Friday, April 25, 2008

लबाड लांडगं ढ्‌वांग करतंय...

आम्हांस प्रसिद्धीपत्रक काढण्यात अत्यंत आनंद होऊन राहिला आहे, की महामहीम सोनियाजी गांधीजी यांच्याप्रमाणेच आमचेही "नैतिक' समर्थन राजमान्य राजेश्री संजूबाबाच्या पाठीशी आहे!

संजूबाबाला शिक्षा होणार की नाही, शिक्षा झाल्यास बॉलिवूडचे किती पैसे बुडणार, त्याचे कोणकोणते चित्रपट "शेल्फ'मध्ये जाणार, त्याच्या शिक्षेचा मान्यताताई आदींवर कोणता "नैतिक' परिणाम होणार वगैरे महत्त्वपूर्ण प्रश्‍न तमाम मराठी पत्रांप्रमाणेच आमच्याही समोर होते. एक क्षण तर वाटले, की आपल्या सर्व बहिर्जी नाईक्‍सना याच कामी जुंपावे आणि संजूबाबाची बित्तंबातमी काढावी. पण नंतर आम्ही सुविचार केला, की विसूभाऊ, जर हेच काम आपली सर्व वृत्तपत्रे (मराठीसह!) व विविध कालिके व वृत्तवाहिन्या करीत असतील, तर ते आपण का बरे करावे? एकच काम अनेकांना देण्याइतपत सहयोगी संपादक का आपल्याकडे आहेत? तेव्हा आम्ही मग त्या बित्तंबातमीसाठी मराठी पत्रेच चाळू लागलो.

आमची ही पत्रे मोठी हुशार व विश्‍वासार्ह व निःपक्षपाती! त्यामुळे संजूबाबाला शिक्षा होताच त्यांनी कसे फटाक्‌न अग्रलेख लिहिले व त्यांत संजूबाबा कसा दोषी व गुन्हेगार व शिक्षेस पात्र आहे व प्रसारमाध्यमे कशी त्यापायी वेडी व पागल व पिसाट झाली आहेत असे विचारसंपृक्त व विचारप्रक्षोभक व विचारगर्भ विचार मांडले! (आमचे हे लेखन काहीसे "सकाळ'च्या अग्रलेखाच्या अंगाने चालले आहे, याची आम्हांस जाणीव आहे. पण नाईलाज आहे! काही काळ आम्हीही तेथे संपादकीये लिहिली, त्याचा वाण व गुण लागणारच!)

हे अग्रलेख अत्यंत व खूपच निःपक्षपाती असल्याने त्यात संजूबाबाचा उदोउदो करणाऱ्या व त्याचीच मोठी व विस्तृत वृत्ते देणाऱ्या माध्यमांवर टीका करण्यात आली होती. ते वाचून आम्ही जरा काळजीतच पडलो होतो, की आता हे संजूबाबाला फारसे महत्त्व देणारच नाहीत की काय! पण महाराष्ट्र टाईम्सपास, लोकमत, सकाळ, सामनादी दैनिके चाळली व संजूबाबाचे कैसे झोपणे, संजूबाबाचे कैसे खाणे, संजूबाबाचे कैसे सलगी देणे याची तमाम सचित्र खबर पहिल्या पानावर पाहिली व आम्ही निःशंक व काळजीहीन व चिंतामुक्त झालो!

तरीही आमचे अंतःकरण व हृदय संजूबाबाच्या काळजीने धपापतच होते, की कारागृहाच्या वसतीगृहात कसलेकसले लोक व गुन्हेगार व पोलिस असतात, त्यांच्या सहवासात संजूबाबा बिघडणार तर नाही ना! "जेलच्या बराकीत तो एकटाच आहे'! (माहिती सौजन्य - मटा, दि. 2 ऑगस्ट). त्याचे तेथे रॅगिंग तर होणार नाही ना? त्याला तेथे कष्ट करून "विनम्रतेने 12 रूपये 12 आणे कमवावे लागणार'! (माहिती सौजन्य - मटा, दि. 3 ऑगस्ट) त्याला त्रास तर होणार नाही ना?
पण "येरवडा कारागृहात संजूबाबास सकाळी सात वाजता दोन केळी, दूध देण्यात आले. न्याहरीस दोन पोळ्या व उसळ देण्यात आली. दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण त्याला कोठडीतच पुरविण्यात आले', हा अत्यंत महत्त्वाचा व विधायक तपशील समजल्यानंतर (माहिती सौजन्य - सकाळ, 4 ऑगस्ट) आम्हांस खूप बरे व चांगले वाटले, की घेताहेत, घेताहेत संजूबाबाची चांगली काळजी घेताहेत... आमची सोन्याहून पिवळी व स्वतंत्रतेहून स्वतंत्र व विधायकतेहून विधायक मराठी वर्तमानपत्रे आणि येरवडा वसतीगृहवाले!!

आता आमच्या मनात एकच प्रश्‍न व सवाल पिंगा व फेर घालतो आहे, की काल (ता. 3 ऑगस्ट) लोकसत्तेला काय असे पिसाटायला झाले होते, की त्यांनी "पिसाटलेला मीडिया' असा अग्रलेखच लिहिला व त्यात उपग्रह वृत्तवाहिन्यांना बदडून व झोडून काढले?

या प्रश्‍नावर आम्ही खूप खोल व गहन विचार करीत होतो, तोच "सह्याद्री'च्या कडेकपारीतून "लबाड लांडगे ढोंग करते...' या छानशा भावगीताचे सूर घुमले! आणि वाहिनीच्या त्या बोधीवृक्षाखाली आम्हांस अचानक व एकदम साक्षात्कार झाला, की अरे, हे तर आपल्या तमाम व अवघ्या पत्रांचेच ब्रीदगीत!!
तुम्हांस काय वाटते?

Friday, April 18, 2008

राजा भिकारी, माझी बातमी "फिरवली'!

काही दिवसांपूर्वीची गोष्ट.
दूरवरून ढोल-ताशांचा आवाज येत होता.
म्हटले, की दह्यकाल्याचो उत्सौ आलाय. कुठे गोपिकांची तर प्रॅक्‍टिस चालू नसेल ना! पाह्यला हवे! म्हणून मजल-दरमजल करीत निघालो, तर काय! लालबागेतल्या वार्ताहरच्या कचेरीत आनंदीआनंद गडे साजरा केला जात होता. मनीं म्हटले, कुणाचा हॅप्पी बर्थडे तर नाही ना इथे? महाराष्ट्र टाइम्सपासमध्ये तर वाचल्याचे स्मरत नाही.
मनीं आले, आयुष्यात एकदा तरी मटामध्ये आपला वाढदिवस छापून आला पाह्यजे! म्हणजे कसे जन्माला आल्याचे सार्थक होईल! पण हे चिंतन बाजूला सारून आम्ही प्रस्तुत कामामध्ये लक्ष घातले, की वार्ताहर का बरे आनंदले आहे?
मनीं आले, कोणत्याही मराठी दैनिकांत दोनदाच खराखुरा आनंदोत्सव साजरा केला जातो, एकदा पगारवाढ झाली की आणि दुसऱ्यांदा... पगारवाढ झाली की! असेच काही आक्रीत नसेल या पत्रात घडले?
या विचाराने आम्ही सरळ आत गेलो, तर फाटकावरील दरवानाने हटकले, ""अबी काम नय है यहॉं. सब पेपर ठोकनेवाले भर गये!''
मनीं आले, आम्ही चेहऱ्यावरून एवढे का बिजले दिसतो?
तरीही मनी श्रेष्ठ धारिष्ट्य धरून आम्ही म्हणालो, ""आम्हांस काम नको! आयुष्यात ते कधी करावे लागू नये म्हणून तर मित्रा आमची सर्वांची खेचरगिरी सुरू असते संपादक होण्याची! तू फक्त आमची एवढीच उत्सुकता शमव, की हे ढोल-ताशे आणि नगारे का बरे वाजत आहेत?''
त्यावर त्या चहाटळ दरवानाने आमच्याकडे अशी नजर टाकली, की मनीं आले, आम्ही चेहऱ्यावरून सुभाष झासुद्धा दिसतो की काय?
"उत्सुकता शमव' या शब्दप्रयोगाचा हा परिणाम असावा! शिवाय त्यात तो दरवान म्हणजे वार्ताहर आणि चौफेरच्या बातम्यांवर वाढलेला जीव! जीव घेऊन आम्ही तेथून सटकलो, ते थेट शिवाजीरावांच्या समोरच येऊन आदळलो.

क्रिकेटमहर्षी शिवाजीराव सावंत. मटाच्या वृत्तसंपादकपदी होते, तेव्हाचे शिवाजाराव आणि आताचे शिवाजीराव, एक वय सोडले तर तसूभरही फरक नाही. मनीं म्हणालो, काय सांगावे, जाकिटसुद्धा तेच असेल... मटाच्या सेंडऑफ पार्टीत घातलेले!
त्यांना आदरयुक्त प्रणिपात करून आम्ही वदलो, ""सलाम आलेकुम सावंतसो! मनीं शंका घेऊन आलोय, की हा उत्सौ कशाचा मनवता आहात तुम्ही?''
त्यांनी आधी टेबलावरील वृत्तपत्रांचे चघाळ गोळा केले. मग शिपायास सौहार्दपूर्ण साद दिली. त्याच्या हाती त्या चघाळातील काही वृत्तपत्रे दिली, व म्हणाले, ""बाहेर उपसंपादकांना द्या आणि सांगा, की खुणा केल्यात तेवढ्याच बातम्या फिरवा. मराठीचं काही अडलं तर मला विचारायला या. डिक्‍शनरी पाहात बसून वेळ घालवू नका. काय?''
सुपारीचे खांड तोंडात सारत त्यांनी सराईत "मटाईता'प्रमाणे राऊंड दी विकेट चेंडू टाकला, ""विसूमियॉं, आजचा दिवस वार्ताहर ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिन आहे! तुम्हांस आमची संस्कृती व परंपरा माहितच असेल...''
"हो...'', आम्ही ज्ञानदिवा पाजळला, ""शतकाची परंपरा आहे वार्ताहरला. म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळीसुद्धा वार्ताहर निघत होता...''
"लाहौल विलाकुवत! साफ गलत!'' आमचा त्रिफळा.
"विसूमियॉ, तो फुल्यांच्या काळातला वार्ताहर वेगळा. आमचा हा ट्रिपलफुल्यांवाला वार्ताहर!... आमच्याकडे किती वार्ताहरी आहेत ठाऊक आहे का?''
"नाही.'' आमचा ज्ञानदीप मघाच विझला होता.
"सगळ्या मराठी-इंग्रजी दैनिकांचे असतील, तेवढे सगळे वार्ताहर आमचे! शिवाय आमचे असे वेगळेच! म्हणजे सगळ्यांहून जास्त वार्ताहरी व हरिणी आमच्याच!''
शिवाजीरावांचा हा स्कोरबोर्ड आमच्या मेंदूत जाम जाईना!
"झापड मिटा विसूमियॉं! अहो, आम्ही सगळ्याच दैनिकांच्या बातम्या फिरवून छापत असतो. तेव्हा त्यांचे ते आमचेच नाही का झाले?''
आम्ही मनीं म्हणालो, अच्छा, तर ही संस्कृती आहे होय येथे? म्हणजे तिलाही शतकांची परंपरा आहेच की! पहिले ज्ञात मराठी पत्र म्हणजे "मुंबई अखबार'. त्यातही प्रातोप्रांतीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या फिरवून घेतल्या जात असत. तेच त्यांचे बातम्यांचे प्रमुख साधन होते, असे लेल्यांचा इतिहास सांगतो!
आम्ही फ्रंटफूटवर जाऊन विचारले, "पण त्यात काय येवढा आनंद मानायचा?''
"आनंद त्याचा नव्हे, विसूमियॉं. आनंद याचा आहे, की पह्यल्यांदाच एका बड्या मराठी दैनिकाने आमची बातमी फिरवून छापली आहे. तीही पहिल्या पानावर! मुंबैत फ्लायर म्हणून! पुण्यात अँकर म्हणून! म्हणून आमचे लोक खुश आहेत.''
शिवाजीरावांच्या या बाऊन्सरने आम्ही गारदच झालो.
पाहतो तो खरेच की तेथील एक वार्ताहरिणी गुणगुणत होती : राजा भिकारी, माझी बातमी फिरवली!
"छे छे! तुमची काही तरी गफलत होतेय. असे होणे शक्‍यच नाही. आता लोक उचलतात आंग्ल दैनिकांतल्या बातम्या. पण तेवढे चालतेच ना! बिच्चारे वार्ताहरी आणि वार्ताहरिणी रोज रोज कुठून आणणार बरे नव्या नव्या बातम्या?... आणि समजा चोरल्या अन्य दैनिकांतल्या बातम्या, तरी त्यात शर्मो-हया वाटण्याचे काय कारण? त्यांचा उद्देश तर निर्मल, कोमल, मंगल असाच असतो ना?... वाचकांचा माहितीचा अधिकार जपण्याचा!..''
आमच्या या बॅटिंगनंतर शिवाजीरावांनी एक तुच्छतादर्शक पॉज घेतला.
जरा खुर्चीवर रेलले आणि मग म्हणाले, ""हेच तर आम्हीही म्हणतोय ना केव्हापासून, तर आम्हांला तुम्ही फालतू समजता! तेव्हा आता विसूमियॉं चला, आपण सगळी वृत्तपत्रे मिळून हेच म्हणू या! आपण सगळे एकाच माळेचे मणी होऊ या!!''

