Wednesday, March 12, 2008

मुद्दे आणि गुद्दे

सभ्य स्त्री-पुरूष हो,
पत्रकारांच्या या समंलेनासमोर भाषण देण्यासाठी आम्हांला बोलावले याबद्दल या संमेलनाच्या आयोजकांचे आणि प्रायोजकांचे (हंशा) आम्ही आभार मानतो. आम्ही या संमेलनास जाण्यासाठी घरून निघालो, तेव्हा एका सद्‌गृहस्थाने आम्हांस विचारले, की तुम्ही कोठे चाललात? त्यावर आम्ही उत्तरलो, की पत्रकारांच्या संमेलनास चाललो आहोत. तेव्हा तो चावट गृहस्थ म्हणाला, म्हणजे आता अखेरच्या लोकलनेच तुम्ही परतणार तर! वर पुन्हा हाताच्या अंगठ्याने द्रवपदार्थ पिल्याची खूण! (हंशा) हसू नका. बघा, बाह्यजगतात आपल्या पेशाबद्दल कोणत्या कल्पना आहेत! पण मी त्या गृहस्थास सांगू इच्छितो, की या संमेलनास उपस्थित असलेले काही पत्रकार तरी तसे नाहीत. (टाळ्या) बाकीचे जे आहेत ते शिवांबू घेतात असे समजून सोडून देऊ! (पुष्कळ वेळ हंशाच हंशा)

आमचे भाषण म्हटले, की लोक हसण्याची आणि टाळ्या वाजवण्याची तालिमच करून येतात, असे आधीच्या वक्‍त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की आजकाल विनोदाचा दर्जा घसरला आहे. तुम्हांस खात्रीने सांगतो, कालिदासाने "शाकुंतल'मध्ये माढव्य नावाचे विदुषकाचे पात्र योजले, त्या काळातही हे असे म्हणणारे लोक निश्‍चितच असणार. अहो, फार कशाला! आमच्या मास्तरांचे विनोद अश्‍लील आहेत असा शिमगा करायलाही काही अश्‍लीलमार्तंडांनी कमी केले नव्हते. मास्तरांचे म्हणजे गडकऱ्यांचे. या नव्या पिढीला गडकरी म्हटले की आमचे माधवरावच आठवणार.(हंशा) ते हे नव्हे! गडकरी एकच! राम गणेश! अहाहा! काय त्यांचे विनोद! काय त्याच्या कोट्या! आजकाल भरपूर कोटीबहाद्दर दिसतात. पण त्यांच्या कोट्या म्हणजे त्या ऐकून आपल्या कवट्या फुटायची वेळ येणार! (प्रचंड हंशा व टाळ्या) विनोदी वाङ्‌मयाची निर्मळ गंगा मराठी सारस्वताच्या प्रांगणातून वाहात आहे. पण गावातून गंगा जाते म्हणजे तेथे गटारे नसणार असा काही नेम नाही. त्याप्रमाणे विनोदाच्या नावाखाली काहीही भंकस प्रसवणारे अनेक कर्मदरिद्री आपल्या भोवती आहेत. कोण तो विसोबा खेचर पत्रकारांच्या टोप्या उडवतो आहे! खेचर कसला एक नंबरचा गाढव आहे तो! (प्रचंड हंशा) आमच्यासमोर आला तर त्या खेचराची आम्ही खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही! (कडकडून टाळ्या)

खरे सांगायचे तर आजच्या काळातही उत्तम विनोदी साहित्याची निर्मिती होत आहे आणि त्याचा दर्जा चांगला शाबूत आहे याची ग्वाही आम्ही देतो. हे आमचे आयएसओ प्रमाणपत्रच म्हणा ना! (हंशा) या साहित्याचा शोध घेण्यासाठी तुम्हांला कोणत्याही ग्रंथालयात किंवा पुस्तकांच्या दुकानांत जाण्याची गरज नाही. तसे तुम्ही चुकून गेलात तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असे होईल! कारण सर्वोत्तम विनोदी साहित्य कोठे प्रसविले जात असेल, तर ते वृत्तपत्रसृष्टीतच! (प्रचंड टाळ्या) सध्या आम्ही फारसे वाचित नाही. जे वाचायचे ते वाचून झालेले आहे. वाल्मिकी-व्यासांपासून ज्ञानोबा-तुकारामांपर्यंत, शेक्‍सपियर-भासापासून खाडिलकर-गडकऱ्यांपर्यंत आणि कालिदास-शेली-बायरनपासून केशवसुत-तांब्यांपर्यंत, जे जे उदात्त, सुंदर, महन्मंगल आहे ते ते आम्ही वाचलेले आहे आणि त्यातील अनेक नाटके, कविता आम्हांस मुखोद्‌गत आहेत. परंतु आता वयोपरत्वे दृष्टी क्षीण झाली आहे. विलायतेत राहूनही आम्हांला इंटरनॅशनल दृष्टी प्राप्त झाली नाही, हे आमचे दुर्भाग्य! दुसरे काय!! (हंशा) त्यामुळे आजकाल आम्ही दूरचित्रवाणी वाहिन्याही फारशा पाहात नाही. पाहिल्या की डोळ्यांसमोर 24 तास स्टार चमकतात!! (प्रचंड हंशा)

