Friday, April 25, 2008

लबाड लांडगं ढ्‌वांग करतंय...

आम्हांस प्रसिद्धीपत्रक काढण्यात अत्यंत आनंद होऊन राहिला आहे, की महामहीम सोनियाजी गांधीजी यांच्याप्रमाणेच आमचेही "नैतिक' समर्थन राजमान्य राजेश्री संजूबाबाच्या पाठीशी आहे!

संजूबाबाला शिक्षा होणार की नाही, शिक्षा झाल्यास बॉलिवूडचे किती पैसे बुडणार, त्याचे कोणकोणते चित्रपट "शेल्फ'मध्ये जाणार, त्याच्या शिक्षेचा मान्यताताई आदींवर कोणता "नैतिक' परिणाम होणार वगैरे महत्त्वपूर्ण प्रश्‍न तमाम मराठी पत्रांप्रमाणेच आमच्याही समोर होते. एक क्षण तर वाटले, की आपल्या सर्व बहिर्जी नाईक्‍सना याच कामी जुंपावे आणि संजूबाबाची बित्तंबातमी काढावी. पण नंतर आम्ही सुविचार केला, की विसूभाऊ, जर हेच काम आपली सर्व वृत्तपत्रे (मराठीसह!) व विविध कालिके व वृत्तवाहिन्या करीत असतील, तर ते आपण का बरे करावे? एकच काम अनेकांना देण्याइतपत सहयोगी संपादक का आपल्याकडे आहेत? तेव्हा आम्ही मग त्या बित्तंबातमीसाठी मराठी पत्रेच चाळू लागलो.

आमची ही पत्रे मोठी हुशार व विश्‍वासार्ह व निःपक्षपाती! त्यामुळे संजूबाबाला शिक्षा होताच त्यांनी कसे फटाक्‌न अग्रलेख लिहिले व त्यांत संजूबाबा कसा दोषी व गुन्हेगार व शिक्षेस पात्र आहे व प्रसारमाध्यमे कशी त्यापायी वेडी व पागल व पिसाट झाली आहेत असे विचारसंपृक्त व विचारप्रक्षोभक व विचारगर्भ विचार मांडले! (आमचे हे लेखन काहीसे "सकाळ'च्या अग्रलेखाच्या अंगाने चालले आहे, याची आम्हांस जाणीव आहे. पण नाईलाज आहे! काही काळ आम्हीही तेथे संपादकीये लिहिली, त्याचा वाण व गुण लागणारच!)

हे अग्रलेख अत्यंत व खूपच निःपक्षपाती असल्याने त्यात संजूबाबाचा उदोउदो करणाऱ्या व त्याचीच मोठी व विस्तृत वृत्ते देणाऱ्या माध्यमांवर टीका करण्यात आली होती. ते वाचून आम्ही जरा काळजीतच पडलो होतो, की आता हे संजूबाबाला फारसे महत्त्व देणारच नाहीत की काय! पण महाराष्ट्र टाईम्सपास, लोकमत, सकाळ, सामनादी दैनिके चाळली व संजूबाबाचे कैसे झोपणे, संजूबाबाचे कैसे खाणे, संजूबाबाचे कैसे सलगी देणे याची तमाम सचित्र खबर पहिल्या पानावर पाहिली व आम्ही निःशंक व काळजीहीन व चिंतामुक्त झालो!

तरीही आमचे अंतःकरण व हृदय संजूबाबाच्या काळजीने धपापतच होते, की कारागृहाच्या वसतीगृहात कसलेकसले लोक व गुन्हेगार व पोलिस असतात, त्यांच्या सहवासात संजूबाबा बिघडणार तर नाही ना! "जेलच्या बराकीत तो एकटाच आहे'! (माहिती सौजन्य - मटा, दि. 2 ऑगस्ट). त्याचे तेथे रॅगिंग तर होणार नाही ना? त्याला तेथे कष्ट करून "विनम्रतेने 12 रूपये 12 आणे कमवावे लागणार'! (माहिती सौजन्य - मटा, दि. 3 ऑगस्ट) त्याला त्रास तर होणार नाही ना?
पण "येरवडा कारागृहात संजूबाबास सकाळी सात वाजता दोन केळी, दूध देण्यात आले. न्याहरीस दोन पोळ्या व उसळ देण्यात आली. दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण त्याला कोठडीतच पुरविण्यात आले', हा अत्यंत महत्त्वाचा व विधायक तपशील समजल्यानंतर (माहिती सौजन्य - सकाळ, 4 ऑगस्ट) आम्हांस खूप बरे व चांगले वाटले, की घेताहेत, घेताहेत संजूबाबाची चांगली काळजी घेताहेत... आमची सोन्याहून पिवळी व स्वतंत्रतेहून स्वतंत्र व विधायकतेहून विधायक मराठी वर्तमानपत्रे आणि येरवडा वसतीगृहवाले!!

आता आमच्या मनात एकच प्रश्‍न व सवाल पिंगा व फेर घालतो आहे, की काल (ता. 3 ऑगस्ट) लोकसत्तेला काय असे पिसाटायला झाले होते, की त्यांनी "पिसाटलेला मीडिया' असा अग्रलेखच लिहिला व त्यात उपग्रह वृत्तवाहिन्यांना बदडून व झोडून काढले?

या प्रश्‍नावर आम्ही खूप खोल व गहन विचार करीत होतो, तोच "सह्याद्री'च्या कडेकपारीतून "लबाड लांडगे ढोंग करते...' या छानशा भावगीताचे सूर घुमले! आणि वाहिनीच्या त्या बोधीवृक्षाखाली आम्हांस अचानक व एकदम साक्षात्कार झाला, की अरे, हे तर आपल्या तमाम व अवघ्या पत्रांचेच ब्रीदगीत!!
तुम्हांस काय वाटते?

No comments: