपत्रे मिळून हेच म्हणू या! आपण सगळे एकाच माळेचे मणी होऊ या!!''

शिवाजीरावांचे हे स्लेजिंग होते किंवा कसे, याचा निर्णय आम्हाला अजून घेता आलेला नाही...

---------------------------------------------------
स्वाध्याय -
1) वार्ताहरचा सोमवार, दि. 6 ऑगस्ट 2007चा अंक मिळवून, त्यातील पहिल्या पानावरील "एक कोटीची झोपडी' या मुख्य बातमीची उचलेगिरी करणारे वृत्तपत्र कोणते याचा शोध घ्या व आपले उत्तर 4321वर एसेमेस करा.
2) अशाच प्रकारची बातम्यांची उचलेगिरी मिरर, हिंदुस्तान टाईम्स आदी आंग्लपत्रांतही चालते का, याचा "डोळस'पणे शोध घ्या व ती माहिती आपल्या संपादकांना देऊन शाबासकी मिळवा.
3) फिरवलेल्या बातम्यांखाली "अनुवादित', "स्वैर रूपांतर', "भाषांतर', "परकीय कल्पनेवरून' असे छापावे काय, यावर वृत्तसंपादकांशी चर्चा करा.

Monday, April 14, 2008

चिवडागल्लीतला चिवडा!

(लालबागातली चाळीसम कचेरी स‌ोडून मत्प्रिय लोकसत्ता पुन्हा एकदा एक्स्प्रेस टॉवरमध्ये गेला. जागेच्या बाबतीत ही लोकसत्ताची स‌मझोता एक्स्प्रेसच म्हणायला हवी! असो. तर जे स‌मयी लोकसत्ता लालबागातल्या नरीमन पॉंईंट येथे छापून चिवडा गल्लीतून प्रकाशित होत होता व जे स‌मयी लोकसत्ताने आपल्या पुरवण्यांचा स‌ंसार आटोपता घेतला, ते स‌मयी बहुत स‌ंतप्त दुःखद अंतःकरणाने लिहिलेला हा लेख.)


आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले आहेत. नावाचेच खेचर, त्यामुळे नासिकाही फुरफरत आहे.
कारण आमचे अंतःकरण संतप्त दुःखाने भरून गेले आहे.
महाराष्ट्र टाइम्स(पास)ची "मैफल' उठून गेली (आणि "संवाद'च्या स्मार्ट तबकात केवळ देठ, लवंगा आणि सालीच उरल्या) तेव्हाही आमचे असेच झाले होते.
कुणाचा अपमृत्यु झाला, की आमचे असेच होते. काय करणार? स्वभाव!

खरे तर गेल्या शनिवारपर्यंत आम्ही कमालीचे खुश होतो.
अलीकडेच मटाने विकएंड पुरवणी सहर्ष सादर केली. ती आम्ही याचि डोळां पाहिली. तरीही आमचा आनंद ओसरला नव्हता.
वास्तविक असा विकेंड पाहून आम्हाला हुंदकाच फुटायचा!
म्हणजे राजे हो, एकच खेळ तुम्ही कितींदा लावणार?
मुंटात तेच! मॉसमधे तेच! आणि विकेंडमधेही तेच?
कन्टेन्ट बदला तो पैसा वापस अशी का आपली स्कीम आहे गणपतीवाले?

पण आमची तक्रार विकेंडबद्दल नाहीच आहे.
तशी आमची तक्रार कोणाहीबद्दल नाही!
आजच्या (मंगळवार, दि. 31 जुलै) मुंबई वृत्तांतमधील "कॅम्पस मूड' मधील "स्क्रॅप बुक' नामे सदर आम्ही वाचले आणि आमची जन्माची तक्रार संपली!
या सदरातील हे काही मननीय वाक्‌प्रचार पाहा -
बॉटनीची फटाका मॅम!
सानिया मिर्झा हॉट प्रॉपर्टी!!
गर्लफ्रेंडबरोबर बॅटिंग!!!

केतकरसाहेब पाहताय ना, आजचा युवा किती "टॉईन-फ्री' झालाय तो!
आता एकदा हे "कॅम्पस मूड' पान "मूड्‌स' अथवा "कोहिनूर'ने प्रायोजित केले, की सगळे भरून पावेल! व मग आपण मिळून सारे जण चतुरा, चतुरंग, मधुरा, तनिष्का, सखी आदीकरून सर्व महिलाविषयक पुरवण्यांमध्ये नारीशक्तीचा आदरयुक्त जागर घालण्यास मोकळे होऊ!!
असो.

तर मुद्दा असा, की आमची तक्रार कोणाहीबद्दल नसली, तरी आम्हांला येथे हार्दिक सल मांडायचा आहे तो लोकसत्तेच्या लोकरंगबद्दल!
लोकसत्तेच्या पुरवण्या आता नव्या रंगात, नव्या ढंगात अशी जाहिरात आमच्या वाचनात आली, तेव्हा आम्हांस भरली अवनी मोदाने असे काहीच्याबाही झाले होते.
आमचे सोडा. बुधवारातली बुढ्ढीसुद्धा लोकसत्ता कसले रंग-ढंग उधळतेय याकडे डोळे लावून बसली होती! आमच्या बहिर्जी नाईक्‍सनी दिलेल्या माहितीनुसार लोकसत्तेची ही जाहिरात आली, त्याच दिवशी सकाळमध्ये त्याबाबतच्या विचाराला सुरूवात झाली. मग साधारणतः 37 तासांनी त्याबाबतची चर्चा सुरू झाली व 42व्या तासाला बुधवारपेठ ते भांबुर्डे असे ई-मेल्सचे वहन सुरू झाले! अखेर यातून असे निष्पन्न झाले की आपण एक मिटिंग घ्यावी. त्याकरीता सर्व संपादकांना पाचारण करण्याचेही ठरले. पण पावसामुळे तो बेत रद्द झाला. (व खिरेंचा जीव भांड्यात पडला! हल्ली प्राईडचं बील जरा वाढतच चाललं आहे!)

लोकमतमध्ये याहून वेगळाच प्रकार होता.
ही जाहिरात पाहताच राहीबाई भिडे (अमेरिका रिटर्न) यांनी दिनकररावांना दूरध्वनी लावला. ""एक एक्‍स्‌क्‍ल्युजीव न्यूज आहे. डू यू नो? लोकसट्टा इज युजिंग डिफरन्ट कलर.'' (राहीबाईंचे ऍक्‍सेंट काय सुधारलेत! एकदम बोईंग!!)
आता दिनकरराव म्हणजे दिनकररावच! ते म्हणाले, ""काय सांगता! वेगळा रंग वापरताहेत? अहो, आपण "सीएमवायके'च वापरतो ना? त्यालीकडचा हा कोणता रंग आणताहेत लोकसत्तावाले?''
राहीबाईंनीच मग त्यांची सुटका केली! त्या म्हणाल्या, ""मी असं करते. विलासरावांना सांगून एशियन पेंट्‌समध्ये चौकशी करायला सांगते कुणाला तरी.''
त्यावर दिनकरराव गिरधारींकडे पाहून गालभरून हसले.
(दिनकररावांचा मिश्‍किल रंग अजूनही हिरवा आहे!!)
पुढारीत मात्र या जाहिरातीने काडीमात्र खळबळ माजविली नाही!
छत्रपती मनातल्या मनात मोठ्याने म्हणाले, ""लोकसत्ता नव्या रंगात येऊन स्पर्धा करते काय? अरे, आमीबी काय कमी नाही!''
आणि त्यांनी प्रॉडक्‍शनला आदेश दिला, ""उद्यापासून डबल रंग वापरा रे!''

बड्या बड्या मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादकांची ही अवस्था. तिथे आमचे काय! पण आम्ही आपले एवढ्यावरच खुश होतो की चला आता नवीन काही रंगदार, ढंगदार, जोमदार, कसदार वाचावयास मिळणार!

(एरवी तसे वाचावयास मिळत नाही असे आमचे मुळीच म्हणणे नाही. लोकसत्ता खूप वाचनीय जाहिराती देतो हे अगदी मनःपूर्वक मान्य! पुण्यात सकाळचेही तसेच. पण त्यांची गोष्टच वेगळी. त्यांच्याकडे "लोक छोट्या जाहिरातीही ताज्या बातम्यांप्रमाणे वाचतात' असे असल्याने व अलीकडे पराग करंदीकरांवर कामाचा खूपच ताण येत असल्याने (केवढा वाळलाय ना पराग अलीकडे!) तेथे आताशा ताज्या बातम्या छोट्या जाहिरातींप्रमाणे लावल्या जातात!)

तर खूप अपेक्षेने आम्ही रविवारचा लोकसत्ता हाती घेतला.
लोकरंग वाचला आणि
ऐसा लगा की-
जैसी दुर्वांकूरची थाळी, जैसी मल्टिव्हिटॅमिन गोळी,
जैसा लालबागचा चिवडा, जैसा चौपाटीचा रगडा,
जैसी भैयाच्या ठेल्यावरची तिखीगिली भेल...

चिवडा गल्लीत लोकसत्ताची कचेरी गेली तेव्हाच खरे तर आम्ही भाकीत केले होते, की यांना वाण नाही पण गुण लागणार! आज नवी मुंबईत कचेरी हलविण्याची वेळ आल्यानंतर आमचा तो होरा खरा ठरला याच्याच वेदना आम्हांस मनःपूत होत आहेत.
हास्यरंग, बालरंग, लोकमुद्रा, स्पोर्ट झोन असं सगळं कोंबून दहा पानी घसघशीत (पाने दहा आणि घसघशीत! आपण आंग्ल दैनिकांच्या किती मागे आहोत याचा अंदाज येतोय ना?) असा हा लोकरंग पाहून वाटले त्यापेक्षा मग संध्यान?द काय वाईट?
ही काय पद्धत झाली रविवारची पुरवणी काढायची?
म्हणे वाचकांनी आग्रह केला, की सगळ्या पुरवण्या दर आठवड्याला हव्यात आम्हांला!
आम्हांला एकदा असा आग्रह करणारे वाचक कुठे असतात त्यांना खरोखरच भेटून त्यांचे चरणरज मस्तकी लावायचे आहेत! की बाबांनो, तुमच्या आग्रहामुळे लोकसत्ताचा कागदाचा किती खर्च वाचला आहे. तोट्यातल्या पुरवण्या बंद करण्याऐवजी असा अभिनव फायदेशीर फंडा सुचवून तुम्ही आमच्या तमाम मालक लोकांचा कितीतरी शुभलाभ करून दिलेला आहे! तेव्हा एक हात "अंका'वर ठेऊन तुम्हाला सलाम!!

बाय दे वे, तो लोकसत्ताचा वाचक संशोधक विभाग... तो राहतो कुठे? त्याचेही एकदा संशोधन करायलाच हवे!!

Thursday, April 10, 2008

बातमी म्हणजे काय हो देवा?

आषाढी एकादशीच्या दिवशी (भारतीय सौर 4 श्रावण शके 1929, आषाढ शुक्‍ल एकादशी, गुरूवार, दि. 26 जुलै 2007) अंमळ लवकरच उठिलो. शौचमुखमार्जनादी प्रातःक्रिया उरकिल्यानंतर ताटलीभर साबुदाणा खिचडी हाणिली आणि कोपभर कषायपेय प्राशन केले. येणेप्रकारे तरोताजा झाल्यानंतर दरवाजात फडफडत असलेला ताज्या वृत्तपत्रांचा ढिग आत घेतला.
(येथे सांगण्यास हरकत नाही, की एक अल्प मुदतीची गुंतवणूक म्हणून हल्ली आम्ही किमान साडेतीन किलो वृत्तपत्रे घेतो! पूर्वी जेव्हा आम्हांस कचेरीतून वृत्तपत्रांचे बिल मिळत नसे तेव्हा घेत नव्हतो. आता घेतो. बिल मिळू लागले म्हणून नव्हे, तर वृत्तपत्रांचे भाव घसरिले म्हणून! आंग्लभाषिक वृत्तपत्र तर रोजी सहा आण्याला एक पडते. अशा खूप वृत्तपत्रांची वर्गणी भरावी. मग दोन महिन्यांनी रद्दी विकावी आणि महिन्याचे रेशन आणावे अशी ही आमची सर्वंकष गुंतवणूक योजना आहे.)

खाटेवर गुंडाळिलेल्या गादीस टेकूनी आम्ही वाचनाचे लाईफगार्ड (वाचाल, तर वाचाल! इति दिनकर गांगल, द्वारा ः ग्रंथाली.) कार्य करीत बसलो. एरवी वृत्तपत्रे वाचिताना आम्ही नेहमीच झपुर्झून जातो. पण आज लोकसत्ता वाचिताना काहीतरी खूप बिघडल्यासारखे वाटत होते. म्हणजे बघा, सर्व आंग्लभाषिक वृत्तपत्रांतील छायाचित्रे पाहूनी आम्ही ती नीट घडी घालून एका बाजूस ठेवोनी दिली. (यांचा रद्दीचा भाव जास्त असतो!) मग मटातील हसा लेको व चकोर वाचिले. मग समीर, अरूंधती आणि देविका या त्रिकोणात घडणारी रोहिणी निनावे यांची हृदयस्पर्शी मालिका - तू सुखी राहाचा पुढील एपिसोड मनःपूर्वक वाचिला. सौभाग्यवतींशी त्यावर उद्‌बोधक चर्चाही केली व त्यावरील प्रश्‍नाचे उत्तर शोधूनी काढले. तद्‌नंतर मुंबई सकाळचे दोन्ही अग्रलेख (देवाशप्पथ!) वाचिले. मग बराच काळ रांगोळी पाहावी तद्‌वत सकाळचा ले-आऊट पाहात बैसलो! मग बघु या मुंबई सकाळमध्ये आज कुठल्या-कुठल्या इंग्रजी दैनिकांतील बातम्यांचा पाठपुरावा घेतलेला आहे हे पाहात बैसलो! (सातवीत असताना आम्ही नकाशात गावांची नावे ओळखण्याचा खेळ खेळायचो. आता या वयात ते बरे न दिसे. तेव्हा मग आम्ही एक नवाच खेळ शोधून काढिला, की मुंबई सकाळ घ्यायचा आणि त्यातील बायलाईन स्टोऱ्या कुठल्या बरे आंग्लभाषी दैनिकाने आधीच छापिलेल्या आहेत हे हुडकूनी काढायचे! यात आम्हांला आश्‍चर्य वाटते ते याचेच, की मिरर, मिड-डे, एचटी, डीएनए, टैम्सॉफिंडिया या वृत्तपत्रांना कसे काय बोआ कळते की ही ही बातमी चार दिवसांनी सकाळमध्ये येणार आहे! आधीच छापून टाकितात लेकाचे त्या बातम्या! काही वृत्तपत्रीय नीतिमूल्येच राहिली नाहीत या आंग्ल दैनिकांत!)
त्यानंतर मग काय चाललेय मराठवाड्यात असे म्हणत मुंबईतला लोकमत वाचिला. मग आहेत का केतकर इंडियात असे म्हणत लोकसत्ता डोळ्यांपुढती घेतिला आणि आम्ही एकदम क्‍नफ्युजच झालो!

आपण लोकसत्ता वाचित आहोत की लोकमानस हेच समजेनासे झाले! चाळीशीची काच बनियनने पुसून घेतिली व पुन्हा पाहिले, तरी संभ्रम कायम! म्हटले, हे आपण वाचित आहोत ते वृत्तच आहे ना? दिसते तर बातमीच. मथळा होता "पाहुण्या तीन टिंब पाहुण्या, मग खालच्या ओळीत परत ये उद्‌गारचिन्ह' तिस बायलाईनही होती ः सुरेंद्र हसमनीस. (पाहा अगर वाचा - लोकसत्ता, दि. 26.7.7, पृष्ठ 1)

हसमनीस म्हणजे नारायण राणे मुख्यमंत्री असताना ज्यांच्या डोंबोलीच्या घरी गेले होते ते. चंदुअंकल ठाण्यात गेल्यानंतर जे टाकोटाक लालबागेस परतिले ते. तुम्हांस सांगतो, पागोट्याकडं पाहात धोतर फेडणारी बातमी लिहावी ती हसमनीसांनी!
अवघ्या पश्‍चिम महाराष्ट्राचे राजकारणी तोंडपाठ असणारा हा माणूस!
पण कचेरीतल्या राजकारणाने मागे राहिला! (असे ते व राजू कुलकर्णी व राहुल बोरगावकर म्हणतात!!)

पण "पाहुण्या तीन टिंब पाहुण्या, खालच्या ओळीत परत ये उद्‌गारचिन्ह' याला का बातमी म्हणायचे देवा?
तीही पहिल्या पानावरची बातमी?
आज मिसिंगची बातमी छापलीत, उद्या जाहीर नोटीसा छापाल! तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, माझे अशील हे... ऐसे.
आणि याला आम्ही बातमी समजून वाचावयाचे?
पण मग नजरेसमोर सुधीरपंत जोगळेकरजी आले. आणि वाटले सामाजिक समरसतेत कमी पडत असल्याने आपलेच तर काही चुकत नाही ना?

आता आम्ही काही रानडे इन्स्टिट्युटमध्ये (पुण्याच्याच नव्हे, तर ह. भ. प. संजय रानडे यांच्या संस्थेतही) पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे बातमी म्हणजे काय, उलटा पिरॅमिड कसा असतो, बातमी कशाची होते वगैरे ब्रह्मज्ञान आम्हांस असणे शक्‍यच नाही, हे सपशेल मान्य. तेव्हा अखेर आपलाच हा अज्ञानअंधःकार हे ओळखूनी अत्यंतिक शरणागत भावनेने आम्ही म्हटले, की असेल बोआ ही सुद्धा बातमीलेखनाची नवोन्मेषशाली अभिनव पद्धत!!

आणि एकदा हे मान्य केल्यावर मग पुढचे अवघेचि सोपे झाले!
कालच्या लोकसत्तेत आषाढी वारीची बातमीच नव्हती. आजच्या (भारतीय सौर 4 श्रावण शके 1929, आषाढ शुक्‍ल एकादशी, गुरूवार, दि. 26 जुलै 2007) लोकसत्तेत आषाढी वारीची बातमी आहे ती मागूनी दुसऱ्या पानावर (पृष्ठ क्रमांक 10). त्याचवेळी "विवा' या सुबक इस्टमनकलर पुरवणीत "फॅशनपंढरीची वारी यंदाही...' हा विचारप्रक्षोभक लेख मात्र आहे. तर आठ लाख लोकमान्य लोकशक्ती जेथे एकत्र येते त्या वारीबद्दल अशी ही आस्था कोठून, कशी व कशामुळे येते, असे प्रश्‍नही मग आम्हांस अजिबात पडिले नाहीत!
व आम्ही सुखेनैव लोकसत्तादी वृत्तपत्रे वाचू लागिलो!

बोला... पुंडलिका वरदा हारी विट्टल....

हॅप्पी आषाढी!!

Monday, April 7, 2008

आबूरावांचे बुंग बुंग!

