Sunday, March 23, 2008

पत्रसृष्टीतील वर्णव्यवस्था

गणपतीची (आजचा गणपती : वरची आळी, कातकरवाडी बु।।) शप्पथ, मटा जेवढा पुरोगामी आहे, यज्ञयाग करून सकाळ जेवढा पुरोगामी आहे आणि वास्तुशास्त्र छापून लोकसत्ता जेवढा पुरोगामी आहे तेवढेच आम्हीही पुरोगामी आहोत. तरीही आम्हाला असे नेहमी वाटते की आपल्या मराठी पत्रसृष्टीत एक वर्णव्यवस्था आहे. छुपी. लोकसत्तातल्या गटबाजीसारखी. ती असते, पण बाहेरून पाहणाऱ्याला दिसत मात्र नाही.
एका समाजशास्त्रज्ञाने त्यांचे वर्गिकरण केले आहे. ते येणेप्रमाणे :

मटावर्ण‌ : हा उच्चवर्ण. गणपती हे त्यांचे आराध्यदैवत. आपली पत्रकारिता ही अत्यंत देदिप्यमान असून, समाजपुरूषावर उपकार करण्याच्या हेतूनेच आपण सांप्रती अवतार घेतलेला आहे, अशी या वर्णाची समजूत असते. पार्ले, गिरगाव यानंतर डोंबिवली-बदलापूर ते थेट अमेरिकाच असा यांचा परिघ. त्याबाहेर धावते जग आहे हे त्यांना ऐकून माहित असते. मराठीत अन्य वृत्तपत्रेही निघतात हेही त्यांना ऐकूनच माहित असते. या वर्णाचा हल्ली "टैम्साफ इंडिया'पासून "मुंबई संध्या'पर्यंतच्या विविध जातींशी संकर झालेला असल्याने त्यातून काही वेगळेच धारावाही रसायन जन्माला आलेले दिसते. अर्थात नावापासूनच आंग्ल-मराठी सरमिसळ झालेली असल्याने या संकराचे यांना काही वाटत नसते, असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे.

लोकसत्तावर्ण : काहीही असो, कुणीही असो, एखादा डोक्‍यात गेला की तुटून पडणे असा क्षत्रियी बाणा (हा लालबागच्या पाण्याचा दोष नव्हे!) हे या वर्णाचे लक्षण. झाडीमंडळापासून अपरान्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र खंडातील भ्रष्टांचा निर्वंश करण्याची प्रतिज्ञा यांच्या पूर्वजांनी केली असावी. आता मात्र कापे गेली भोके उरली अशी अवस्था आहे. या वर्णात सुवर्णास अत्यंत पूजनीय मानले जाते. त्यामुळे ते सोनियाची नाणी पूजतात. चिमटे, टोले अशी अस्त्रे ते नित्य वापरतात. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे जशी स्त्री असते, तशीच या वर्णाच्या यशस्वी वाटचालीमागेही महिला आहेत, असे म्हणतात. त्याचा पुरावा म्हणून समाजशास्त्रज्ञ त्यांच्या पुरवण्यांकडे बोट दाखवतात. नावातच सत्ता असल्याने या वर्णीयांना त्याची बाधा झाली असल्याचे दिसून येते व ते अन्य वर्णीयांकडे त्याच दृष्टीने पाहतात.

सकाळवर्ण : शुभ्र पोचट रंग हे या वर्णाचे व्यवच्छेदक लक्षण. सर्वच ग्राहकांना खुश ठेवण्याच्या वैश्‍यवृत्तीने व्यवसाय करण्याचे संस्कार असल्याने हे वर्णीय कोणाच्याही अध्यात वा मध्यात नसतात. यांची एक पवित्र पोथी असून, त्यात या वृत्तीला निःपक्षपातीपणा असे म्हटल्याचे दिसते. या वर्णात कुलाचार, परंपरा यांस अतिशय महत्त्वाचे स्थान असून, कोणताही निर्णय ते जातपंचायतीच्या माध्यमातूनच घेतात. या जातपंचायतीची बैठक नेहमीच सुरू असते. तेथे निर्णय घेतले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी होण्याच्या आतच नवीन निर्णय घेतले जातात. हे चक्र ऋग्वेदकालापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. यामुळेच या वर्णात "निर्णय प्रलंबन स्तोत्र' आवडीने म्हटले जाते असे काही धर्मशास्त्रज्ञांचे मत आहे. या वर्णीयांनी शिक्षण व्यवस्थेत चांगलीच भर घातली असल्याचा इतिहास आहे. शिक्षणानंतर येथील अनेक जण वर्णांतर करतानाही दिसतात.

लोकमतवर्ण : हल्ली ज्याला बहुजनसमाज म्हटले जाते तो हा वर्ण. यास उच्चवर्णीय शूद्र म्हणतात, तसेच काही जण क्षुद्र असेही म्हणतात. मात्र या वर्णाचे अनुयायी सर्वत्र पसरले आहेत. या वर्णीयांना अन्य वर्णात सहसा सामावून घेतले जात नाही. मात्र अलीकडे वैश्‍यवर्णाशी यांचे रोटीसंबंध जडल्याचे दिसून येते. हा वर्ण अन्य वर्णांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत असला, तरी त्याची काही बलस्थानेही आहेत.

पत्रसृष्टीतील वर्णव्यवस्थेचा विचार करताना भटके-विमुक्त आणि आदिवासींचाही विचार टाळता येणार नाही, असे हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो. त्याच्या मते "तारा' व "प्रभात' ही दोन नक्षत्रे मावळल्यानंतर झालेल्या उलथापालथीमध्ये हे भटके-विमुक्त काहीसे अदृश्‍य झाले होते. मात्र अलीकडेच काही मानववंशशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत यांची संख्या आता चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. या भटक्‍या आणि विमुक्त जाती-जनजातींचे वैशिष्ट्य म्हणजे हे सतत अस्थिर असतात. ते कपाळावर स्टारच्या आकाराचे चिन्ह लावतात. त्यांच्यात काही "झी'लकरी असल्याचे आढळून आले आहे. त्यांतील अनेकांच्या कुळात डंबेल्ससदृश वस्तूला अत्यंत महत्त्व असते. त्या वस्तुच्या साह्याने ते भूल टाकतात अशी बोलवा आहे. या भटक्‍या आणि विमुक्तांच्या मेंदूच्या आकाराबद्दल सध्या "24 तास' संशोधन सुरू असून, सर्वज्ञानी असल्याचा गंड त्यांना कोणत्या कारणाने व केव्हा झाला हेही अद्याप एक गूढच आहे. याच वर्णातील काही लोक प्रगतीचे वारे न शिवल्याने आदिवासीच राहिले असून, त्यांचा सपट महाशोध घेण्याचा समाजशास्त्रज्ञांचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र हे लोक खूपच बुजरे, दबलेले, पिचलेले असे असल्याने ते दूरदर्शनातच धन्यता मानतात, असे सांगण्यात येते.

No comments: