Saturday, March 29, 2008

माझ्या खवचट खेचरा...

गेले चार-पाच दिवस तू कोठे उलथला होतास? माझा फोनही घेत नव्हतास! स्वतःला उद्धव ठाकरे समजतोस की काय? लक्षात ठेव, आपली युती अशी नाही तोडू देणार मी! गेल्याच महिन्यात वडाच्या फांदीला फेऱ्या मारून तुला सात जन्म मागून घेतला आहे. या महिन्यातही बरीच व्रते-उद्यापने, उपासतापास येतात. ते "सकाळ'मध्ये साग्रसंगीत येईलच. त्यानुसार सर्व काही यथासांग करण्याचे मी ठरविलेच आहे. तेव्हा तुझी सुटका नाही!!

माझ्या उचलखोर उचापत्या,
"सकाळ'मध्ये यंदा श्रावण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहेत. तेव्हा "सकाळ'वाले "व्रत'स्थ महिलांचे, मंगळागौर जागविणाऱ्या भगिनींचे, उपवास करणाऱ्या पुरंध्रींचे फोटो छापणार आहेत काय, याचीही जरा चौकशी करून ठेव. छापणार असतील, तर नऊवारी साडीची सोय आताच करून ठेवलेली बरी. तुला आठवते? गेल्यावर्षी आपण दोघे मिळून अख्खे हिंदमाता फिरलो, तरी नऊवारी मिळाली नव्हती. तेव्हा मटामध्ये फोटो छापून येत होते! यंदा तरी तू माझा फोटो पेपरात छापून आणणार ना? हवे तर ब्लॉकचे पैसे देऊ आपण त्यांना!! असो.
पण तू खरेच कुठे गेला होतास? तुझ्या कचेरीतले लोक म्हणतात, की तुला पत्रकारांचा एड्‌स झालाय! - ऍक्वायर्ड इंटेलिजन्स डिफिशियन्सी सिंड्रोम!! माझ्या विसविशीत विसोबा, तुझ्याबाबतचे हे निदान तर मी मागेच केले होते! खरे तर मराठी पेपरांत हा रोग आता बराच पसरल्याचे दिसत आहे. या रोगाचे गावठी नाव "बनचुके' असे असल्याचे म्हणतात. सतत नव्या गोष्टींना नावे ठेवायची, नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती यांना नाके मुरडायची अशी काही या रोगाची लक्षणे आहेत. तुझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून ती सहज दिसतात. नव्यातील चांगल्या गोष्टींचे स्वागत करायला जितक्‍या लवकर शिकाल, तितके बरे! नाही तर मग तुमचीच एक मोठी विसंगती होऊन जाते. आणि मग लोक तुम्हांला हसतात, तर तुम्हांला वाटते की तुमच्या विनोदांना हसतात! एड्‌समध्ये असेही भ्रम होतातच म्हणा!

माझ्या रागीट रेडक्‍या,
तुला माझा राग तर नाही ना आला? रागावू नकोस रे! रागावलास, की तू सामनाच्या ले-आऊटसारखा दिसतोस! अरे, अलीकडे तू सामना पाहिलास का? राऊत साहेब रजेवर असून, भारतीताई त्याचे संपादन करीत आहेत, असे काहीसे झाले आहे काय? असो. मी रागावण्याबद्दल बोलत होते. तू माझ्यावर रागावणार नाहीस याची खात्री असल्यानेच खरे तर मी एवढे स्पष्ट लिहित आहे. अन्यथा मला काय अग्रलेख लिहिता येत नाहीत? अग्रलेख म्हणजे लोकसत्ताचे सोडून बरे का! नाही तर तुझा पारा एकदम चढायचा! तुम्ही केतकरी संप्रदायवाले ना!! पण माझ्या आगाऊ अडाण्या, तुम्ही केतकरांना आता सांगत का नाहीत, की त्यांचे अग्रलेख मुख्य अंकाबाहेर छापत जा म्हणून! कारण अलीकडे त्यांच्या अनेक अग्रलेखांचा आणि मुख्य अंकाचा जणू काही संबंधच नसतो! अग्रलेखातले संपादकीय धोरण वेगळे आणि बातम्यांतले वेगळे असे काही विचित्र चालले आहे. हवे तर याविषयी एकदा कक्काजींशीही बोलून घे! माझे, त्यांचे, श्रीकांतजींचे आणि शुभदाताई चौकरांचे मत अगदी सारखेच असेल!!
असो. खूपच लिहिले. एवढे वाचायचे म्हणजे तुला त्रासच! त्यातच काल गटारी होती. म्हणजे डोके अजून उतरले नसेल! "ती' उतरली तर "ते' उतरणार ना!! तेव्हा येथेच थांबते.

एकट्या तुझीच,
सही

ता. क. - लोकसत्ताच्या नरिमन पॉईंट येथील स्थलांतराचा मुहूर्त ठरला का रे? कळव.

Friday, March 28, 2008

कसलं काय अन्‌ फाटक्‍यात पाय!

ना घरात, ना घराबाहेर, ना व्यासपीठावरून, ना व्यासपीठाखालून अशा पद्धतीने मावळते राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी तमाम प्रसारमाध्यमांच्या बुडाखाली एका अग्निपंखी सवालाचे मिसाईल डागले आणि मराठी पत्रसृष्टी विचारमग्न झाली.
भारतातील एक अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमे स्वीकारतील का? या कलामांच्या सवालाने सर्वांनाच तिढा घातला होता. जबाबदारी मोठी होती. आव्हान मोठे होते. प्रश्‍न जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा होता!

केतकरांनी (पक्षी : कुमार केतकर, एनआरआय एडिटर, लोकसत्ता) ठरविले, की यावर किमान एक अग्रलेख तर लिहिलाच पाहिजे. (रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यातच व्यासपीठावर अर्धवट बसून कलामांनी हा खडा सवाल टाकला होता. म्हणजे हे एकतर घरचेच कार्य होते. आणि दुसरे म्हणजे दंतशस्त्रक्रिया झाल्यानंतर बऱ्याच दिवसांत कुणाचाही बाईट न घेतल्याने त्यांचीही जरा गोचीच झाली होती!) तेव्हा त्य?ंनी फटाककन्‌ आपल्या टपोऱ्या अक्षरांत एक अग्रलेख लिहून काढला. (केतकरसाहेब, निवृत्तीनंतर लोकसत्ताच्या परंपरेनुसार तुम्ही कसे हो सकाळमध्ये जाणार? तुम्हांला तर संगणकावर लिहिताही येत नाही!) अग्रलेख तर लिहिला, पण पुढे काय? त्याचा लॉजिकल एंड काय? ते डावीकडून विचारात पडले...

इकडे डॉक्‍टर टिकेकरही आपल्या "स्टडी-फ्लॅट'मध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. आपलीच "जन-मन', "तारतम्या'दी ग्रंथसंपदा पुनःपुन्हा वाचूनही त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. चिंतन करकरून त्यांना श्‍वास घुसमटल्यासारखे वाटू लागले. जरा वेळाने त्यांच्या लक्षात आले, की आपल्या सदनिकेत एवढा धूर साचला आहे की आत ऑक्‍सिजन येण्यासही जागा नाही. तेव्हा त्यांनी खिडकी उघडून दुसरी सिगारेट शिलगावली. कलामांच्या सवालावर एखादे पुस्तक लिहावे काय? "श्रीविद्या'शी बोलले पाहिजे, असा उदात्त मध्यममार्गी अनुनासिक विचार त्यांच्या मनात तरळून गेला...

राऊत गणपतीवाले यांची अडचण वेगळीच होती. हे एक अब्ज लोक म्हणजे नेमके कोण? ते कोठे राहतात? पार्ल्यात, गिरगावात, डोंबोलीत की बदलापुरात? हे लोक विकेंडला कोठे जातात? त्यांचे अध्यात्म काय आहे? ते शिवसेनेत असतात की मनसेमध्ये? राज्यसभेवर जाण्यासाठी या एक अब्ज लोकांची मते आवश्‍यक असतात काय? त्यांच्या लक्षात काहीच येत नव्हते. त्यांनी मग उजवीकडून डाव्या दृष्टिकोनातून विचार सुरू केला, की बघू या टैम्सॉफ इंडिया काय करतेय ते. मग आपण आपले धोरण ठरवू...

त्याचवेळी संजीवकुमार लाटकर अतिशय काळजीपूर्वक टीव्ही चॅनेल्स पाहात होते. त्याचवेळी त्यांचे लॅपटॉपवर नेटसर्फिंग सुरू होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्‍यात नव्या कथेचा आराखडा घुमत होता. त्याचवेळी ते नाश्‍ताही करीत होते. मोबाईलवर बोलणे तर अखंड सुरूच होते. असे सर्व मल्टिकाम सुरू असतानाच त्यांचे कलामांचे करायचे काय या प्रश्‍नावरील चिंतनही सुरू होते. याविषयावर एफएमवर एखादे चर्चासत्र करावे? की चॅनेलवर डॉक्‍युमेंट्री? त्यांचे नक्की काही ठरत नव्हते...

हे सर्व सुरू असताना सकाळमध्ये सर्व संपादकांची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झाली होती. त्यात आधी आनंदराव आगाशे यांचा जागराचा कार्यक्रम झाला. मग साबडे, मग खोले, मग पाध्ये, मग मालकर असे सर्व मनसबदार बोलले. त्यावर राज्यातील सर्व आवृत्त्यांच्या सरदारांनी माना डोलावण्याचा कार्यक्रम झाला. (त्यांना वाटले हे सर्व आपल्याच चॅनेलबद्दल चालले आहे!) मग पुण्यातून कॉन्फरन्स संपविण्यात आली. तर या सर्व उपक्रमात असे ठरले, की श्री. कलाम यांच्या आवाहनावर विचार करण्याकरीता लवकरच पुण्यात ना उजवीकडे ना डावीकडे अशी बैठक घेण्यात यावी...

लोकमतमध्ये मात्र अद्याप सामसूमच होती. दिनकरबाबूजी औरंगाबादला गेले होते. आजही बारा पानांचा हा गोवर्धन आपणांस एकट्यानेच उचलायचा आहे, या विचाराने गिरधारी थकले होते. भारतात एक अब्ज लोक आहेत. त्यात दोन-चार चांगले उपसंपादकही असू नयेत व ते आपणांस मिळू नयेत, या विचाराने ते कालच्याप्रमाणेच आजही चिडचिडले होते...

येणेप्रकारे कलामांच्या सवालाने सर्वांनाच विचारात पाडले होते.
आणि मग दुसरा दिवस उजाडला....
धडधडत्या काळजाने आम्ही वाचनालयात गेलो.
एकेक पेपर चाळू लागलो.
म्हटलं, या लोकांनी काल कलामांना फारच मनावर घेतलं. आज काही उत्तम, उदात्त आणि उन्नत घोळ नाही ना घातला!
पण पेपर चाळले आणि सर्व शंका ढगात गेल्या!
राजकारण्यांचे कलगीतुरे
सर्वक्षेत्रीय घोटाळे
नोकिया आणि कंडोमच्या जाहिराती
मालिका आणि गणपती
सेन्सेक्‍स आणि बॉबी डार्लिंग
सारे काही जागच्या जागी होते.

क्त राष्ट्रपती तेवढे बदलले होते.
तेव्हा आम्ही एक अब्ज लोकांच्या वतीने कलामांना म्हटले, चाचा, कसलं काय आणि फाटक्‍यात पाय!

Sunday, March 23, 2008

पत्रसृष्टीतील वर्णव्यवस्था

गणपतीची (आजचा गणपती : वरची आळी, कातकरवाडी बु।।) शप्पथ, मटा जेवढा पुरोगामी आहे, यज्ञयाग करून सकाळ जेवढा पुरोगामी आहे आणि वास्तुशास्त्र छापून लोकसत्ता जेवढा पुरोगामी आहे तेवढेच आम्हीही पुरोगामी आहोत. तरीही आम्हाला असे नेहमी वाटते की आपल्या मराठी पत्रसृष्टीत एक वर्णव्यवस्था आहे. छुपी. लोकसत्तातल्या गटबाजीसारखी. ती असते, पण बाहेरून पाहणाऱ्याला दिसत मात्र नाही.
एका समाजशास्त्रज्ञाने त्यांचे वर्गिकरण केले आहे. ते येणेप्रमाणे :

मटावर्ण‌ : हा उच्चवर्ण. गणपती हे त्यांचे आराध्यदैवत. आपली पत्रकारिता ही अत्यंत देदिप्यमान असून, समाजपुरूषावर उपकार करण्याच्या हेतूनेच आपण सांप्रती अवतार घेतलेला आहे, अशी या वर्णाची समजूत असते. पार्ले, गिरगाव यानंतर डोंबिवली-बदलापूर ते थेट अमेरिकाच असा यांचा परिघ. त्याबाहेर धावते जग आहे हे त्यांना ऐकून माहित असते. मराठीत अन्य वृत्तपत्रेही निघतात हेही त्यांना ऐकूनच माहित असते. या वर्णाचा हल्ली "टैम्साफ इंडिया'पासून "मुंबई संध्या'पर्यंतच्या विविध जातींशी संकर झालेला असल्याने त्यातून काही वेगळेच धारावाही रसायन जन्माला आलेले दिसते. अर्थात नावापासूनच आंग्ल-मराठी सरमिसळ झालेली असल्याने या संकराचे यांना काही वाटत नसते, असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे.

लोकसत्तावर्ण : काहीही असो, कुणीही असो, एखादा डोक्‍यात गेला की तुटून पडणे असा क्षत्रियी बाणा (हा लालबागच्या पाण्याचा दोष नव्हे!) हे या वर्णाचे लक्षण. झाडीमंडळापासून अपरान्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खंडातील भ्रष्टांचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा यांच्या पूर्वजांनी केली असावी. आता मात्र कापे गेली भोके उरली अशी अवस्था आहे. या वर्णात सुवर्णास अत्यंत पूजनीय मानले जाते. त्यामुळे ते सोनियाची नाणी पूजतात. चिमटे, टोले अशी अस्त्रे ते नित्य वापरतात. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे जशी स्त्री असते, तशीच या वर्णाच्या यशस्वी वाटचालीमागेही महिला आहेत, असे म्हणतात. त्याचा पुरावा म्हणून समाजशास्त्रज्ञ त्यांच्या पुरवण्यांकडे बोट दाखवतात. नावातच सत्ता असल्याने या वर्णीयांना त्याची बाधा झाली असल्याचे दिसून येते व ते अन्य वर्णीयांकडे त्याच दृष्टीने पाहतात.

सकाळवर्ण : शुभ्र पोचट रंग हे या वर्णाचे व्यवच्छेदक लक्षण. सर्वच ग्राहकांना खुश ठेवण्याच्या वैश्‍यवृत्तीने व्यवसाय करण्याचे संस्कार असल्याने हे वर्णीय कोणाच्याही अध्यात वा मध्यात नसतात. यांची एक पवित्र पोथी असून, त्यात या वृत्तीला निःपक्षपातीपणा असे म्हटल्याचे दिसते. या वर्णात कुलाचार, परंपरा यांस अतिशय महत्त्वाचे स्थान असून, कोणताही निर्णय ते जातपंचायतीच्या माध्यमातूनच घेतात. या जातपंचायतीची बैठक नेहमीच सुरू असते. तेथे निर्णय घेतले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी होण्याच्या आतच नवीन निर्णय घेतले जातात. हे चक्र ऋग्वेदकालापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. यामुळेच या वर्णात "निर्णय प्रलंबन स्तोत्र' आवडीने म्हटले जाते असे काही धर्मशास्त्रज्ञांचे मत आहे. या वर्णीयांनी शिक्षण व्यवस्थेत चांगलीच भर घातली असल्याचा इतिहास आहे. शिक्षणानंतर येथील अनेक जण वर्णांतर करतानाही दिसतात.

लोकमतवर्ण : हल्ली ज्याला बहुजनसमाज म्हटले जाते तो हा वर्ण. यास उच्चवर्णीय शूद्र म्हणतात, तसेच काही जण क्षुद्र असेही म्हणतात. मात्र या वर्णाचे अनुयायी सर्वत्र पसरले आहेत. या वर्णीयांना अन्य वर्णात सहसा सामावून घेतले जात नाही. मात्र अलीकडे वैश्‍यवर्णाशी यांचे रोटीसंबंध जडल्याचे दिसून येते. हा वर्ण अन्य वर्णांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत असला, तरी त्याची काही बलस्थानेही आहेत.

पत्रसृष्टीतील वर्णव्यवस्थेचा विचार करताना भटके-विमुक्त आणि आदिवासींचाही विचार टाळता येणार नाही, असे हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो. त्याच्या मते "तारा' व "प्रभात' ही दोन नक्षत्रे मावळल्यानंतर झालेल्या उलथापालथीमध्ये हे भटके-विमुक्त काहीसे अदृश्‍य झाले होते. मात्र अलीकडेच काही मानववंशशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत यांची संख्या आता चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. या भटक्‍या आणि विमुक्त जाती-जनजातींचे वैशिष्ट्य म्हणजे हे सतत अस्थिर असतात. ते कपाळावर स्टारच्या आकाराचे चिन्ह लावतात. त्यांच्यात काही "झी'लकरी असल्याचे आढळून आले आहे. त्यांतील अनेकांच्या कुळात डंबेल्ससदृश वस्तूला अत्यंत महत्त्व असते. त्या वस्तुच्या साह्याने ते भूल टाकतात अशी बोलवा आहे. या भटक्‍या आणि विमुक्तांच्या मेंदूच्या आकाराबद्दल सध्या "24 तास' संशोधन सुरू असून, सर्वज्ञानी असल्याचा गंड त्यांना कोणत्या कारणाने व केव्हा झाला हेही अद्याप एक गूढच आहे. याच वर्णातील काही लोक प्रगतीचे वारे न शिवल्याने आदिवासीच राहिले असून, त्यांचा सपट महाशोध घेण्याचा समाजशास्त्रज्ञांचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र हे लोक खूपच बुजरे, दबलेले, पिचलेले असे असल्याने ते दूरदर्शनातच धन्यता मानतात, असे सांगण्यात येते.

Saturday, March 22, 2008

लेले आणि मी

"तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजत असलात, तरी तुम्ही एक नंबरचे गाढव आणि घोडे आहात, विसोबा!''

शेजारचे लेले रोज सकाळी आपला म.टा. वाचून झाल्यानंतर "लोकसत्ता' घेऊन जायला डॉक्‍टर टिकेकरांकडे जात. आज त्यांनी आमच्याकडे कशी वाकडी वाट केली आणि तेही इतकी फणफणत हे काही आम्हांला उमजले नाही. मग लक्षात आले, की डॉक्‍टर आता महाराष्ट्राचे राहिले नाहीत. एशियाटिक झालेत! पूर्वी ते आणि लेले असा दोन निवृत्तांचा टिचकीसंवाद चालायचा. परंतु आता एशियाटिकमध्ये बऱ्याच शस्त्रक्रिया करायच्या असल्याने, बऱ्याच जणांना "टाटा' करायचा असल्याने डॉक्‍टरांकडे लेलेंना देण्यासाठी वेळ नसणार. आम्ही तसे रिकामे. त्यामुळे लेलेंनी आज त्यांची पायधूळ आमच्या खाटेवर झाडली असावी.

"बरोबर आहे लेले तुमचं. आम्ही दोन्हीही आहोत. खेचर! पण तुम्हांला सकाळी-सकाळी एवढं चिडायला काय झालं? आज मटाऐवजी सामना वाचलात काय?''
"चिडू नको तर काय? तुम्ही हे जे उद्योग चालवलेत त्याने सगळे खुश आहेत असं वाटलं काय तुम्हांला?''
"कोणते उद्योग लेले?''
"भिंतीला तुंबड्या लावण्याचे!... अहो विसोबा, आम्हांलाही कळतात बातम्या म्हटलं. आता तुम्ही दैनिकाचं काम पाहात नाही. त्यामुळे रिकामा वेळ भरपूर. तेव्हा सुचतात असे काही भंकस उद्योग, याच्या-त्याच्या टोप्या उडवायचे. कुणाला गणपतीवाले म्हणता, कुणाला एनआरआय एडिटर! कुणाच्या नावाने काहीबाही गाणी लिहिता, कविता करता. पेपरांवर टीका करता. ही काही सभ्य माणसाची लक्षणं नाहीत!''
"लेले, अहो, ती एक निर्विष भंकस असते. ती एवढी मनावर घ्यायची नसते. कोणी घेतही नसेल म्हणा... पण तुमचे कलंदर, टिचकीबहाद्दर, झालंच तर आताचे सूर्यभट्ट, चकोर, तंबी दुराई, विनोदी पक्षनेता, स्वतःचा नावपत्ता सांगत परत टोपणनावाने लिहिणारा मामू हे लोक राजकारणी, नट-नट्या, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर लिहितात ते मात्र तुम्हांला चालतं! आणि आम्ही पत्रकारांबद्दल लिहिलं तर तुम्हांला राग येतो, याला काय म्हणायचं? हे म्हणजे आमच्या हिंदुहृदयसम्राटांप्रमाणे झालं! ते कुणालाही काहीही म्हणणार. त्यांना कोणी काही म्हटलं तर मात्र कचेऱ्या तोडणार! हे वागणं तुम्हांला तरी पटतं का लेले?''
"ते वेगळं आणि हे वेगळं. तुम्हांला आपलं चांगलं काही दिसतच नाही.''
"तसं नाहीये लेले. आजकाल मटासुद्धा आम्हांला आवडायला लागलाय. खूपच बदललाय तो! लोकसत्ताचं एडिट आणि ऑपेड पेज वाचलं नाही तर चुकल्यासारखं होतं आम्हांला. लोकमतची रविवार पुरवणी, सकाळचे जागर, मुक्तपीठसारखे वेगळे उपक्रम... भावतं आम्हाला हे सारं. पण लेले, हैदराबादला स्फोट होऊन चाळीसेक माणसं मेल्याची बातमी देताना "हादराबाद' असं थिल्लर हेडिंग देण्याचा "मट्ट'पणा कोणी केल्यावर मग भंकसशिवाय करणार काय?''
"म्हणजे तुम्ही आता सगळे पेपर सुधारायला निघालात म्हणा की! तुम्ही स्वतःला समजता तरी कोण म्हणतो मी!''
"लेले, प्रश्‍न तो नाही. प्रश्‍न हा आहे की आम्ही सगळे मिळून स्वतःला, म्हणजे प्रिंट इंडस्ट्रीला काय समजतो?''
"मी नाही समजलो!''
"असं बघा, आम्ही पेपरवाले त्या चॅनेलवाल्यांना किती झोडून काढत असतो...''
"मग झोडायला नको? अगदी ताळतंत्र सोडलाय त्यांनी. किती अतिरंजित आणि भडकपणाने दाखवतात हो सगळं. पाहावत नाही. दिवसभर आपलं तेच ते दळण. परवा ऐश्‍वर्या गर्भारशी आहे की नाही याची समीक्षा चालू होती. नशीब तिचे सोनोग्राफी रिपोर्ट दाखवले नाहीत! हल्ली मी बातम्यासुद्धा एकट्यानेच पाहतो. आजुबाजूला नातवंडं असली की अवघडायला होतं हो!''
"मराठी पेपरांत तेवढं होत नाही अजून! पण आम्हीही चॅनेलवाल्यांच्या फार मागे नाही आहोत, लेले. ही ही रंगीत पानं, रंगीत मोठमोठे फोटो, ग्लॉसी पुरवण्या, त्यांचे विषय सगळंच चॅनेल्सच्या वळणावर चाललेलं आहे. तिकडं लाफ्टर चॅलेंज असतं, तर इकडं हास्यरंग. तिकडं सिरियल्स असतात, तसं इकडं "तू सुखी राहा'सारख्या क्रमशः कादंबऱ्या. तिकडं कुकरी शोज तर इकडं पाककृती. तिकडं बातम्यांमध्ये विनोद करायला लागले, तर इकडे पहिल्या पानावर विनोदी लेख बातम्या म्हणून यायला लागले. इकडं मटा-लोकसत्ता असेल तर तिकडं आयबीएन असतो. इकडं वार्ताहर-संध्यानंद तसा तिकडं इंडिया टीव्ही-आजतक.... एकूण काय, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी! आणि वर आम्ही त्यांना पत्रकारितेचा धर्म शिकवणार. ही भोंदूगिरी नाही वाटत तुम्हांला?''
"भोंदूगिरीचं माहित नाही. पण विसोबा, तुमचं ऐकल्यावर असं वाटू लागलंय की त्या जशा वृत्तवाहिन्या तशाच तुमच्या या पत्रवाहिन्या! आहे काय आणि नाही काय!!''

शेळी शिंकली...

होय, शेळीला शिंक आली.
चांगली सटकून शिंक आली.

पाहता पाहता बातमी कानोकानी झाली. मंत्रालयात, विधान भवनात, आमदार निवासात कुजबुज सुरू झाली. अधिवेशन नसल्याने सध्या मुंबईत फारसे आमदार नव्हतेच. होते त्यांनी पटापट मतदारसंघात मोबाईल लावले. पीएंना रेल्वेचे आरक्षण करायला धाडले.
शेअरबाजारचा कारभार नुकताच कुठे सुरू झाला होता. निर्देशांक "कालच्या बंद'हून थोडासा वर गेला होता. पण दलालांच्या मुखावर आनंद नव्हता. बेपारी मंडळींचे एक वेगळेच माहितीचे महाजाल असते. त्यातून ही बातमी आणखी काही काळातच अहमदाबाद, सूरत, वडोदरा अशी होत होत सिंगापूर, दुबई, मलेशिया, अमेरिका, ब्रिटन अशी पसरणार होती. त्यानंतर काय होणार हे दलालांच्या चेहऱ्यावर आताच वाचता येत होते.

इकडे वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर अद्याप आपल्या नेहमीच्या गतीने विविध वृत्तपत्र कार्यालयांतल्या संगणकांवर बातम्यांचा रतीब घालत होते. पण हे आणखी काही काळच. यानंतर ज्या वेगाने फ्लॅश आणि अपडेट्‌स येणार होते त्यांपुढे संगणकांच्या सीपीयूचा वेगही कमी पडणार होता.
मंत्रालयातल्या पत्रकारकक्षाला मात्र नेहमीप्रमाणेच अद्याप जाग आलेली नव्हती. एका उर्दू पेपरचा लांब दाढीवाला वार्ताहर तोंडावर वृत्तपत्र ठेऊन कोचावर पेंगत पडला होता. नव्यानेच या बिटला आलेला एका दैनिकाचा पत्रकार उगाच आपल्या हातात मोठे स्कूप असल्याचा आव आणत खिडकीशी उभा राहून मोबाईलवरून बहुतेक त्याच्या चॅनेलमधील मैत्रिणीशी मोठ्याने बोलत होता. काही फुटकळ पत्रकार आज कुठे जावे याचा विचार करीत वृत्तपत्रांची चाळवाचाळव करीत खुर्च्यांवर बसले होते. बाकी सर्व शांत होते.

आणि जणू काही कोणी आधीच ठरविल्यानुसार एका विशिष्ट क्षणी तमाम वृत्तपत्रांच्या कार्यालयातले दूरध्वनी, संपादकांचे, वृत्तसंपादकांचे, मुख्य वार्ताहरांचे मोबाईल किणकिणू लागले. पण अजूनही सगळाच गोंधळ होता.

मध्ये मुंटावाल्यांची सकाळची बैठक सुरू होती. तेवढ्यात मुकेशकुमारांना मोबाईल आला. - शेळी शिंकली. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर "रोजा'तली शेळ्यांमधून फिरणारी अल्लड, नटखट, मोहक मधु तरळून गेली. पण गेले ते (पानभर चित्रपट परिक्षणाचे) दिन गेले! मॅनेजमेन्टच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे एक सुस्कारा सोडत ते कामाकडे वळले आणि प्रवीणला म्हणाले, चांगली बातमी आहे. शेळी शिंकली. पण आपल्याला काय त्याचं? ते (पक्षी ः संजीवकुमार!) मुख्य अंकात बघतील. आपण परवा ठरल्याप्रमाणे आज कुत्र्यांचीच बातमी चालवू.

साबडे अद्याप घरीच होते. सोमवारच्या अंकात आलेला "म्हाताऱ्यांनी काय घोडं मारलंय...?' हा आपलाच लेख ते चौदाव्यांदा वाचत होते. "अमिताभने तरूण मुलीच्या प्रेमात पडायचं नाही हा अट्टहास का?' हा आपलाच सवाल वाचताना त्यांना जाम गुदगुल्या होत होत्या. अखेर (एकदाचा) त्यांनी तो जिया खानचे छायाचित्र असलेला लेख बाजूला ठेवला. शेळी कशामुळे शिंकली हे नक्की समजलेले नव्हते. पण आपला त्याविषयावरचा अग्रलेख लिहून ठेवलेला बरा असे म्हणत त्यांनी संपादकांना (पक्षी : राऊत, गणपतीवाले) दूरध्वनी लावला.
साबडे दूरध्वनीवरून बोलत होते त्यावेळी खांडेकरसुद्धा त्यांच्या दूरध्वनीवरून बोलत होते. खास विलासरावांची खास शिकागोहून खास मुलाखत घेतल्यानंतरचे बहुत सुकृतांची जोडी असे खास भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ते पाहून डेस्कवरल्या तमाम उपसंपादकांच्या मनात, विलासराव मुंबईत आल्यानंतर जे सांगणारच होते, ते ऐकण्यासाठी अमेरिकेत "एसटीडी' करून पैसे वाया घालविण्याची खरेच आवश्‍यकता होती का, असा "मटा कौल' तरळत होता. पुन्हा खास विलासरावांनी खास मुलाखतीत असे काय खास सांगितले हा "आजचा प्रश्‍न' होताच. बहुत सुकृत दूरध्वनीवर अजूनही बोलतच होते. शेळी शिकागोत नसल्याने ती शिंकल्याचे अद्याप त्यांना कळायचे होते.

लोकसत्तात मात्र वेगळी परिस्थिती होती. साथी समरसेन यांची कॉपी केव्हाच तयार होती. उपसंपादकांच्या टेबलावर ती आपटून ते आपल्या आताच झोपेतून उठल्यासारख्या आवाजात खडसावत होते, ""आता वृत्तांतमध्ये टाकून तिची वाट लावू नका. पहिल्या पानावर घ्या. संपादकांशी (पक्षी : कुमार केतकर, एनआरआय एडिटर, लोकसत्ता) बोललोय मी.''
उपसंपादकाने कॉपी पाहिली. हेडिंग होतं, ""शेळी जाते जिवानिशी आणि नेते म्हणतात शिंकली कशी?'' त्याने कॉपीवरून झरझर नजर फिरवली. दुष्काळ, गहू, चे गव्हेरा, साखर, शिंक, दूध, जयप्रकाश, लोहिया, शेळी, मायावती असे बरेच काही नेहमीचे त्यात असल्याचे पाहून "हॅ यात काय विशेष?' असे त्याला वाटले. मात्र या पोलिटिकल बातमीत चे गव्हेरा या गव्हावरच्या रोगाचा उल्लेख कशासाठी? हे काही केल्या त्याला समजेना. मग त्याने ती कॉपी तशीच कंपोझिंगला सोडली.

सकाळची सकाळ अजून उजाडायची होती. मुख्य वार्ताहर पद्मभूषण यांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम भुजबळसाहेबांना वेकअप कॉल लावला. मग संगमनेरला दूरध्वनी केला. राज्यात सर्वत्र आलबेल असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी बेलापूरला संपादकांच्या घरी दूरध्वनी केला व राजधानी मुंबईत आज काही विशेष नसल्याचे शुभवर्तमान दिले. तोवर मृणालिनी नानिवडेकरांचेही (प्रतिनिधी, सकाळ न्यूज नेटवर्क, सकाळचे सावत्र भावंड, केअर ऑफ उत्तम कांबळे, नाशिक) नागपूरशी बोलणे झाले होते. मग त्यांनी नेहमीप्रमाणे भ्रमणध्वनीवरून दूरध्वनीमागोमाग दूरध्वनी करण्यास सुरूवात केली. कुठून तरी त्यांना समजलेच की शेळी शिंकली. मग पुन्हा त्यांनी भ्रमणध्वनीवरून दूरध्वनीमागोमाग दूरध्वनी करण्यास सुरूवात केली. त्यावर त्यांना पुन्हा समजले की शेळी शिंकली. अखेर त्यांनी नासिक(!)च्याच आरोग्य विद्यापीठाला व राहुरीच्या कृषी महाविद्यालयाला दूरध्वनी लावला. पाणी घालून दोन कॉलम होईल एवढा मजकूर जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर त्या चार कॉलमी ललितवृत्त लिहिण्यास बसल्या.

त्यांची बातमी लिहिणे सुरूच असताना मधु कांबळे ठाणे श्रीस्थानकात पोचले होते. रात्री आठपर्यंत कोणता ना कोणता कक्ष अधिकारी आपणांस याविषयीची माहिती देईलच याची खात्री असल्याने ते तसे आरामात होते.
मंत्रालय, विधान भवन, आमदार निवास, वृत्तपत्रांची कार्यालये यांत शेळीच्या शिंकेची चर्चा सुरू असताना तिकडे धारावीतल्या झोपडपट्टीत, घाटकोपर-भांडुपच्या चाळींमध्ये, मलबार हिल-जुहूच्या बंगल्यांमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणेच चालले होते. लोकल खच्चून भरून धावत होत्या. रस्ते, दुकाने फुलून गेली होती. विमानांची उड्डाणे सुरळीत होती. बारामतीतील काटेवाडीमध्ये, लातूरच्या बाभूळगावात, सांगलीच्या भिलवडी-वांगीतही सगळे नेहमीप्रमाणेच चालले होते. पाऊस पडत होता, शेतकरी आत्महत्या करीत होते, दरोडे पडत होते आणि शेळी साधे पडसे झाल्याने शिंकत होती...

आजकाल शेळीची शिंकही केवढी मोठी बातमी होऊ शकते याचा तिला पत्ताही नव्हता.

Wednesday, March 12, 2008

मुद्दे आणि गुद्दे

सभ्य स्त्री-पुरूष हो,
पत्रकारांच्या या समंलेनासमोर भाषण देण्यासाठी आम्हांला बोलावले याबद्दल या संमेलनाच्या आयोजकांचे आणि प्रायोजकांचे (हंशा) आम्ही आभार मानतो. आम्ही या संमेलनास जाण्यासाठी घरून निघालो, तेव्हा एका सद्‌गृहस्थाने आम्हांस विचारले, की तुम्ही कोठे चाललात? त्यावर आम्ही उत्तरलो, की पत्रकारांच्या संमेलनास चाललो आहोत. तेव्हा तो चावट गृहस्थ म्हणाला, म्हणजे आता अखेरच्या लोकलनेच तुम्ही परतणार तर! वर पुन्हा हाताच्या अंगठ्याने द्रवपदार्थ पिल्याची खूण! (हंशा) हसू नका. बघा, बाह्यजगतात आपल्या पेशाबद्दल कोणत्या कल्पना आहेत! पण मी त्या गृहस्थास सांगू इच्छितो, की या संमेलनास उपस्थित असलेले काही पत्रकार तरी तसे नाहीत. (टाळ्या) बाकीचे जे आहेत ते शिवांबू घेतात असे समजून सोडून देऊ! (पुष्कळ वेळ हंशाच हंशा)

आमचे भाषण म्हटले, की लोक हसण्याची आणि टाळ्या वाजवण्याची तालिमच करून येतात, असे आधीच्या वक्‍त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की आजकाल विनोदाचा दर्जा घसरला आहे. तुम्हांस खात्रीने सांगतो, कालिदासाने "शाकुंतल'मध्ये माढव्य नावाचे विदुषकाचे पात्र योजले, त्या काळातही हे असे म्हणणारे लोक निश्‍चितच असणार. अहो, फार कशाला! आमच्या मास्तरांचे विनोद अश्‍लील आहेत असा शिमगा करायलाही काही अश्‍लीलमार्तंडांनी कमी केले नव्हते. मास्तरांचे म्हणजे गडकऱ्यांचे. या नव्या पिढीला गडकरी म्हटले की आमचे माधवरावच आठवणार.(हंशा) ते हे नव्हे! गडकरी एकच! राम गणेश! अहाहा! काय त्यांचे विनोद! काय त्याच्या कोट्या! आजकाल भरपूर कोटीबहाद्दर दिसतात. पण त्यांच्या कोट्या म्हणजे त्या ऐकून आपल्या कवट्या फुटायची वेळ येणार! (प्रचंड हंशा व टाळ्या) विनोदी वाङ्‌मयाची निर्मळ गंगा मराठी सारस्वताच्या प्रांगणातून वाहात आहे. पण गावातून गंगा जाते म्हणजे तेथे गटारे नसणार असा काही नेम नाही. त्याप्रमाणे विनोदाच्या नावाखाली काहीही भंकस प्रसवणारे अनेक कर्मदरिद्री आपल्या भोवती आहेत. कोण तो विसोबा खेचर पत्रकारांच्या टोप्या उडवतो आहे! खेचर कसला एक नंबरचा गाढव आहे तो! (प्रचंड हंशा) आमच्यासमोर आला तर त्या खेचराची आम्ही खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही! (कडकडून टाळ्या)

खरे सांगायचे तर आजच्या काळातही उत्तम विनोदी साहित्याची निर्मिती होत आहे आणि त्याचा दर्जा चांगला शाबूत आहे याची ग्वाही आम्ही देतो. हे आमचे आयएसओ प्रमाणपत्रच म्हणा ना! (हंशा) या साहित्याचा शोध घेण्यासाठी तुम्हांला कोणत्याही ग्रंथालयात किंवा पुस्तकांच्या दुकानांत जाण्याची गरज नाही. तसे तुम्ही चुकून गेलात तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असे होईल! कारण सर्वोत्तम विनोदी साहित्य कोठे प्रसविले जात असेल, तर ते वृत्तपत्रसृष्टीतच! (प्रचंड टाळ्या) सध्या आम्ही फारसे वाचित नाही. जे वाचायचे ते वाचून झालेले आहे. वाल्मिकी-व्यासांपासून ज्ञानोबा-तुकारामांपर्यंत, शेक्‍सपियर-भासापासून खाडिलकर-गडकऱ्यांपर्यंत आणि कालिदास-शेली-बायरनपासून केशवसुत-तांब्यांपर्यंत, जे जे उदात्त, सुंदर, महन्मंगल आहे ते ते आम्ही वाचलेले आहे आणि त्यातील अनेक नाटके, कविता आम्हांस मुखोद्‌गत आहेत. परंतु आता वयोपरत्वे दृष्टी क्षीण झाली आहे. विलायतेत राहूनही आम्हांला इंटरनॅशनल दृष्टी प्राप्त झाली नाही, हे आमचे दुर्भाग्य! दुसरे काय!! (हंशा) त्यामुळे आजकाल आम्ही दूरचित्रवाणी वाहिन्याही फारशा पाहात नाही. पाहिल्या की डोळ्यांसमोर 24 तास स्टार चमकतात!! (प्रचंड हंशा)

परंतु तरीही या संमेलनास येण्याच्या मिषाने आम्ही गेल्या काही दिवसांतली दैनिके आणि नियतकालिके चाळली. हल्ली वाचण्याच्या आधी आम्ही सर्व वृत्तपत्रे आमच्या मोलकरणीकडे देतो. चाळणीत घालून चाळण्यासाठी! (हंशा) ती मग जाहिरातींचा कोंडा बाजूला करते व वाचनिय मजकूर तेवढा आमच्या हाती ठेवते! (हंशा) किती हो त्या जाहिराती!! (हंशा) तर आम्ही परवा ती सर्व वृत्तपत्रे वाचली आणि आम्हांला विनोदाची गुहाच सापडली! त्यांतील काही अग्रलेख, लेख, स्फुटे आणि बातम्या वाचून आमची वृत्ती हे (येथे हाताच्या अंगठ्याने द्रवपदार्थ घेतल्याची खूण करतात) न घेताच उल्हासित झाली! (हंशा) लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सामना, लोकमत... अहाहा! गेल्या दहा हजार वर्षांत आम्ही असे विनोदी वाङ्‌मय वाचलेले नाही!! (येथे हंसावे की टाळ्या वाजवाव्यात याबाबत श्रोत्यांत संभ्रम.)

राजकारणी मंडळी ही तर विनोदाची खाण असतातच. पण आपल्या वार्ताहर आणि उपसंपादकांतही असे अनेक छुपे विनोदवीर आहेत याची जाणीव आम्हांला ही पत्रे चाळल्यानंतर झाली. त्यांच्या संपादकांना मात्र त्याची जाणीव नसावी हे त्यांचे दुर्भाग्य. अन्यथा स्वतःला लोकमान्य लोकशक्ती म्हणविणाऱ्या त्या लोकसत्तेला हास्यरंग काढण्याची पाळीच आली नसती. तेवढाच शेटजींचा पैसा वाचला असता! (हंशा) त्या वृत्तपत्राच्या परवाच्या अंकातील "रोलर कोस्टर' हे सदर घ्या. किती विनोदी! (हंशा) त्यात उंदरांच्या सुळसुळाटाची माहिती दिली आहे चीनमधल्या. अरे मुंबईत काय कमी उंदीर आहेत! निम्मे तर मंत्रालयात आणि मुन्सिपालिटीतच असतील! (प्रचंड हंशा) पण नाही, त्या आमच्या दत्ता पंचवाघांनी चिनी उंदरांबद्दल लिहिले. वाघ ना तुम्ही? मग उंदरांवर काय लिहिता? (हंशा) काय तर म्हणे दोन अब्ज उंदरांचा सुळसुळाट झालाय! अरे काय मोजायला गेला होता का तुम्ही! हे असे एकेक विनोद!! उपसंपादकांच्या डुलक्‍यांतून होणारे विनोद ही म्हणजे विनोदाची एक वेगळीच जातकुळी आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर मात्र तुम्हाला मुंबई सकाळ वाचण्यावाचून पर्याय नाही! तेथील संपादकांना आम्ही सुयश चिंतितो! (हंशा)

विनोदाची निर्मिती होते ती विसंगतीतून. जेथे विसंगती तेथे विनोद आहेच म्हणून समजा. फक्त तो पाहण्याची दृष्टी हवी. आजच्या सगळ्याच वृत्तपत्रात ही विसंगती ठासून भरलेली आहे. परवा कुणीतरी म्हणाले, की महाराष्ट्र टाइम्सने आषाढी विशेषांक काढला आहे. हे म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली! (बराच काळ हंशा) रोज आपले ते अर्धनग्न ललनांची चटोर छायाचित्रे छापायची आणि मग एक दिवस असे हे पापक्षालन करायचे! काल तर म्हणे त्या लोकसत्तेने वारांगनांच्या मोठमोठ्या तसबिरी छापल्या! आम्ही त्या पाहिल्या नाहीत! (हंशा) महाराष्ट्र टाइम्समधील एका वार्ताहराने आम्हांला त्याबद्दल सांगितले! (प्रचंड हंशा) बहुधा त्याला म्हणायचे असेल, असे त्यांनी त्या कशा काय छापल्या? जणू अशा छायाचित्रांवर महाराष्ट्र टाइम्सचाच कॉपीराईट आहे! (बराच काळ हंशा) आजकाल सर्व वृत्तपत्रे रंगीत झाली असल्याने विनोदही कसे रंगीत झाले आहेत! त्यामुळे आम्हाला विनोदाच्या दर्जाबद्दल मुळीच चिंता राहिलेली नाही. मराठी वृत्तपत्रांच्या हाती हा विनोदाचा ताजमहाल शाबूत आहे! (प्रचंड टाळ्या) त्यासाठी एसेमेस मतचाचण्या घेण्याची आवश्‍यकता नाही!

बराच वेळ झालेला आहे. पत्रकारांना दुसऱ्यांचे एवढे ऐकून घेण्याची सवय नसते! तुमचीही घेण्याची वेळ झाली असेल...(हंशाच हंशा) निरोप! (प्रचंड हंशा) आम्हांला येथे बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानून आम्हीही घेतो... निरोप! (प्रचंड हंशा आणि टाळ्या)