शिवाजीरावांचे हे स्लेजिंग होते किंवा कसे, याचा निर्णय आम्हाला अजून घेता आलेला नाही...

---------------------------------------------------
स्वाध्याय -
1) वार्ताहरचा सोमवार, दि. 6 ऑगस्ट 2007चा अंक मिळवून, त्यातील पहिल्या पानावरील "एक कोटीची झोपडी' या मुख्य बातमीची उचलेगिरी करणारे वृत्तपत्र कोणते याचा शोध घ्या व आपले उत्तर 4321वर एसेमेस करा.
2) अशाच प्रकारची बातम्यांची उचलेगिरी मिरर, हिंदुस्तान टाईम्स आदी आंग्लपत्रांतही चालते का, याचा "डोळस'पणे शोध घ्या व ती माहिती आपल्या संपादकांना देऊन शाबासकी मिळवा.
3) फिरवलेल्या बातम्यांखाली "अनुवादित', "स्वैर रूपांतर', "भाषांतर', "परकीय कल्पनेवरून' असे छापावे काय, यावर वृत्तसंपादकांशी चर्चा करा.

Monday, April 14, 2008

चिवडागल्लीतला चिवडा!

(लालबागातली चाळीसम कचेरी स‌ोडून मत्प्रिय लोकसत्ता पुन्हा एकदा एक्स्प्रेस टॉवरमध्ये गेला. जागेच्या बाबतीत ही लोकसत्ताची स‌मझोता एक्स्प्रेसच म्हणायला हवी! असो. तर जे स‌मयी लोकसत्ता लालबागातल्या नरीमन पॉंईंट येथे छापून चिवडा गल्लीतून प्रकाशित होत होता व जे स‌मयी लोकसत्ताने आपल्या पुरवण्यांचा स‌ंसार आटोपता घेतला, ते स‌मयी बहुत स‌ंतप्त दुःखद अंतःकरणाने लिहिलेला हा लेख.)


आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले आहेत. नावाचेच खेचर, त्यामुळे नासिकाही फुरफरत आहे.
कारण आमचे अंतःकरण संतप्त दुःखाने भरून गेले आहे.
महाराष्ट्र टाइम्स(पास)ची "मैफल' उठून गेली (आणि "संवाद'च्या स्मार्ट तबकात केवळ देठ, लवंगा आणि सालीच उरल्या) तेव्हाही आमचे असेच झाले होते.
कुणाचा अपमृत्यु झाला, की आमचे असेच होते. काय करणार? स्वभाव!

खरे तर गेल्या शनिवारपर्यंत आम्ही कमालीचे खुश होतो.
अलीकडेच मटाने विकएंड पुरवणी सहर्ष सादर केली. ती आम्ही याचि डोळां पाहिली. तरीही आमचा आनंद ओसरला नव्हता.
वास्तविक असा विकेंड पाहून आम्हाला हुंदकाच फुटायचा!
म्हणजे राजे हो, एकच खेळ तुम्ही कितींदा लावणार?
मुंटात तेच! मॉसमधे तेच! आणि विकेंडमधेही तेच?
कन्टेन्ट बदला तो पैसा वापस अशी का आपली स्कीम आहे गणपतीवाले?

पण आमची तक्रार विकेंडबद्दल नाहीच आहे.
तशी आमची तक्रार कोणाहीबद्दल नाही!
आजच्या (मंगळवार, दि. 31 जुलै) मुंबई वृत्तांतमधील "कॅम्पस मूड' मधील "स्क्रॅप बुक' नामे सदर आम्ही वाचले आणि आमची जन्माची तक्रार संपली!
या सदरातील हे काही मननीय वाक्‌प्रचार पाहा -
बॉटनीची फटाका मॅम!
सानिया मिर्झा हॉट प्रॉपर्टी!!
गर्लफ्रेंडबरोबर बॅटिंग!!!

केतकरसाहेब पाहताय ना, आजचा युवा किती "टॉईन-फ्री' झालाय तो!
आता एकदा हे "कॅम्पस मूड' पान "मूड्‌स' अथवा "कोहिनूर'ने प्रायोजित केले, की सगळे भरून पावेल! व मग आपण मिळून सारे जण चतुरा, चतुरंग, मधुरा, तनिष्का, सखी आदीकरून सर्व महिलाविषयक पुरवण्यांमध्ये नारीशक्तीचा आदरयुक्त जागर घालण्यास मोकळे होऊ!!
असो.

तर मुद्दा असा, की आमची तक्रार कोणाहीबद्दल नसली, तरी आम्हांला येथे हार्दिक सल मांडायचा आहे तो लोकसत्तेच्या लोकरंगबद्दल!
लोकसत्तेच्या पुरवण्या आता नव्या रंगात, नव्या ढंगात अशी जाहिरात आमच्या वाचनात आली, तेव्हा आम्हांस भरली अवनी मोदाने असे काहीच्याबाही झाले होते.
आमचे सोडा. बुधवारातली बुढ्ढीसुद्धा लोकसत्ता कसले रंग-ढंग उधळतेय याकडे डोळे लावून बसली होती! आमच्या बहिर्जी नाईक्‍सनी दिलेल्या माहितीनुसार लोकसत्तेची ही जाहिरात आली, त्याच दिवशी सकाळमध्ये त्याबाबतच्या विचाराला सुरूवात झाली. मग साधारणतः 37 तासांनी त्याबाबतची चर्चा सुरू झाली व 42व्या तासाला बुधवारपेठ ते भांबुर्डे असे ई-मेल्सचे वहन सुरू झाले! अखेर यातून असे निष्पन्न झाले की आपण एक मिटिंग घ्यावी. त्याकरीता सर्व संपादकांना पाचारण करण्याचेही ठरले. पण पावसामुळे तो बेत रद्द झाला. (व खिरेंचा जीव भांड्यात पडला! हल्ली प्राईडचं बील जरा वाढतच चाललं आहे!)

लोकमतमध्ये याहून वेगळाच प्रकार होता.
ही जाहिरात पाहताच राहीबाई भिडे (अमेरिका रिटर्न) यांनी दिनकररावांना दूरध्वनी लावला. ""एक एक्‍स्‌क्‍ल्युजीव न्यूज आहे. डू यू नो? लोकसट्टा इज युजिंग डिफरन्ट कलर.'' (राहीबाईंचे ऍक्‍सेंट काय सुधारलेत! एकदम बोईंग!!)
आता दिनकरराव म्हणजे दिनकररावच! ते म्हणाले, ""काय सांगता! वेगळा रंग वापरताहेत? अहो, आपण "सीएमवायके'च वापरतो ना? त्यालीकडचा हा कोणता रंग आणताहेत लोकसत्तावाले?''
राहीबाईंनीच मग त्यांची सुटका केली! त्या म्हणाल्या, ""मी असं करते. विलासरावांना सांगून एशियन पेंट्‌समध्ये चौकशी करायला सांगते कुणाला तरी.''
त्यावर दिनकरराव गिरधारींकडे पाहून गालभरून हसले.
(दिनकररावांचा मिश्‍किल रंग अजूनही हिरवा आहे!!)
पुढारीत मात्र या जाहिरातीने काडीमात्र खळबळ माजविली नाही!
छत्रपती मनातल्या मनात मोठ्याने म्हणाले, ""लोकसत्ता नव्या रंगात येऊन स्पर्धा करते काय? अरे, आमीबी काय कमी नाही!''
आणि त्यांनी प्रॉडक्‍शनला आदेश दिला, ""उद्यापासून डबल रंग वापरा रे!''

बड्या बड्या मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादकांची ही अवस्था. तिथे आमचे काय! पण आम्ही आपले एवढ्यावरच खुश होतो की चला आता नवीन काही रंगदार, ढंगदार, जोमदार, कसदार वाचावयास मिळणार!

(एरवी तसे वाचावयास मिळत नाही असे आमचे मुळीच म्हणणे नाही. लोकसत्ता खूप वाचनीय जाहिराती देतो हे अगदी मनःपूर्वक मान्य! पुण्यात सकाळचेही तसेच. पण त्यांची गोष्टच वेगळी. त्यांच्याकडे "लोक छोट्या जाहिरातीही ताज्या बातम्यांप्रमाणे वाचतात' असे असल्याने व अलीकडे पराग करंदीकरांवर कामाचा खूपच ताण येत असल्याने (केवढा वाळलाय ना पराग अलीकडे!) तेथे आताशा ताज्या बातम्या छोट्या जाहिरातींप्रमाणे लावल्या जातात!)

तर खूप अपेक्षेने आम्ही रविवारचा लोकसत्ता हाती घेतला.
लोकरंग वाचला आणि
ऐसा लगा की-
जैसी दुर्वांकूरची थाळी, जैसी मल्टिव्हिटॅमिन गोळी,
जैसा लालबागचा चिवडा, जैसा चौपाटीचा रगडा,
जैसी भैयाच्या ठेल्यावरची तिखीगिली भेल...

चिवडा गल्लीत लोकसत्ताची कचेरी गेली तेव्हाच खरे तर आम्ही भाकीत केले होते, की यांना वाण नाही पण गुण लागणार! आज नवी मुंबईत कचेरी हलविण्याची वेळ आल्यानंतर आमचा तो होरा खरा ठरला याच्याच वेदना आम्हांस मनःपूत होत आहेत.
हास्यरंग, बालरंग, लोकमुद्रा, स्पोर्ट झोन असं सगळं कोंबून दहा पानी घसघशीत (पाने दहा आणि घसघशीत! आपण आंग्ल दैनिकांच्या किती मागे आहोत याचा अंदाज येतोय ना?) असा हा लोकरंग पाहून वाटले त्यापेक्षा मग संध्यान?द काय वाईट?
ही काय पद्धत झाली रविवारची पुरवणी काढायची?
म्हणे वाचकांनी आग्रह केला, की सगळ्या पुरवण्या दर आठवड्याला हव्यात आम्हांला!
आम्हांला एकदा असा आग्रह करणारे वाचक कुठे असतात त्यांना खरोखरच भेटून त्यांचे चरणरज मस्तकी लावायचे आहेत! की बाबांनो, तुमच्या आग्रहामुळे लोकसत्ताचा कागदाचा किती खर्च वाचला आहे. तोट्यातल्या पुरवण्या बंद करण्याऐवजी असा अभिनव फायदेशीर फंडा सुचवून तुम्ही आमच्या तमाम मालक लोकांचा कितीतरी शुभलाभ करून दिलेला आहे! तेव्हा एक हात "अंका'वर ठेऊन तुम्हाला सलाम!!

बाय दे वे, तो लोकसत्ताचा वाचक संशोधक विभाग... तो राहतो कुठे? त्याचेही एकदा संशोधन करायलाच हवे!!

Thursday, April 10, 2008

बातमी म्हणजे काय हो देवा?

आषाढी एकादशीच्या दिवशी (भारतीय सौर 4 श्रावण शके 1929, आषाढ शुक्‍ल एकादशी, गुरूवार, दि. 26 जुलै 2007) अंमळ लवकरच उठिलो. शौचमुखमार्जनादी प्रातःक्रिया उरकिल्यानंतर ताटलीभर साबुदाणा खिचडी हाणिली आणि कोपभर कषायपेय प्राशन केले. येणेप्रकारे तरोताजा झाल्यानंतर दरवाजात फडफडत असलेला ताज्या वृत्तपत्रांचा ढिग आत घेतला.
(येथे सांगण्यास हरकत नाही, की एक अल्प मुदतीची गुंतवणूक म्हणून हल्ली आम्ही किमान साडेतीन किलो वृत्तपत्रे घेतो! पूर्वी जेव्हा आम्हांस कचेरीतून वृत्तपत्रांचे बिल मिळत नसे तेव्हा घेत नव्हतो. आता घेतो. बिल मिळू लागले म्हणून नव्हे, तर वृत्तपत्रांचे भाव घसरिले म्हणून! आंग्लभाषिक वृत्तपत्र तर रोजी सहा आण्याला एक पडते. अशा खूप वृत्तपत्रांची वर्गणी भरावी. मग दोन महिन्यांनी रद्दी विकावी आणि महिन्याचे रेशन आणावे अशी ही आमची सर्वंकष गुंतवणूक योजना आहे.)

खाटेवर गुंडाळिलेल्या गादीस टेकूनी आम्ही वाचनाचे लाईफगार्ड (वाचाल, तर वाचाल! इति दिनकर गांगल, द्वारा ः ग्रंथाली.) कार्य करीत बसलो. एरवी वृत्तपत्रे वाचिताना आम्ही नेहमीच झपुर्झून जातो. पण आज लोकसत्ता वाचिताना काहीतरी खूप बिघडल्यासारखे वाटत होते. म्हणजे बघा, सर्व आंग्लभाषिक वृत्तपत्रांतील छायाचित्रे पाहूनी आम्ही ती नीट घडी घालून एका बाजूस ठेवोनी दिली. (यांचा रद्दीचा भाव जास्त असतो!) मग मटातील हसा लेको व चकोर वाचिले. मग समीर, अरूंधती आणि देविका या त्रिकोणात घडणारी रोहिणी निनावे यांची हृदयस्पर्शी मालिका - तू सुखी राहाचा पुढील एपिसोड मनःपूर्वक वाचिला. सौभाग्यवतींशी त्यावर उद्‌बोधक चर्चाही केली व त्यावरील प्रश्‍नाचे उत्तर शोधूनी काढले. तद्‌नंतर मुंबई सकाळचे दोन्ही अग्रलेख (देवाशप्पथ!) वाचिले. मग बराच काळ रांगोळी पाहावी तद्‌वत सकाळचा ले-आऊट पाहात बैसलो! मग बघु या मुंबई सकाळमध्ये आज कुठल्या-कुठल्या इंग्रजी दैनिकांतील बातम्यांचा पाठपुरावा घेतलेला आहे हे पाहात बैसलो! (सातवीत असताना आम्ही नकाशात गावांची नावे ओळखण्याचा खेळ खेळायचो. आता या वयात ते बरे न दिसे. तेव्हा मग आम्ही एक नवाच खेळ शोधून काढिला, की मुंबई सकाळ घ्यायचा आणि त्यातील बायलाईन स्टोऱ्या कुठल्या बरे आंग्लभाषी दैनिकाने आधीच छापिलेल्या आहेत हे हुडकूनी काढायचे! यात आम्हांला आश्‍चर्य वाटते ते याचेच, की मिरर, मिड-डे, एचटी, डीएनए, टैम्सॉफिंडिया या वृत्तपत्रांना कसे काय बोआ कळते की ही ही बातमी चार दिवसांनी सकाळमध्ये येणार आहे! आधीच छापून टाकितात लेकाचे त्या बातम्या! काही वृत्तपत्रीय नीतिमूल्येच राहिली नाहीत या आंग्ल दैनिकांत!)
त्यानंतर मग काय चाललेय मराठवाड्यात असे म्हणत मुंबईतला लोकमत वाचिला. मग आहेत का केतकर इंडियात असे म्हणत लोकसत्ता डोळ्यांपुढती घेतिला आणि आम्ही एकदम क्‍नफ्युजच झालो!