(मुंबैतले काही थोरच पत्रबंधु आणि भगिनी बोईंगचा कारखाना याचि डोळा बघणेकरीता गतवर्षी स‌ंयुक्त स‌ंस्थानांत जाऊन आले. तेप्रसंगी आम्हांस खूपच पोटदुखी जाहली. तेसमयी प्रसवलेला हा लेख...)

""वैनी, आहेत का आबूराव?''
""हायेत की! ते काय बेडरूममधी फेऱ्या मारत्यात!''
""मॉर्निंग वॉक सुरू आहे वाटतं!''
""डोंबलाचं मॉर्निंग वॉक! दोन्ही हात हवेत पसरून घरभर फिरत्यात बुंग बुंग करीत! अमेरिकेस्नं परतल्यापासून ह्ये असंच चालू हाय... बोईंग वॉक!''
""म्हणजे जेट लॅग उतरला नाही वाटतं अजून...''
""कसला जेट लॅग अन्‌ कसलं काय! नाटकं मेली! जेटमधी सम्दं मोफत. नेट लावू लावू पित्यात अन्‌ म्हंत्यात जेट लॅग!''

(आबूराव वैनी खूपच वैतागलेल्या दिसत होत्या. वास्तविक आपले येजमान अमेरिकेला साक्षात्‌ बोईंग विमानाचा कारखाना पाहण्यास गेले होते - तेही एअर इंडियाच्या विमानाने - फुकट - म्हटल्यावर त्यांचा चेहरा कसा "प्रफुल्ल' दिसायला हवा होता! आपले येजमान म्हणजे उत्तर ध्रुव पाहून येणारा पहिला मराठी व "प्रतापी' पत्रकार ठरला आहे हे जाणून त्यांना किती "भूषणा'वह वाटायला हवे होते! पण नाही! कचेरीतले सहकारी आणि बायको यांच्यात याबाबतीत भल्तेच साम्य. कुणाचे आणि कसले कौतुक म्हणून करायचे नाही!!)

""वैनी, अशा चिडू नका हो. अहो, आमच्यासारख्या बोरूबहाद्दरांना जेथे विमान ही फक्त लांबूनच पाहायची गोष्ट, तिथं आबूराव विमानात बसून चक्क बोईंग विमानाची फॅक्‍टरी बघून आले - सरकारी खर्चाने! उत्तर ध्रुवावर स्वारी करून आलेले पहिले मराठी पत्रकार म्हणून त्यांचे नाव उद्या वृत्तपत्रांच्या इतिहासात लिहिले जाईल! आहात कुठे!!''
""काय सांगू नका त्याचं. त्यावरनंबी वाद हायेत की ध्रुव कोनी पैल्यांदा पाह्यला! ते पद्मभूषण देसपांडे म्हंत्यात अख्ख्या प्रवासात ते खीनभरसुद्दा झोपले नव्हते... म्हनून त्यांनीच पैल्यांदा ध्रुव पाह्यला!''

(बरोबर आहे! नसणारच झोपले! ते अमेरिकेला देले अन्‌ इकडे छगनरावांनी दक्षिण दिग्विजय केला. वृत्तांकनाला देसपांडे नेमके गैरहजर!! झोप नाही उडणार तर काय होणार? पन देसपांडे जागे म्हटल्यावर प्रधानजी कसे झोपले?)

""बरं वैनी, आबूरावांनी आणलं तरी काय अमेरिकेतून?''
""हे काय आननार? मंत्रालयातलं रिपोर्टर ना हे. बोईंगच्या दिनेश केसकरांशी जानपहेचान वाढवून आलं. बोईंगमधी कुनाच्या बदल्या-बढत्या करायच्या तं उपेग व्हईल म्हंत्यात!''
""चालायचंच! किमान या भेटीतनं त्यांचं इंग्रजी संभाषण तर फाडफाड झालं असेल. चांगले चार-पाच दिवस इंग्रजी लोकांमध्येच होते.''
""त्वांड बगा इंग्रजी बोलनाराचं! अवो हापिसात पीआरवाल्या पोरींशी बोलायचं म्हन्लं, तर दुसऱ्याकडं फोन देत्यात! अमेरिकेचा विसा घ्यायला गेलते तव्हा यांचं इंग्रजी ऐकलं तिथल्या बाईनं. पैल्यांदा पेनजॉन घेतलं म्हनं तिनं. म्हनली, हे आसं इंग्रजी बोलाया लागले तिथं तं ते बोईंगचे शिक्‍युरिटीवाले अरब अतिरेकी समजून गोळ्या घालतील! मंग त्यांची लई फोनाफोनी झाली एरिंडिया आन्‌ बोईंगवाल्यांशी. शेवटी आसं ठरलं, का ह्ये जातील तिथं मराठी मानसंच ठेवायची! म्हंजी मग भानगड नको!! आपलं (?) दिनेश केसकर तर उमरावतीचंच. विमानातबी कराडचं बाबासायेब जाधव, देवरूखाचं नंदकुमार हेगिष्टे असं कोन कोन होतं. बरं यांनी विमानात कायबाय इंग्रजी पिक्‍चर तरी बगायचं का नाही? तेबी मराटीच पाह्यलं.''
""कमालच झाली ही म्हणायची!''
""अवो, खरी कमाल वेगळीच हाये. आल्याधरनं सारकं बुंग बुंग चाललंय. मला हवाई सुंदरी म्हनत्यात. कव्हा कव्हा रामराव आदिकांवानी करत्यात. अमेरिकेत रात पडली तर इथं गादी टाकायला घ्येत्यात... काय इचारू नका! आनी आता या अवतारात हापिसात पाटवनंबी बरं दिसत नाही...''
""एवढंच ना? अहो मग त्याच्यावर साधासोपा उपाय आहे. सगळेच तो करतात. त्यांना या अमेरिका वारीवर आर्टिकल लिहायला लावा. एका फटक्‍यात सगळा ताप उतरल!''

आमचे बहिर्जी नाईक्‍स सांगतात, येत्या रविवारी विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये या अमेरिकावारीवर लेख येणार आहेत. म्हणजे सगळ्यांचाच आबूराव झाला होता की काय?
बरं हे तर हे...
अजून राहीबाई आणि कुमुदताई अमेरिकेतनं यायच्या आहेत. (मुख्य सचिव जॉनी जोसेफ अमेरिकेला थांबले होते ना, अगदी तश्‍शाच त्याही अमेरिकेला थांबल्या होत्या!) म्हणजे त्याच्या पुढच्या रविवारी त्यांचे लेख असणारच.
एकंदर काय, तर येते काही दिवस सगळ्याच पत्रांतनं हे बुंगबुंग चालणार!

Friday, April 4, 2008

काढीन मीही एक वाहिनी...

मुंबईच्या वातावरणात सध्या एन्फ्लुएंझाचे विषाणू आणि नव्या वाहिन्यांची चर्चा एवढेच दिसते आहे. प्रत्येकाच्या तोंडात एकच ः स्टार माझा पाहिलास? कसा वाटला? आयबीएनचे मराठी चॅनेल कधी येणार? निखिल आणि लोकमतचे पटणार का? मिलिंद कोकजेंचे असे काय झाले की त्यांनी पत्रकारिताच सोडली? संजीवकुमार लाटकर यांनी मल्टिराजीनामा दिला का? ते कोणत्या चॅनेलमध्ये जाणार? मग सकाळच्या चॅनेलचे काय होणार?

आमच्या बहिर्जी नाईक्‍सनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाखेरीस निखिल-लोकमत वाहिनी नक्की येतेय. आणि सकाळच्या चॅनेलचे काम कृष्णा खोरे पाटबंधारे कामांप्रमाणेच(!) जोरात सुरू आहे. अलीकडेच सकाळचे 60-70 जण म्हणे खास प्रशिक्षणासाठी हैदराबादेस गेले होते. तर एकूण सर्वांचे ठीकच चालले आहे.

वास्तविक चॅनेल काढणे हे काही फार अवघड काम नाही. काय लागतं काय त्याच्यासाठी? दीडदोनशे कोटी रूपये (आपल्याला काय नाय वाटत एवढ्या पैशांचं!), एखाददोन स्टुडिओ, बालवाडीतली मुले-मुली आणि दोनेक संपादक, सीईओ वगैरे मंडळी. ती काय हल्ली... मिळतात! (काय गंमत आहे ना! संपादक पायलीला पन्नास मिळतात आणि चांगले उपसंपादक मात्र द्याहीदिसा कंदिल घेऊन गेले तरी सापडत नाहीत! हवं तर लोकमतला विचारा. बिचाऱ्या संपादकांना तिथे पाने लावावी लागतात.)

तर नमनालाच एवढे घडाभर तेल लावल्यानंतर मूळ मुद्द्यावर येतो.
मुद्दा असा, की चॅनेल काय कोणीही काढू शकतो. दस्तुरखुद्द विसोबासुद्धा.
तुम्हांस सांगतो...

मनात आणीन तर बच्चमजी
काढीन मीही एक वाहिनी
दिपतील डोळे, इतरांसाठी
असेल ती विद्युतदाहिनी

सकाळसकाळी रोज प्रसारिन
बैठकीची ढिंगटांग लावणी
संपादकांची सुबक मेव्हणी
कुकरी शोची खास पाहुणी

राऊत करतील शो अध्यात्मिक
जिथे केतकर असतील अँकर
तारतम्यला लावून चाली
गाणी गातील स्वतः टिकेकर

देतील जेथे क्राईम स्टोऱ्या
दाऊद आणि राजन भाई
कोण खुलासे करील त्यांचे
कोणा गा मरणाची घाई?