परंतु तरीही या संमेलनास येण्याच्या मिषाने आम्ही गेल्या काही दिवसांतली दैनिके आणि नियतकालिके चाळली. हल्ली वाचण्याच्या आधी आम्ही सर्व वृत्तपत्रे आमच्या मोलकरणीकडे देतो. चाळणीत घालून चाळण्यासाठी! (हंशा) ती मग जाहिरातींचा कोंडा बाजूला करते व वाचनिय मजकूर तेवढा आमच्या हाती ठेवते! (हंशा) किती हो त्या जाहिराती!! (हंशा) तर आम्ही परवा ती सर्व वृत्तपत्रे वाचली आणि आम्हांला विनोदाची गुहाच सापडली! त्यांतील काही अग्रलेख, लेख, स्फुटे आणि बातम्या वाचून आमची वृत्ती हे (येथे हाताच्या अंगठ्याने द्रवपदार्थ घेतल्याची खूण करतात) न घेताच उल्हासित झाली! (हंशा) लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सामना, लोकमत... अहाहा! गेल्या दहा हजार वर्षांत आम्ही असे विनोदी वाङ्‌मय वाचलेले नाही!! (येथे हंसावे की टाळ्या वाजवाव्यात याबाबत श्रोत्यांत संभ्रम.)

राजकारणी मंडळी ही तर विनोदाची खाण असतातच. पण आपल्या वार्ताहर आणि उपसंपादकांतही असे अनेक छुपे विनोदवीर आहेत याची जाणीव आम्हांला ही पत्रे चाळल्यानंतर झाली. त्यांच्या संपादकांना मात्र त्याची जाणीव नसावी हे त्यांचे दुर्भाग्य. अन्यथा स्वतःला लोकमान्य लोकशक्ती म्हणविणाऱ्या त्या लोकसत्तेला हास्यरंग काढण्याची पाळीच आली नसती. तेवढाच शेटजींचा पैसा वाचला असता! (हंशा) त्या वृत्तपत्राच्या परवाच्या अंकातील "रोलर कोस्टर' हे सदर घ्या. किती विनोदी! (हंशा) त्यात उंदरांच्या सुळसुळाटाची माहिती दिली आहे चीनमधल्या. अरे मुंबईत काय कमी उंदीर आहेत! निम्मे तर मंत्रालयात आणि मुन्सिपालिटीतच असतील! (प्रचंड हंशा) पण नाही, त्या आमच्या दत्ता पंचवाघांनी चिनी उंदरांबद्दल लिहिले. वाघ ना तुम्ही? मग उंदरांवर काय लिहिता? (हंशा) काय तर म्हणे दोन अब्ज उंदरांचा सुळसुळाट झालाय! अरे काय मोजायला गेला होता का तुम्ही! हे असे एकेक विनोद!! उपसंपादकांच्या डुलक्‍यांतून होणारे विनोद ही म्हणजे विनोदाची एक वेगळीच जातकुळी आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर मात्र तुम्हाला मुंबई सकाळ वाचण्यावाचून पर्याय नाही! तेथील संपादकांना आम्ही सुयश चिंतितो! (हंशा)

विनोदाची निर्मिती होते ती विसंगतीतून. जेथे विसंगती तेथे विनोद आहेच म्हणून समजा. फक्त तो पाहण्याची दृष्टी हवी. आजच्या सगळ्याच वृत्तपत्रात ही विसंगती ठासून भरलेली आहे. परवा कुणीतरी म्हणाले, की महाराष्ट्र टाइम्सने आषाढी विशेषांक काढला आहे. हे म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली! (बराच काळ हंशा) रोज आपले ते अर्धनग्न ललनांची चटोर छायाचित्रे छापायची आणि मग एक दिवस असे हे पापक्षालन करायचे! काल तर म्हणे त्या लोकसत्तेने वारांगनांच्या मोठमोठ्या तसबिरी छापल्या! आम्ही त्या पाहिल्या नाहीत! (हंशा) महाराष्ट्र टाइम्समधील एका वार्ताहराने आम्हांला त्याबद्दल सांगितले! (प्रचंड हंशा) बहुधा त्याला म्हणायचे असेल, असे त्यांनी त्या कशा काय छापल्या? जणू अशा छायाचित्रांवर महाराष्ट्र टाइम्सचाच कॉपीराईट आहे! (बराच काळ हंशा) आजकाल सर्व वृत्तपत्रे रंगीत झाली असल्याने विनोदही कसे रंगीत झाले आहेत! त्यामुळे आम्हाला विनोदाच्या दर्जाबद्दल मुळीच चिंता राहिलेली नाही. मराठी वृत्तपत्रांच्या हाती हा विनोदाचा ताजमहाल शाबूत आहे! (प्रचंड टाळ्या) त्यासाठी एसेमेस मतचाचण्या घेण्याची आवश्‍यकता नाही!

बराच वेळ झालेला आहे. पत्रकारांना दुसऱ्यांचे एवढे ऐकून घेण्याची सवय नसते! तुमचीही घेण्याची वेळ झाली असेल...(हंशाच हंशा) निरोप! (प्रचंड हंशा) आम्हांला येथे बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानून आम्हीही घेतो... निरोप! (प्रचंड हंशा आणि टाळ्या)

2 comments:

Nandan said...

welcome byak, visoba. Let us bhankas chi uNeev bhaasat hotee. Bestofbhankas chi suruvaat pahoon bare vaaTale.

yogesh joshi said...

Welcome back Bhankas.
Aaplya baddal amhi sudddha kahi lihile hote amchya blog madhye...bare watle baryach mothya kaalkhandanantar aaplyala punha baghun (vachun).
Bhankasjee, tumhi nusta marathi patrakarite baddalch n-lihita jara english walyankade suddha bagha ho. English wale mhanje je mul Marathich pan jyanni goryanshi jaat jodle te.

Aplya hya yashat aplyala suyash chintato.