आपण लोकसत्ता वाचित आहोत की लोकमानस हेच समजेनासे झाले! चाळीशीची काच बनियनने पुसून घेतिली व पुन्हा पाहिले, तरी संभ्रम कायम! म्हटले, हे आपण वाचित आहोत ते वृत्तच आहे ना? दिसते तर बातमीच. मथळा होता "पाहुण्या तीन टिंब पाहुण्या, मग खालच्या ओळीत परत ये उद्‌गारचिन्ह' तिस बायलाईनही होती ः सुरेंद्र हसमनीस. (पाहा अगर वाचा - लोकसत्ता, दि. 26.7.7, पृष्ठ 1)

हसमनीस म्हणजे नारायण राणे मुख्यमंत्री असताना ज्यांच्या डोंबोलीच्या घरी गेले होते ते. चंदुअंकल ठाण्यात गेल्यानंतर जे टाकोटाक लालबागेस परतिले ते. तुम्हांस सांगतो, पागोट्याकडं पाहात धोतर फेडणारी बातमी लिहावी ती हसमनीसांनी!
अवघ्या पश्‍चिम महाराष्ट्राचे राजकारणी तोंडपाठ असणारा हा माणूस!
पण कचेरीतल्या राजकारणाने मागे राहिला! (असे ते व राजू कुलकर्णी व राहुल बोरगावकर म्हणतात!!)

पण "पाहुण्या तीन टिंब पाहुण्या, खालच्या ओळीत परत ये उद्‌गारचिन्ह' याला का बातमी म्हणायचे देवा?
तीही पहिल्या पानावरची बातमी?
आज मिसिंगची बातमी छापलीत, उद्या जाहीर नोटीसा छापाल! तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, माझे अशील हे... ऐसे.
आणि याला आम्ही बातमी समजून वाचावयाचे?
पण मग नजरेसमोर सुधीरपंत जोगळेकरजी आले. आणि वाटले सामाजिक समरसतेत कमी पडत असल्याने आपलेच तर काही चुकत नाही ना?

आता आम्ही काही रानडे इन्स्टिट्युटमध्ये (पुण्याच्याच नव्हे, तर ह. भ. प. संजय रानडे यांच्या संस्थेतही) पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे बातमी म्हणजे काय, उलटा पिरॅमिड कसा असतो, बातमी कशाची होते वगैरे ब्रह्मज्ञान आम्हांस असणे शक्‍यच नाही, हे सपशेल मान्य. तेव्हा अखेर आपलाच हा अज्ञानअंधःकार हे ओळखूनी अत्यंतिक शरणागत भावनेने आम्ही म्हटले, की असेल बोआ ही सुद्धा बातमीलेखनाची नवोन्मेषशाली अभिनव पद्धत!!

आणि एकदा हे मान्य केल्यावर मग पुढचे अवघेचि सोपे झाले!
कालच्या लोकसत्तेत आषाढी वारीची बातमीच नव्हती. आजच्या (भारतीय सौर 4 श्रावण शके 1929, आषाढ शुक्‍ल एकादशी, गुरूवार, दि. 26 जुलै 2007) लोकसत्तेत आषाढी वारीची बातमी आहे ती मागूनी दुसऱ्या पानावर (पृष्ठ क्रमांक 10). त्याचवेळी "विवा' या सुबक इस्टमनकलर पुरवणीत "फॅशनपंढरीची वारी यंदाही...' हा विचारप्रक्षोभक लेख मात्र आहे. तर आठ लाख लोकमान्य लोकशक्ती जेथे एकत्र येते त्या वारीबद्दल अशी ही आस्था कोठून, कशी व कशामुळे येते, असे प्रश्‍नही मग आम्हांस अजिबात पडिले नाहीत!
व आम्ही सुखेनैव लोकसत्तादी वृत्तपत्रे वाचू लागिलो!

बोला... पुंडलिका वरदा हारी विट्टल....

हॅप्पी आषाढी!!

Monday, April 7, 2008

आबूरावांचे बुंग बुंग!

(मुंबैतले काही थोरच पत्रबंधु आणि भगिनी बोईंगचा कारखाना याचि डोळा बघणेकरीता गतवर्षी स‌ंयुक्त स‌ंस्थानांत जाऊन आले. तेप्रसंगी आम्हांस खूपच पोटदुखी जाहली. तेसमयी प्रसवलेला हा लेख...)

""वैनी, आहेत का आबूराव?''
""हायेत की! ते काय बेडरूममधी फेऱ्या मारत्यात!''
""मॉर्निंग वॉक सुरू आहे वाटतं!''
""डोंबलाचं मॉर्निंग वॉक! दोन्ही हात हवेत पसरून घरभर फिरत्यात बुंग बुंग करीत! अमेरिकेस्नं परतल्यापासून ह्ये असंच चालू हाय... बोईंग वॉक!''
""म्हणजे जेट लॅग उतरला नाही वाटतं अजून...''
""कसला जेट लॅग अन्‌ कसलं काय! नाटकं मेली! जेटमधी सम्दं मोफत. नेट लावू लावू पित्यात अन्‌ म्हंत्यात जेट लॅग!''