...पण आम्ही आमच्या सगळ्याच योजना आताच का खुल्या करू? उद्या वेळेवर चॅनेल नाहीच आला, तर तुम्ही लगेच म्हणायला मोकळे, की विसोबा, सकाळच्या, सॉरी सॉरी... तुमच्या चॅनेलचे झाले काय?
हे म्हणजे मारूती कांबळेचे झाले काय असे झाले!
अखेरपर्यंत कोडेच!!

Thursday, April 3, 2008

स्टार माझाच्या स्टुडिओतून

नदीच्या घाटावर बसून एक संगमोत्सुक विवाहिता
ये तो बडा टॉइन है या भावगीताच्या तालावर
अंतवस्त्रं धूत बसलेली पाहून एकूणच
आपल्या संस्कृतीचे काय होणार असे म्हणत
आम्ही ठरविले की अशा वृत्तवाहिन्या न पाहिलेलेच बरे
तर सौभाग्यवती म्हणाल्या की अशाने आपण
मारेकरी होऊ कारण की आता कुठे
आपल्या मंडळींना वाहिन्या काढावी अशी जाग येत आहे
म्हटल्यावर आम्ही नवी वाहिनी कोणती पाहावी असा
सुविचार करीत बसलो असताना सौभाग्यवती आतूनच म्हणाली की स्टार माझा.
म्हणजे आता हे नवे कोणते शीतपेय बाजारात आले काय, या प्रश्‍नावर ती म्हणाली
तुम्ही स्वतःच जाऊन का पाहात नाही
म्हणून आम्ही स्टार माझाच्या कार्यालयात गेलो
तर तेथे खूपच लहान लहान गोजिरवाणी मुले दिसली
म्हटल्यावर हरकून विचारले की असे का, तर ते कवितेत म्हणाले
की या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या
न्यूज म्हणा रे न्यूज म्हणा स्टार माझा तुमचा समजा
अशी जाहिरात केल्यामुळे आता मुलेही
ये आई मला च्यानेलवर जाऊ दे
एकदाच गं टीव्हीवर मला न्यूज न्यूज देऊ दे
असे गीत म्हणू लागली आहेत
म्हटल्यावर आम्ही मुले कशा बातम्या देतात
हे पाहण्यासाठी स्टुडिओत गेलो
तर तेथे एक छानशी मुलगी
असावा सुंदर अविनाशचा बंगला
येणेप्रकारे छत्रपती अविनाश भोसले यांच्यासंबंधीचे वृत्त देत होती
ते ऐकून आम्ही आजची मुले किती निरागस असतात
असे धन्य होत पुढे गेलो तर तिथे गुन्हेगारीविषयक कार्यक्रमात निवेदक
लकडी की काठी
काठी का "घोडा'
इसके सर पे
उसने मारा हाथोडा
असे वृत्त देताना पाहून तर आमच्या डोळ्यांत आनंदाश्रूच येऊ लागले
?ह्‌णून आम्ही मागे फिरलो तर तिथे
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो असे हवामानवृत्त सुरू होते
ते ऐकून आम्ही श्रुती धन्य जाहल्या व आता
आपल्या भावी पिढीचा मुळीच काळजी नाही
व मराठी संस्कृतीही शाबूतच राहणार असे म्हणत
बीबीसीवर काय चालले आहे ते पाहू या म्हणत घरी परतलो.

Saturday, March 29, 2008

माझ्या खवचट खेचरा...

गेले चार-पाच दिवस तू कोठे उलथला होतास? माझा फोनही घेत नव्हतास! स्वतःला उद्धव ठाकरे समजतोस की काय? लक्षात ठेव, आपली युती अशी नाही तोडू देणार मी! गेल्याच महिन्यात वडाच्या फांदीला फेऱ्या मारून तुला सात जन्म मागून घेतला आहे. या महिन्यातही बरीच व्रते-उद्यापने, उपासतापास येतात. ते "सकाळ'मध्ये साग्रसंगीत येईलच. त्यानुसार सर्व काही यथासांग करण्याचे मी ठरविलेच आहे. तेव्हा तुझी सुटका नाही!!

माझ्या उचलखोर उचापत्या,
"सकाळ'मध्ये यंदा श्रावण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहेत. तेव्हा "सकाळ'वाले "व्रत'स्थ महिलांचे, मंगळागौर जागविणाऱ्या भगिनींचे, उपवास करणाऱ्या पुरंध्रींचे फोटो छापणार आहेत काय, याचीही जरा चौकशी करून ठेव. छापणार असतील, तर नऊवारी साडीची सोय आताच करून ठेवलेली बरी. तुला आठवते? गेल्यावर्षी आपण दोघे मिळून अख्खे हिंदमाता फिरलो, तरी नऊवारी मिळाली नव्हती. तेव्हा मटामध्ये फोटो छापून येत होते! यंदा तरी तू माझा फोटो पेपरात छापून आणणार ना? हवे तर ब्लॉकचे पैसे देऊ आपण त्यांना!! असो.
पण तू खरेच कुठे गेला होतास? तुझ्या कचेरीतले लोक म्हणतात, की तुला पत्रकारांचा एड्‌स झालाय! - ऍक्वायर्ड इंटेलिजन्स डिफिशियन्सी सिंड्रोम!! माझ्या विसविशीत विसोबा, तुझ्याबाबतचे हे निदान तर मी मागेच केले होते! खरे तर मराठी पेपरांत हा रोग आता बराच पसरल्याचे दिसत आहे. या रोगाचे गावठी नाव "बनचुके' असे असल्याचे म्हणतात. सतत नव्या गोष्टींना नावे ठेवायची, नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती यांना नाके मुरडायची अशी काही या रोगाची लक्षणे आहेत. तुझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून ती सहज दिसतात. नव्यातील चांगल्या गोष्टींचे स्वागत करायला जितक्‍या लवकर शिकाल, तितके बरे! नाही तर मग तुमचीच एक मोठी विसंगती होऊन जाते. आणि मग लोक तुम्हांला हसतात, तर तुम्हांला वाटते की तुमच्या विनोदांना हसतात! एड्‌समध्ये असेही भ्रम होतातच म्हणा!

माझ्या रागीट रेडक्‍या,
तुला माझा राग तर नाही ना आला? रागावू नकोस रे! रागावलास, की तू सामनाच्या ले-आऊटसारखा दिसतोस! अरे, अलीकडे तू सामना पाहिलास का? राऊत साहेब रजेवर असून, भारतीताई त्याचे संपादन करीत आहेत, असे काहीसे झाले आहे काय? असो. मी रागावण्याबद्दल बोलत होते. तू माझ्यावर रागावणार नाहीस याची खात्री असल्यानेच खरे तर मी एवढे स्पष्ट लिहित आहे. अन्यथा मला काय अग्रलेख लिहिता येत नाहीत? अग्रलेख म्हणजे लोकसत्ताचे सोडून बरे का! नाही तर तुझा पारा एकदम चढायचा! तुम्ही केतकरी संप्रदायवाले ना!! पण माझ्या आगाऊ अडाण्या, तुम्ही केतकरांना आता सांगत का नाहीत, की त्यांचे अग्रलेख मुख्य अंकाबाहेर छापत जा म्हणून! कारण अलीकडे त्यांच्या अनेक अग्रलेखांचा आणि मुख्य अंकाचा जणू काही संबंधच नसतो! अग्रलेखातले संपादकीय धोरण वेगळे आणि बातम्यांतले वेगळे असे काही विचित्र चालले आहे. हवे तर याविषयी एकदा कक्काजींशीही बोलून घे! माझे, त्यांचे, श्रीकांतजींचे आणि शुभदाताई चौकरांचे मत अगदी सारखेच असेल!!
असो. खूपच लिहिले. एवढे वाचायचे म्हणजे तुला त्रासच! त्यातच काल गटारी होती. म्हणजे डोके अजून उतरले नसेल! "ती' उतरली तर "ते' उतरणार ना!! तेव्हा येथेच थांबते.

एकट्या तुझीच,
सही

ता. क. - लोकसत्ताच्या नरिमन पॉईंट येथील स्थलांतराचा मुहूर्त ठरला का रे? कळव.

Friday, March 28, 2008

कसलं काय अन्‌ फाटक्‍यात पाय!

ना घरात, ना घराबाहेर, ना व्यासपीठावरून, ना व्यासपीठाखालून अशा पद्धतीने मावळते राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी तमाम प्रसारमाध्यमांच्या बुडाखाली एका अग्निपंखी सवालाचे मिसाईल डागले आणि मराठी पत्रसृष्टी विचारमग्न झाली.
भारतातील एक अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमे स्वीकारतील का? या कलामांच्या सवालाने सर्वांनाच तिढा घातला होता. जबाबदारी मोठी होती. आव्हान मोठे होते. प्रश्‍न जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा होता!

केतकरांनी (पक्षी : कुमार केतकर, एनआरआय एडिटर, लोकसत्ता) ठरविले, की यावर किमान एक अग्रलेख तर लिहिलाच पाहिजे. (रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यातच व्यासपीठावर अर्धवट बसून कलामांनी हा खडा सवाल टाकला होता. म्हणजे हे एकतर घरचेच कार्य होते. आणि दुसरे म्हणजे दंतशस्त्रक्रिया झाल्यानंतर बऱ्याच दिवसांत कुणाचाही बाईट न घेतल्याने त्यांचीही जरा गोचीच झाली होती!) तेव्हा त्य?ंनी फटाककन्‌ आपल्या टपोऱ्या अक्षरांत एक अग्रलेख लिहून काढला. (केतकरसाहेब, निवृत्तीनंतर लोकसत्ताच्या परंपरेनुसार तुम्ही कसे हो सकाळमध्ये जाणार? तुम्हांला तर संगणकावर लिहिताही येत नाही!) अग्रलेख तर लिहिला, पण पुढे काय? त्याचा लॉजिकल एंड काय? ते डावीकडून विचारात पडले...