(आबूराव वैनी खूपच वैतागलेल्या दिसत होत्या. वास्तविक आपले येजमान अमेरिकेला साक्षात्‌ बोईंग विमानाचा कारखाना पाहण्यास गेले होते - तेही एअर इंडियाच्या विमानाने - फुकट - म्हटल्यावर त्यांचा चेहरा कसा "प्रफुल्ल' दिसायला हवा होता! आपले येजमान म्हणजे उत्तर ध्रुव पाहून येणारा पहिला मराठी व "प्रतापी' पत्रकार ठरला आहे हे जाणून त्यांना किती "भूषणा'वह वाटायला हवे होते! पण नाही! कचेरीतले सहकारी आणि बायको यांच्यात याबाबतीत भल्तेच साम्य. कुणाचे आणि कसले कौतुक म्हणून करायचे नाही!!)

""वैनी, अशा चिडू नका हो. अहो, आमच्यासारख्या बोरूबहाद्दरांना जेथे विमान ही फक्त लांबूनच पाहायची गोष्ट, तिथं आबूराव विमानात बसून चक्क बोईंग विमानाची फॅक्‍टरी बघून आले - सरकारी खर्चाने! उत्तर ध्रुवावर स्वारी करून आलेले पहिले मराठी पत्रकार म्हणून त्यांचे नाव उद्या वृत्तपत्रांच्या इतिहासात लिहिले जाईल! आहात कुठे!!''
""काय सांगू नका त्याचं. त्यावरनंबी वाद हायेत की ध्रुव कोनी पैल्यांदा पाह्यला! ते पद्मभूषण देसपांडे म्हंत्यात अख्ख्या प्रवासात ते खीनभरसुद्दा झोपले नव्हते... म्हनून त्यांनीच पैल्यांदा ध्रुव पाह्यला!''

(बरोबर आहे! नसणारच झोपले! ते अमेरिकेला देले अन्‌ इकडे छगनरावांनी दक्षिण दिग्विजय केला. वृत्तांकनाला देसपांडे नेमके गैरहजर!! झोप नाही उडणार तर काय होणार? पन देसपांडे जागे म्हटल्यावर प्रधानजी कसे झोपले?)

""बरं वैनी, आबूरावांनी आणलं तरी काय अमेरिकेतून?''
""हे काय आननार? मंत्रालयातलं रिपोर्टर ना हे. बोईंगच्या दिनेश केसकरांशी जानपहेचान वाढवून आलं. बोईंगमधी कुनाच्या बदल्या-बढत्या करायच्या तं उपेग व्हईल म्हंत्यात!''
""चालायचंच! किमान या भेटीतनं त्यांचं इंग्रजी संभाषण तर फाडफाड झालं असेल. चांगले चार-पाच दिवस इंग्रजी लोकांमध्येच होते.''
""त्वांड बगा इंग्रजी बोलनाराचं! अवो हापिसात पीआरवाल्या पोरींशी बोलायचं म्हन्लं, तर दुसऱ्याकडं फोन देत्यात! अमेरिकेचा विसा घ्यायला गेलते तव्हा यांचं इंग्रजी ऐकलं तिथल्या बाईनं. पैल्यांदा पेनजॉन घेतलं म्हनं तिनं. म्हनली, हे आसं इंग्रजी बोलाया लागले तिथं तं ते बोईंगचे शिक्‍युरिटीवाले अरब अतिरेकी समजून गोळ्या घालतील! मंग त्यांची लई फोनाफोनी झाली एरिंडिया आन्‌ बोईंगवाल्यांशी. शेवटी आसं ठरलं, का ह्ये जातील तिथं मराठी मानसंच ठेवायची! म्हंजी मग भानगड नको!! आपलं (?) दिनेश केसकर तर उमरावतीचंच. विमानातबी कराडचं बाबासायेब जाधव, देवरूखाचं नंदकुमार हेगिष्टे असं कोन कोन होतं. बरं यांनी विमानात कायबाय इंग्रजी पिक्‍चर तरी बगायचं का नाही? तेबी मराटीच पाह्यलं.''
""कमालच झाली ही म्हणायची!''
""अवो, खरी कमाल वेगळीच हाये. आल्याधरनं सारकं बुंग बुंग चाललंय. मला हवाई सुंदरी म्हनत्यात. कव्हा कव्हा रामराव आदिकांवानी करत्यात. अमेरिकेत रात पडली तर इथं गादी टाकायला घ्येत्यात... काय इचारू नका! आनी आता या अवतारात हापिसात पाटवनंबी बरं दिसत नाही...''
""एवढंच ना? अहो मग त्याच्यावर साधासोपा उपाय आहे. सगळेच तो करतात. त्यांना या अमेरिका वारीवर आर्टिकल लिहायला लावा. एका फटक्‍यात सगळा ताप उतरल!''

आमचे बहिर्जी नाईक्‍स सांगतात, येत्या रविवारी विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये या अमेरिकावारीवर लेख येणार आहेत. म्हणजे सगळ्यांचाच आबूराव झाला होता की काय?
बरं हे तर हे...
अजून राहीबाई आणि कुमुदताई अमेरिकेतनं यायच्या आहेत. (मुख्य सचिव जॉनी जोसेफ अमेरिकेला थांबले होते ना, अगदी तश्‍शाच त्याही अमेरिकेला थांबल्या होत्या!) म्हणजे त्याच्या पुढच्या रविवारी त्यांचे लेख असणारच.
एकंदर काय, तर येते काही दिवस सगळ्याच पत्रांतनं हे बुंगबुंग चालणार!

Friday, April 4, 2008

काढीन मीही एक वाहिनी...

मुंबईच्या वातावरणात सध्या एन्फ्लुएंझाचे विषाणू आणि नव्या वाहिन्यांची चर्चा एवढेच दिसते आहे. प्रत्येकाच्या तोंडात एकच ः स्टार माझा पाहिलास? कसा वाटला? आयबीएनचे मराठी चॅनेल कधी येणार? निखिल आणि लोकमतचे पटणार का? मिलिंद कोकजेंचे असे काय झाले की त्यांनी पत्रकारिताच सोडली? संजीवकुमार लाटकर यांनी मल्टिराजीनामा दिला का? ते कोणत्या चॅनेलमध्ये जाणार? मग सकाळच्या चॅनेलचे काय होणार?