इकडे डॉक्‍टर टिकेकरही आपल्या "स्टडी-फ्लॅट'मध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. आपलीच "जन-मन', "तारतम्या'दी ग्रंथसंपदा पुनःपुन्हा वाचूनही त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. चिंतन करकरून त्यांना श्‍वास घुसमटल्यासारखे वाटू लागले. जरा वेळाने त्यांच्या लक्षात आले, की आपल्या सदनिकेत एवढा धूर साचला आहे की आत ऑक्‍सिजन येण्यासही जागा नाही. तेव्हा त्यांनी खिडकी उघडून दुसरी सिगारेट शिलगावली. कलामांच्या सवालावर एखादे पुस्तक लिहावे काय? "श्रीविद्या'शी बोलले पाहिजे, असा उदात्त मध्यममार्गी अनुनासिक विचार त्यांच्या मनात तरळून गेला...

राऊत गणपतीवाले यांची अडचण वेगळीच होती. हे एक अब्ज लोक म्हणजे नेमके कोण? ते कोठे राहतात? पार्ल्यात, गिरगावात, डोंबोलीत की बदलापुरात? हे लोक विकेंडला कोठे जातात? त्यांचे अध्यात्म काय आहे? ते शिवसेनेत असतात की मनसेमध्ये? राज्यसभेवर जाण्यासाठी या एक अब्ज लोकांची मते आवश्‍यक असतात काय? त्यांच्या लक्षात काहीच येत नव्हते. त्यांनी मग उजवीकडून डाव्या दृष्टिकोनातून विचार सुरू केला, की बघू या टैम्सॉफ इंडिया काय करतेय ते. मग आपण आपले धोरण ठरवू...

त्याचवेळी संजीवकुमार लाटकर अतिशय काळजीपूर्वक टीव्ही चॅनेल्स पाहात होते. त्याचवेळी त्यांचे लॅपटॉपवर नेटसर्फिंग सुरू होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्‍यात नव्या कथेचा आराखडा घुमत होता. त्याचवेळी ते नाश्‍ताही करीत होते. मोबाईलवर बोलणे तर अखंड सुरूच होते. असे सर्व मल्टिकाम सुरू असतानाच त्यांचे कलामांचे करायचे काय या प्रश्‍नावरील चिंतनही सुरू होते. याविषयावर एफएमवर एखादे चर्चासत्र करावे? की चॅनेलवर डॉक्‍युमेंट्री? त्यांचे नक्की काही ठरत नव्हते...

हे सर्व सुरू असताना सकाळमध्ये सर्व संपादकांची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झाली होती. त्यात आधी आनंदराव आगाशे यांचा जागराचा कार्यक्रम झाला. मग साबडे, मग खोले, मग पाध्ये, मग मालकर असे सर्व मनसबदार बोलले. त्यावर राज्यातील सर्व आवृत्त्यांच्या सरदारांनी माना डोलावण्याचा कार्यक्रम झाला. (त्यांना वाटले हे सर्व आपल्याच चॅनेलबद्दल चालले आहे!) मग पुण्यातून कॉन्फरन्स संपविण्यात आली. तर या सर्व उपक्रमात असे ठरले, की श्री. कलाम यांच्या आवाहनावर विचार करण्याकरीता लवकरच पुण्यात ना उजवीकडे ना डावीकडे अशी बैठक घेण्यात यावी...

लोकमतमध्ये मात्र अद्याप सामसूमच होती. दिनकरबाबूजी औरंगाबादला गेले होते. आजही बारा पानांचा हा गोवर्धन आपणांस एकट्यानेच उचलायचा आहे, या विचाराने गिरधारी थकले होते. भारतात एक अब्ज लोक आहेत. त्यात दोन-चार चांगले उपसंपादकही असू नयेत व ते आपणांस मिळू नयेत, या विचाराने ते कालच्याप्रमाणेच आजही चिडचिडले होते...

येणेप्रकारे कलामांच्या सवालाने सर्वांनाच विचारात पाडले होते.
आणि मग दुसरा दिवस उजाडला....
धडधडत्या काळजाने आम्ही वाचनालयात गेलो.
एकेक पेपर चाळू लागलो.
म्हटलं, या लोकांनी काल कलामांना फारच मनावर घेतलं. आज काही उत्तम, उदात्त आणि उन्नत घोळ नाही ना घातला!
पण पेपर चाळले आणि सर्व शंका ढगात गेल्या!
राजकारण्यांचे कलगीतुरे
सर्वक्षेत्रीय घोटाळे
नोकिया आणि कंडोमच्या जाहिराती
मालिका आणि गणपती
सेन्सेक्‍स आणि बॉबी डार्लिंग
सारे काही जागच्या जागी होते.

क्त राष्ट्रपती तेवढे बदलले होते.
तेव्हा आम्ही एक अब्ज लोकांच्या वतीने कलामांना म्हटले, चाचा, कसलं काय आणि फाटक्‍यात पाय!

Sunday, March 23, 2008

पत्रसृष्टीतील वर्णव्यवस्था

गणपतीची (आजचा गणपती : वरची आळी, कातकरवाडी बु।।) शप्पथ, मटा जेवढा पुरोगामी आहे, यज्ञयाग करून सकाळ जेवढा पुरोगामी आहे आणि वास्तुशास्त्र छापून लोकसत्ता जेवढा पुरोगामी आहे तेवढेच आम्हीही पुरोगामी आहोत. तरीही आम्हाला असे नेहमी वाटते की आपल्या मराठी पत्रसृष्टीत एक वर्णव्यवस्था आहे. छुपी. लोकसत्तातल्या गटबाजीसारखी. ती असते, पण बाहेरून पाहणाऱ्याला दिसत मात्र नाही.
एका समाजशास्त्रज्ञाने त्यांचे वर्गिकरण केले आहे. ते येणेप्रमाणे :

मटावर्ण‌ : हा उच्चवर्ण. गणपती हे त्यांचे आराध्यदैवत. आपली पत्रकारिता ही अत्यंत देदिप्यमान असून, समाजपुरूषावर उपकार करण्याच्या हेतूनेच आपण सांप्रती अवतार घेतलेला आहे, अशी या वर्णाची समजूत असते. पार्ले, गिरगाव यानंतर डोंबिवली-बदलापूर ते थेट अमेरिकाच असा यांचा परिघ. त्याबाहेर धावते जग आहे हे त्यांना ऐकून माहित असते. मराठीत अन्य वृत्तपत्रेही निघतात हेही त्यांना ऐकूनच माहित असते. या वर्णाचा हल्ली "टैम्साफ इंडिया'पासून "मुंबई संध्या'पर्यंतच्या विविध जातींशी संकर झालेला असल्याने त्यातून काही वेगळेच धारावाही रसायन जन्माला आलेले दिसते. अर्थात नावापासूनच आंग्ल-मराठी सरमिसळ झालेली असल्याने या संकराचे यांना काही वाटत नसते, असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे.

लोकसत्तावर्ण : काहीही असो, कुणीही असो, एखादा डोक्‍यात गेला की तुटून पडणे असा क्षत्रियी बाणा (हा लालबागच्या पाण्याचा दोष नव्हे!) हे या वर्णाचे लक्षण. झाडीमंडळापासून अपरान्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खंडातील भ्रष्टांचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा यांच्या पूर्वजांनी केली असावी. आता मात्र कापे गेली भोके उरली अशी अवस्था आहे. या वर्णात सुवर्णास अत्यंत पूजनीय मानले जाते. त्यामुळे ते सोनियाची नाणी पूजतात. चिमटे, टोले अशी अस्त्रे ते नित्य वापरतात. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे जशी स्त्री असते, तशीच या वर्णाच्या यशस्वी वाटचालीमागेही महिला आहेत, असे म्हणतात. त्याचा पुरावा म्हणून समाजशास्त्रज्ञ त्यांच्या पुरवण्यांकडे बोट दाखवतात. नावातच सत्ता असल्याने या वर्णीयांना त्याची बाधा झाली असल्याचे दिसून येते व ते अन्य वर्णीयांकडे त्याच दृष्टीने पाहतात.

सकाळवर्ण : शुभ्र पोचट रंग हे या वर्णाचे व्यवच्छेदक लक्षण. सर्वच ग्राहकांना खुश ठेवण्याच्या वैश्‍यवृत्तीने व्यवसाय करण्याचे संस्कार असल्याने हे वर्णीय कोणाच्याही अध्यात वा मध्यात नसतात. यांची एक पवित्र पोथी असून, त्यात या वृत्तीला निःपक्षपातीपणा असे म्हटल्याचे दिसते. या वर्णात कुलाचार, परंपरा यांस अतिशय महत्त्वाचे स्थान असून, कोणताही निर्णय ते जातपंचायतीच्या माध्यमातूनच घेतात. या जातपंचायतीची बैठक नेहमीच सुरू असते. तेथे निर्णय घेतले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी होण्याच्या आतच नवीन निर्णय घेतले जातात. हे चक्र ऋग्वेदकालापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. यामुळेच या वर्णात "निर्णय प्रलंबन स्तोत्र' आवडीने म्हटले जाते असे काही धर्मशास्त्रज्ञांचे मत आहे. या वर्णीयांनी शिक्षण व्यवस्थेत चांगलीच भर घातली असल्याचा इतिहास आहे. शिक्षणानंतर येथील अनेक जण वर्णांतर करतानाही दिसतात.

लोकमतवर्ण : हल्ली ज्याला बहुजनसमाज म्हटले जाते तो हा वर्ण. यास उच्चवर्णीय शूद्र म्हणतात, तसेच काही जण क्षुद्र असेही म्हणतात. मात्र या वर्णाचे अनुयायी सर्वत्र पसरले आहेत. या वर्णीयांना अन्य वर्णात सहसा सामावून घेतले जात नाही. मात्र अलीकडे वैश्‍यवर्णाशी यांचे रोटीसंबंध जडल्याचे दिसून येते. हा वर्ण अन्य वर्णांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत असला, तरी त्याची काही बलस्थानेही आहेत.

पत्रसृष्टीतील वर्णव्यवस्थेचा विचार करताना भटके-विमुक्त आणि आदिवासींचाही विचार टाळता येणार नाही, असे हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो. त्याच्या मते "तारा' व "प्रभात' ही दोन नक्षत्रे मावळल्यानंतर झालेल्या उलथापालथीमध्ये हे भटके-विमुक्त काहीसे अदृश्‍य झाले होते. मात्र अलीकडेच काही मानववंशशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत यांची संख्या आता चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. या भटक्‍या आणि विमुक्त जाती-जनजातींचे वैशिष्ट्य म्हणजे हे सतत अस्थिर असतात. ते कपाळावर स्टारच्या आकाराचे चिन्ह लावतात. त्यांच्यात काही "झी'लकरी असल्याचे आढळून आले आहे. त्यांतील अनेकांच्या कुळात डंबेल्ससदृश वस्तूला अत्यंत महत्त्व असते. त्या वस्तुच्या साह्याने ते भूल टाकतात अशी बोलवा आहे. या भटक्‍या आणि विमुक्तांच्या मेंदूच्या आकाराबद्दल सध्या "24 तास' संशोधन सुरू असून, सर्वज्ञानी असल्याचा गंड त्यांना कोणत्या कारणाने व केव्हा झाला हेही अद्याप एक गूढच आहे. याच वर्णातील काही लोक प्रगतीचे वारे न शिवल्याने आदिवासीच राहिले असून, त्यांचा सपट महाशोध घेण्याचा समाजशास्त्रज्ञांचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र हे लोक खूपच बुजरे, दबलेले, पिचलेले असे असल्याने ते दूरदर्शनातच धन्यता मानतात, असे सांगण्यात येते.

Saturday, March 22, 2008

लेले आणि मी

"तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजत असलात, तरी तुम्ही एक नंबरचे गाढव आणि घोडे आहात, विसोबा!''

शेजारचे लेले रोज सकाळी आपला म.टा. वाचून झाल्यानंतर "लोकसत्ता' घेऊन जायला डॉक्‍टर टिकेकरांकडे जात. आज त्यांनी आमच्याकडे कशी वाकडी वाट केली आणि तेही इतकी फणफणत हे काही आम्हांला उमजले नाही. मग लक्षात आले, की डॉक्‍टर आता महाराष्ट्राचे राहिले नाहीत. एशियाटिक झालेत! पूर्वी ते आणि लेले असा दोन निवृत्तांचा टिचकीसंवाद चालायचा. परंतु आता एशियाटिकमध्ये बऱ्याच शस्त्रक्रिया करायच्या असल्याने, बऱ्याच जणांना "टाटा' करायचा असल्याने डॉक्‍टरांकडे लेलेंना देण्यासाठी वेळ नसणार. आम्ही तसे रिकामे. त्यामुळे लेलेंनी आज त्यांची पायधूळ आमच्या खाटेवर झाडली असावी.

"बरोबर आहे लेले तुमचं. आम्ही दोन्हीही आहोत. खेचर! पण तुम्हांला सकाळी-सकाळी एवढं चिडायला काय झालं? आज मटाऐवजी सामना वाचलात काय?''
"चिडू नको तर काय? तुम्ही हे जे उद्योग चालवलेत त्याने सगळे खुश आहेत असं वाटलं काय तुम्हांला?''
"कोणते उद्योग लेले?''
"भिंतीला तुंबड्या लावण्याचे!... अहो विसोबा, आम्हांलाही कळतात बातम्या म्हटलं. आता तुम्ही दैनिकाचं काम पाहात नाही. त्यामुळे रिकामा वेळ भरपूर. तेव्हा सुचतात असे काही भंकस उद्योग, याच्या-त्याच्या टोप्या उडवायचे. कुणाला गणपतीवाले म्हणता, कुणाला एनआरआय एडिटर! कुणाच्या नावाने काहीबाही गाणी लिहिता, कविता करता. पेपरांवर टीका करता. ही काही सभ्य माणसाची लक्षणं नाहीत!''
"लेले, अहो, ती एक निर्विष भंकस असते. ती एवढी मनावर घ्यायची नसते. कोणी घेतही नसेल म्हणा... पण तुमचे कलंदर, टिचकीबहाद्दर, झालंच तर आताचे सूर्यभट्ट, चकोर, तंबी दुराई, विनोदी पक्षनेता, स्वतःचा नावपत्ता सांगत परत टोपणनावाने लिहिणारा मामू हे लोक राजकारणी, नट-नट्या, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर लिहितात ते मात्र तुम्हांला चालतं! आणि आम्ही पत्रकारांबद्दल लिहिलं तर तुम्हांला राग येतो, याला काय म्हणायचं? हे म्हणजे आमच्या हिंदुहृदयसम्राटांप्रमाणे झालं! ते कुणालाही काहीही म्हणणार. त्यांना कोणी काही म्हटलं तर मात्र कचेऱ्या तोडणार! हे वागणं तुम्हांला तरी पटतं का लेले?''
"ते वेगळं आणि हे वेगळं. तुम्हांला आपलं चांगलं काही दिसतच नाही.''
"तसं नाहीये लेले. आजकाल मटासुद्धा आम्हांला आवडायला लागलाय. खूपच बदललाय तो! लोकसत्ताचं एडिट आणि ऑपेड पेज वाचलं नाही तर चुकल्यासारखं होतं आम्हांला. लोकमतची रविवार पुरवणी, सकाळचे जागर, मुक्तपीठसारखे वेगळे उपक्रम... भावतं आम्हाला हे सारं. पण लेले, हैदराबादला स्फोट होऊन चाळीसेक माणसं मेल्याची बातमी देताना "हादराबाद' असं थिल्लर हेडिंग देण्याचा "मट्ट'पणा कोणी केल्यावर मग भंकसशिवाय करणार काय?''
"म्हणजे तुम्ही आता सगळे पेपर सुधारायला निघालात म्हणा की! तुम्ही स्वतःला समजता तरी कोण म्हणतो मी!''
"लेले, प्रश्‍न तो नाही. प्रश्‍न हा आहे की आम्ही सगळे मिळून स्वतःला, म्हणजे प्रिंट इंडस्ट्रीला काय समजतो?''
"मी नाही समजलो!''
"असं बघा, आम्ही पेपरवाले त्या चॅनेलवाल्यांना किती झोडून काढत असतो...''
"मग झोडायला नको? अगदी ताळतंत्र सोडलाय त्यांनी. किती अतिरंजित आणि भडकपणाने दाखवतात हो सगळं. पाहावत नाही. दिवसभर आपलं तेच ते दळण. परवा ऐश्‍वर्या गर्भारशी आहे की नाही याची समीक्षा चालू होती. नशीब तिचे सोनोग्राफी रिपोर्ट दाखवले नाहीत! हल्ली मी बातम्यासुद्धा एकट्यानेच पाहतो. आजुबाजूला नातवंडं असली की अवघडायला होतं हो!''
"मराठी पेपरांत तेवढं होत नाही अजून! पण आम्हीही चॅनेलवाल्यांच्या फार मागे नाही आहोत, लेले. ही ही रंगीत पानं, रंगीत मोठमोठे फोटो, ग्लॉसी पुरवण्या, त्यांचे विषय सगळंच चॅनेल्सच्या वळणावर चाललेलं आहे. तिकडं लाफ्टर चॅलेंज असतं, तर इकडं हास्यरंग. तिकडं सिरियल्स असतात, तसं इकडं "तू सुखी राहा'सारख्या क्रमशः कादंबऱ्या. तिकडं कुकरी शोज तर इकडं पाककृती. तिकडं बातम्यांमध्ये विनोद करायला लागले, तर इकडे पहिल्या पानावर विनोदी लेख बातम्या म्हणून यायला लागले. इकडं मटा-लोकसत्ता असेल तर तिकडं आयबीएन असतो. इकडं वार्ताहर-संध्यानंद तसा तिकडं इंडिया टीव्ही-आजतक.... एकूण काय, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी! आणि वर आम्ही त्यांना पत्रकारितेचा धर्म शिकवणार. ही भोंदूगिरी नाही वाटत तुम्हांला?''
"भोंदूगिरीचं माहित नाही. पण विसोबा, तुमचं ऐकल्यावर असं वाटू लागलंय की त्या जशा वृत्तवाहिन्या तशाच तुमच्या या पत्रवाहिन्या! आहे काय आणि नाही काय!!''

शेळी शिंकली...

होय, शेळीला शिंक आली.
चांगली सटकून शिंक आली.

पाहता पाहता बातमी कानोकानी झाली. मंत्रालयात, विधान भवनात, आमदार निवासात कुजबुज सुरू झाली. अधिवेशन नसल्याने सध्या मुंबईत फारसे आमदार नव्हतेच. होते त्यांनी पटापट मतदारसंघात मोबाईल लावले. पीएंना रेल्वेचे आरक्षण करायला धाडले.
शेअरबाजारचा कारभार नुकताच कुठे सुरू झाला होता. निर्देशांक "कालच्या बंद'हून थोडासा वर गेला होता. पण दलालांच्या मुखावर आनंद नव्हता. बेपारी मंडळींचे एक वेगळेच माहितीचे महाजाल असते. त्यातून ही बातमी आणखी काही काळातच अहमदाबाद, सूरत, वडोदरा अशी होत होत सिंगापूर, दुबई, मलेशिया, अमेरिका, ब्रिटन अशी पसरणार होती. त्यानंतर काय होणार हे दलालांच्या चेहऱ्यावर आताच वाचता येत होते.