आमच्या बहिर्जी नाईक्‍सनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाखेरीस निखिल-लोकमत वाहिनी नक्की येतेय. आणि सकाळच्या चॅनेलचे काम कृष्णा खोरे पाटबंधारे कामांप्रमाणेच(!) जोरात सुरू आहे. अलीकडेच सकाळचे 60-70 जण म्हणे खास प्रशिक्षणासाठी हैदराबादेस गेले होते. तर एकूण सर्वांचे ठीकच चालले आहे.

वास्तविक चॅनेल काढणे हे काही फार अवघड काम नाही. काय लागतं काय त्याच्यासाठी? दीडदोनशे कोटी रूपये (आपल्याला काय नाय वाटत एवढ्या पैशांचं!), एखाददोन स्टुडिओ, बालवाडीतली मुले-मुली आणि दोनेक संपादक, सीईओ वगैरे मंडळी. ती काय हल्ली... मिळतात! (काय गंमत आहे ना! संपादक पायलीला पन्नास मिळतात आणि चांगले उपसंपादक मात्र द्याहीदिसा कंदिल घेऊन गेले तरी सापडत नाहीत! हवं तर लोकमतला विचारा. बिचाऱ्या संपादकांना तिथे पाने लावावी लागतात.)

तर नमनालाच एवढे घडाभर तेल लावल्यानंतर मूळ मुद्द्यावर येतो.
मुद्दा असा, की चॅनेल काय कोणीही काढू शकतो. दस्तुरखुद्द विसोबासुद्धा.
तुम्हांस सांगतो...

मनात आणीन तर बच्चमजी
काढीन मीही एक वाहिनी
दिपतील डोळे, इतरांसाठी
असेल ती विद्युतदाहिनी

सकाळसकाळी रोज प्रसारिन
बैठकीची ढिंगटांग लावणी
संपादकांची सुबक मेव्हणी
कुकरी शोची खास पाहुणी

राऊत करतील शो अध्यात्मिक
जिथे केतकर असतील अँकर
तारतम्यला लावून चाली
गाणी गातील स्वतः टिकेकर

देतील जेथे क्राईम स्टोऱ्या
दाऊद आणि राजन भाई
कोण खुलासे करील त्यांचे
कोणा गा मरणाची घाई?

...पण आम्ही आमच्या सगळ्याच योजना आताच का खुल्या करू? उद्या वेळेवर चॅनेल नाहीच आला, तर तुम्ही लगेच म्हणायला मोकळे, की विसोबा, सकाळच्या, सॉरी सॉरी... तुमच्या चॅनेलचे झाले काय?
हे म्हणजे मारूती कांबळेचे झाले काय असे झाले!
अखेरपर्यंत कोडेच!!

Thursday, April 3, 2008

स्टार माझाच्या स्टुडिओतून

नदीच्या घाटावर बसून एक संगमोत्सुक विवाहिता
ये तो बडा टॉइन है या भावगीताच्या तालावर
अंतवस्त्रं धूत बसलेली पाहून एकूणच
आपल्या संस्कृतीचे काय होणार असे म्हणत
आम्ही ठरविले की अशा वृत्तवाहिन्या न पाहिलेलेच बरे
तर सौभाग्यवती म्हणाल्या की अशाने आपण
मारेकरी होऊ कारण की आता कुठे
आपल्या मंडळींना वाहिन्या काढावी अशी जाग येत आहे
म्हटल्यावर आम्ही नवी वाहिनी कोणती पाहावी असा
सुविचार करीत बसलो असताना सौभाग्यवती आतूनच म्हणाली की स्टार माझा.
म्हणजे आता हे नवे कोणते शीतपेय बाजारात आले काय, या प्रश्‍नावर ती म्हणाली
तुम्ही स्वतःच जाऊन का पाहात नाही
म्हणून आम्ही स्टार माझाच्या कार्यालयात गेलो
तर तेथे खूपच लहान लहान गोजिरवाणी मुले दिसली
म्हटल्यावर हरकून विचारले की असे का, तर ते कवितेत म्हणाले
की या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या
न्यूज म्हणा रे न्यूज म्हणा स्टार माझा तुमचा समजा
अशी जाहिरात केल्यामुळे आता मुलेही
ये आई मला च्यानेलवर जाऊ दे
एकदाच गं टीव्हीवर मला न्यूज न्यूज देऊ दे
असे गीत म्हणू लागली आहेत
म्हटल्यावर आम्ही मुले कशा बातम्या देतात
हे पाहण्यासाठी स्टुडिओत गेलो
तर तेथे एक छानशी मुलगी
असावा सुंदर अविनाशचा बंगला
येणेप्रकारे छत्रपती अविनाश भोसले यांच्यासंबंधीचे वृत्त देत होती
ते ऐकून आम्ही आजची मुले किती निरागस असतात
असे धन्य होत पुढे गेलो तर तिथे गुन्हेगारीविषयक कार्यक्रमात निवेदक
लकडी की काठी
काठी का "घोडा'
इसके सर पे
उसने मारा हाथोडा
असे वृत्त देताना पाहून तर आमच्या डोळ्यांत आनंदाश्रूच येऊ लागले
?ह्‌णून आम्ही मागे फिरलो तर तिथे
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो असे हवामानवृत्त सुरू होते
ते ऐकून आम्ही श्रुती धन्य जाहल्या व आता
आपल्या भावी पिढीचा मुळीच काळजी नाही
व मराठी संस्कृतीही शाबूतच राहणार असे म्हणत
बीबीसीवर काय चालले आहे ते पाहू या म्हणत घरी परतलो.