इकडे वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर अद्याप आपल्या नेहमीच्या गतीने विविध वृत्तपत्र कार्यालयांतल्या संगणकांवर बातम्यांचा रतीब घालत होते. पण हे आणखी काही काळच. यानंतर ज्या वेगाने फ्लॅश आणि अपडेट्‌स येणार होते त्यांपुढे संगणकांच्या सीपीयूचा वेगही कमी पडणार होता.
मंत्रालयातल्या पत्रकारकक्षाला मात्र नेहमीप्रमाणेच अद्याप जाग आलेली नव्हती. एका उर्दू पेपरचा लांब दाढीवाला वार्ताहर तोंडावर वृत्तपत्र ठेऊन कोचावर पेंगत पडला होता. नव्यानेच या बिटला आलेला एका दैनिकाचा पत्रकार उगाच आपल्या हातात मोठे स्कूप असल्याचा आव आणत खिडकीशी उभा राहून मोबाईलवरून बहुतेक त्याच्या चॅनेलमधील मैत्रिणीशी मोठ्याने बोलत होता. काही फुटकळ पत्रकार आज कुठे जावे याचा विचार करीत वृत्तपत्रांची चाळवाचाळव करीत खुर्च्यांवर बसले होते. बाकी सर्व शांत होते.

आणि जणू काही कोणी आधीच ठरविल्यानुसार एका विशिष्ट क्षणी तमाम वृत्तपत्रांच्या कार्यालयातले दूरध्वनी, संपादकांचे, वृत्तसंपादकांचे, मुख्य वार्ताहरांचे मोबाईल किणकिणू लागले. पण अजूनही सगळाच गोंधळ होता.

मध्ये मुंटावाल्यांची सकाळची बैठक सुरू होती. तेवढ्यात मुकेशकुमारांना मोबाईल आला. - शेळी शिंकली. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर "रोजा'तली शेळ्यांमधून फिरणारी अल्लड, नटखट, मोहक मधु तरळून गेली. पण गेले ते (पानभर चित्रपट परिक्षणाचे) दिन गेले! मॅनेजमेन्टच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे एक सुस्कारा सोडत ते कामाकडे वळले आणि प्रवीणला म्हणाले, चांगली बातमी आहे. शेळी शिंकली. पण आपल्याला काय त्याचं? ते (पक्षी ः संजीवकुमार!) मुख्य अंकात बघतील. आपण परवा ठरल्याप्रमाणे आज कुत्र्यांचीच बातमी चालवू.

साबडे अद्याप घरीच होते. सोमवारच्या अंकात आलेला "म्हाताऱ्यांनी काय घोडं मारलंय...?' हा आपलाच लेख ते चौदाव्यांदा वाचत होते. "अमिताभने तरूण मुलीच्या प्रेमात पडायचं नाही हा अट्टहास का?' हा आपलाच सवाल वाचताना त्यांना जाम गुदगुल्या होत होत्या. अखेर (एकदाचा) त्यांनी तो जिया खानचे छायाचित्र असलेला लेख बाजूला ठेवला. शेळी कशामुळे शिंकली हे नक्की समजलेले नव्हते. पण आपला त्याविषयावरचा अग्रलेख लिहून ठेवलेला बरा असे म्हणत त्यांनी संपादकांना (पक्षी : राऊत, गणपतीवाले) दूरध्वनी लावला.
साबडे दूरध्वनीवरून बोलत होते त्यावेळी खांडेकरसुद्धा त्यांच्या दूरध्वनीवरून बोलत होते. खास विलासरावांची खास शिकागोहून खास मुलाखत घेतल्यानंतरचे बहुत सुकृतांची जोडी असे खास भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ते पाहून डेस्कवरल्या तमाम उपसंपादकांच्या मनात, विलासराव मुंबईत आल्यानंतर जे सांगणारच होते, ते ऐकण्यासाठी अमेरिकेत "एसटीडी' करून पैसे वाया घालविण्याची खरेच आवश्‍यकता होती का, असा "मटा कौल' तरळत होता. पुन्हा खास विलासरावांनी खास मुलाखतीत असे काय खास सांगितले हा "आजचा प्रश्‍न' होताच. बहुत सुकृत दूरध्वनीवर अजूनही बोलतच होते. शेळी शिकागोत नसल्याने ती शिंकल्याचे अद्याप त्यांना कळायचे होते.

लोकसत्तात मात्र वेगळी परिस्थिती होती. साथी समरसेन यांची कॉपी केव्हाच तयार होती. उपसंपादकांच्या टेबलावर ती आपटून ते आपल्या आताच झोपेतून उठल्यासारख्या आवाजात खडसावत होते, ""आता वृत्तांतमध्ये टाकून तिची वाट लावू नका. पहिल्या पानावर घ्या. संपादकांशी (पक्षी : कुमार केतकर, एनआरआय एडिटर, लोकसत्ता) बोललोय मी.''
उपसंपादकाने कॉपी पाहिली. हेडिंग होतं, ""शेळी जाते जिवानिशी आणि नेते म्हणतात शिंकली कशी?'' त्याने कॉपीवरून झरझर नजर फिरवली. दुष्काळ, गहू, चे गव्हेरा, साखर, शिंक, दूध, जयप्रकाश, लोहिया, शेळी, मायावती असे बरेच काही नेहमीचे त्यात असल्याचे पाहून "हॅ यात काय विशेष?' असे त्याला वाटले. मात्र या पोलिटिकल बातमीत चे गव्हेरा या गव्हावरच्या रोगाचा उल्लेख कशासाठी? हे काही केल्या त्याला समजेना. मग त्याने ती कॉपी तशीच कंपोझिंगला सोडली.

सकाळची सकाळ अजून उजाडायची होती. मुख्य वार्ताहर पद्मभूषण यांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम भुजबळसाहेबांना वेकअप कॉल लावला. मग संगमनेरला दूरध्वनी केला. राज्यात सर्वत्र आलबेल असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी बेलापूरला संपादकांच्या घरी दूरध्वनी केला व राजधानी मुंबईत आज काही विशेष नसल्याचे शुभवर्तमान दिले. तोवर मृणालिनी नानिवडेकरांचेही (प्रतिनिधी, सकाळ न्यूज नेटवर्क, सकाळचे सावत्र भावंड, केअर ऑफ उत्तम कांबळे, नाशिक) नागपूरशी बोलणे झाले होते. मग त्यांनी नेहमीप्रमाणे भ्रमणध्वनीवरून दूरध्वनीमागोमाग दूरध्वनी करण्यास सुरूवात केली. कुठून तरी त्यांना समजलेच की शेळी शिंकली. मग पुन्हा त्यांनी भ्रमणध्वनीवरून दूरध्वनीमागोमाग दूरध्वनी करण्यास सुरूवात केली. त्यावर त्यांना पुन्हा समजले की शेळी शिंकली. अखेर त्यांनी नासिक(!)च्याच आरोग्य विद्यापीठाला व राहुरीच्या कृषी महाविद्यालयाला दूरध्वनी लावला. पाणी घालून दोन कॉलम होईल एवढा मजकूर जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर त्या चार कॉलमी ललितवृत्त लिहिण्यास बसल्या.

त्यांची बातमी लिहिणे सुरूच असताना मधु कांबळे ठाणे श्रीस्थानकात पोचले होते. रात्री आठपर्यंत कोणता ना कोणता कक्ष अधिकारी आपणांस याविषयीची माहिती देईलच याची खात्री असल्याने ते तसे आरामात होते.
मंत्रालय, विधान भवन, आमदार निवास, वृत्तपत्रांची कार्यालये यांत शेळीच्या शिंकेची चर्चा सुरू असताना तिकडे धारावीतल्या झोपडपट्टीत, घाटकोपर-भांडुपच्या चाळींमध्ये, मलबार हिल-जुहूच्या बंगल्यांमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणेच चालले होते. लोकल खच्चून भरून धावत होत्या. रस्ते, दुकाने फुलून गेली होती. विमानांची उड्डाणे सुरळीत होती. बारामतीतील काटेवाडीमध्ये, लातूरच्या बाभूळगावात, सांगलीच्या भिलवडी-वांगीतही सगळे नेहमीप्रमाणेच चालले होते. पाऊस पडत होता, शेतकरी आत्महत्या करीत होते, दरोडे पडत होते आणि शेळी साधे पडसे झाल्याने शिंकत होती...

आजकाल शेळीची शिंकही केवढी मोठी बातमी होऊ शकते याचा तिला पत्ताही नव्हता.

Wednesday, March 12, 2008

मुद्दे आणि गुद्दे

सभ्य स्त्री-पुरूष हो,
पत्रकारांच्या या समंलेनासमोर भाषण देण्यासाठी आम्हांला बोलावले याबद्दल या संमेलनाच्या आयोजकांचे आणि प्रायोजकांचे (हंशा) आम्ही आभार मानतो. आम्ही या संमेलनास जाण्यासाठी घरून निघालो, तेव्हा एका सद्‌गृहस्थाने आम्हांस विचारले, की तुम्ही कोठे चाललात? त्यावर आम्ही उत्तरलो, की पत्रकारांच्या संमेलनास चाललो आहोत. तेव्हा तो चावट गृहस्थ म्हणाला, म्हणजे आता अखेरच्या लोकलनेच तुम्ही परतणार तर! वर पुन्हा हाताच्या अंगठ्याने द्रवपदार्थ पिल्याची खूण! (हंशा) हसू नका. बघा, बाह्यजगतात आपल्या पेशाबद्दल कोणत्या कल्पना आहेत! पण मी त्या गृहस्थास सांगू इच्छितो, की या संमेलनास उपस्थित असलेले काही पत्रकार तरी तसे नाहीत. (टाळ्या) बाकीचे जे आहेत ते शिवांबू घेतात असे समजून सोडून देऊ! (पुष्कळ वेळ हंशाच हंशा)

आमचे भाषण म्हटले, की लोक हसण्याची आणि टाळ्या वाजवण्याची तालिमच करून येतात, असे आधीच्या वक्‍त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की आजकाल विनोदाचा दर्जा घसरला आहे. तुम्हांस खात्रीने सांगतो, कालिदासाने "शाकुंतल'मध्ये माढव्य नावाचे विदुषकाचे पात्र योजले, त्या काळातही हे असे म्हणणारे लोक निश्‍चितच असणार. अहो, फार कशाला! आमच्या मास्तरांचे विनोद अश्‍लील आहेत असा शिमगा करायलाही काही अश्‍लीलमार्तंडांनी कमी केले नव्हते. मास्तरांचे म्हणजे गडकऱ्यांचे. या नव्या पिढीला गडकरी म्हटले की आमचे माधवरावच आठवणार.(हंशा) ते हे नव्हे! गडकरी एकच! राम गणेश! अहाहा! काय त्यांचे विनोद! काय त्याच्या कोट्या! आजकाल भरपूर कोटीबहाद्दर दिसतात. पण त्यांच्या कोट्या म्हणजे त्या ऐकून आपल्या कवट्या फुटायची वेळ येणार! (प्रचंड हंशा व टाळ्या) विनोदी वाङ्‌मयाची निर्मळ गंगा मराठी सारस्वताच्या प्रांगणातून वाहात आहे. पण गावातून गंगा जाते म्हणजे तेथे गटारे नसणार असा काही नेम नाही. त्याप्रमाणे विनोदाच्या नावाखाली काहीही भंकस प्रसवणारे अनेक कर्मदरिद्री आपल्या भोवती आहेत. कोण तो विसोबा खेचर पत्रकारांच्या टोप्या उडवतो आहे! खेचर कसला एक नंबरचा गाढव आहे तो! (प्रचंड हंशा) आमच्यासमोर आला तर त्या खेचराची आम्ही खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही! (कडकडून टाळ्या)

खरे सांगायचे तर आजच्या काळातही उत्तम विनोदी साहित्याची निर्मिती होत आहे आणि त्याचा दर्जा चांगला शाबूत आहे याची ग्वाही आम्ही देतो. हे आमचे आयएसओ प्रमाणपत्रच म्हणा ना! (हंशा) या साहित्याचा शोध घेण्यासाठी तुम्हांला कोणत्याही ग्रंथालयात किंवा पुस्तकांच्या दुकानांत जाण्याची गरज नाही. तसे तुम्ही चुकून गेलात तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असे होईल! कारण सर्वोत्तम विनोदी साहित्य कोठे प्रसविले जात असेल, तर ते वृत्तपत्रसृष्टीतच! (प्रचंड टाळ्या) सध्या आम्ही फारसे वाचित नाही. जे वाचायचे ते वाचून झालेले आहे. वाल्मिकी-व्यासांपासून ज्ञानोबा-तुकारामांपर्यंत, शेक्‍सपियर-भासापासून खाडिलकर-गडकऱ्यांपर्यंत आणि कालिदास-शेली-बायरनपासून केशवसुत-तांब्यांपर्यंत, जे जे उदात्त, सुंदर, महन्मंगल आहे ते ते आम्ही वाचलेले आहे आणि त्यातील अनेक नाटके, कविता आम्हांस मुखोद्‌गत आहेत. परंतु आता वयोपरत्वे दृष्टी क्षीण झाली आहे. विलायतेत राहूनही आम्हांला इंटरनॅशनल दृष्टी प्राप्त झाली नाही, हे आमचे दुर्भाग्य! दुसरे काय!! (हंशा) त्यामुळे आजकाल आम्ही दूरचित्रवाणी वाहिन्याही फारशा पाहात नाही. पाहिल्या की डोळ्यांसमोर 24 तास स्टार चमकतात!! (प्रचंड हंशा)

परंतु तरीही या संमेलनास येण्याच्या मिषाने आम्ही गेल्या काही दिवसांतली दैनिके आणि नियतकालिके चाळली. हल्ली वाचण्याच्या आधी आम्ही सर्व वृत्तपत्रे आमच्या मोलकरणीकडे देतो. चाळणीत घालून चाळण्यासाठी! (हंशा) ती मग जाहिरातींचा कोंडा बाजूला करते व वाचनिय मजकूर तेवढा आमच्या हाती ठेवते! (हंशा) किती हो त्या जाहिराती!! (हंशा) तर आम्ही परवा ती सर्व वृत्तपत्रे वाचली आणि आम्हांला विनोदाची गुहाच सापडली! त्यांतील काही अग्रलेख, लेख, स्फुटे आणि बातम्या वाचून आमची वृत्ती हे (येथे हाताच्या अंगठ्याने द्रवपदार्थ घेतल्याची खूण करतात) न घेताच उल्हासित झाली! (हंशा) लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सामना, लोकमत... अहाहा! गेल्या दहा हजार वर्षांत आम्ही असे विनोदी वाङ्‌मय वाचलेले नाही!! (येथे हंसावे की टाळ्या वाजवाव्यात याबाबत श्रोत्यांत संभ्रम.)

राजकारणी मंडळी ही तर विनोदाची खाण असतातच. पण आपल्या वार्ताहर आणि उपसंपादकांतही असे अनेक छुपे विनोदवीर आहेत याची जाणीव आम्हांला ही पत्रे चाळल्यानंतर झाली. त्यांच्या संपादकांना मात्र त्याची जाणीव नसावी हे त्यांचे दुर्भाग्य. अन्यथा स्वतःला लोकमान्य लोकशक्ती म्हणविणाऱ्या त्या लोकसत्तेला हास्यरंग काढण्याची पाळीच आली नसती. तेवढाच शेटजींचा पैसा वाचला असता! (हंशा) त्या वृत्तपत्राच्या परवाच्या अंकातील "रोलर कोस्टर' हे सदर घ्या. किती विनोदी! (हंशा) त्यात उंदरांच्या सुळसुळाटाची माहिती दिली आहे चीनमधल्या. अरे मुंबईत काय कमी उंदीर आहेत! निम्मे तर मंत्रालयात आणि मुन्सिपालिटीतच असतील! (प्रचंड हंशा) पण नाही, त्या आमच्या दत्ता पंचवाघांनी चिनी उंदरांबद्दल लिहिले. वाघ ना तुम्ही? मग उंदरांवर काय लिहिता? (हंशा) काय तर म्हणे दोन अब्ज उंदरांचा सुळसुळाट झालाय! अरे काय मोजायला गेला होता का तुम्ही! हे असे एकेक विनोद!! उपसंपादकांच्या डुलक्‍यांतून होणारे विनोद ही म्हणजे विनोदाची एक वेगळीच जातकुळी आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर मात्र तुम्हाला मुंबई सकाळ वाचण्यावाचून पर्याय नाही! तेथील संपादकांना आम्ही सुयश चिंतितो! (हंशा)

विनोदाची निर्मिती होते ती विसंगतीतून. जेथे विसंगती तेथे विनोद आहेच म्हणून समजा. फक्त तो पाहण्याची दृष्टी हवी. आजच्या सगळ्याच वृत्तपत्रात ही विसंगती ठासून भरलेली आहे. परवा कुणीतरी म्हणाले, की महाराष्ट्र टाइम्सने आषाढी विशेषांक काढला आहे. हे म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली! (बराच काळ हंशा) रोज आपले ते अर्धनग्न ललनांची चटोर छायाचित्रे छापायची आणि मग एक दिवस असे हे पापक्षालन करायचे! काल तर म्हणे त्या लोकसत्तेने वारांगनांच्या मोठमोठ्या तसबिरी छापल्या! आम्ही त्या पाहिल्या नाहीत! (हंशा) महाराष्ट्र टाइम्समधील एका वार्ताहराने आम्हांला त्याबद्दल सांगितले! (प्रचंड हंशा) बहुधा त्याला म्हणायचे असेल, असे त्यांनी त्या कशा काय छापल्या? जणू अशा छायाचित्रांवर महाराष्ट्र टाइम्सचाच कॉपीराईट आहे! (बराच काळ हंशा) आजकाल सर्व वृत्तपत्रे रंगीत झाली असल्याने विनोदही कसे रंगीत झाले आहेत! त्यामुळे आम्हाला विनोदाच्या दर्जाबद्दल मुळीच चिंता राहिलेली नाही. मराठी वृत्तपत्रांच्या हाती हा विनोदाचा ताजमहाल शाबूत आहे! (प्रचंड टाळ्या) त्यासाठी एसेमेस मतचाचण्या घेण्याची आवश्‍यकता नाही!

बराच वेळ झालेला आहे. पत्रकारांना दुसऱ्यांचे एवढे ऐकून घेण्याची सवय नसते! तुमचीही घेण्याची वेळ झाली असेल...(हंशाच हंशा) निरोप! (प्रचंड हंशा) आम्हांला येथे बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानून आम्हीही घेतो... निरोप! (प्रचंड हंशा आणि टाळ्या)