Wednesday, June 11, 2008

शीएमचा आल्बम

परधानजी, राज्याची काय हलवाहलव हाये?
म्हाराज, सम्दं ठिक हाय. चोर तेवढं चोऱ्या करत्यात. दरोडेखोर तेवढं दरोडं घालत्यात. पेपरवाले कायबाय लिव्हत्यात, लोकं वाचून इसरून जात्यात. बाकी सम्दं आलबेल हाये....

अशा आलबेल वातावरणात आबा पाटील मात्र खिन्नपणे आपल्या केबिनमध्ये बसलेले होते. त्यांच्या (देशी) डोळ्यांत विषण्णता दाटलेली होती. वेलदोडे खाऊनही तोंडाला चव नव्हती. समोर मटापासून संध्यानंदपर्यंत विविध पत्रांचे चघाळ पडलेले होते. पण आबांचे लक्ष त्यात नव्हते. राज्याच्या इतिहासाची पराणी आबांच्या मनाला टोचत होती. डीसीएम सीएम बनत नाही, हा इतिहास आपण सांगितला खरा. पण आता तोच बैलाच्या कानाला गोमाशी चावावी तसा काळजाला डाचत होता.
तेवढ्यात केबिनचं दार ढकलून चित्कलाबाई आत आल्या.
टेबलावरची वृत्तपत्रं पाहून त्या म्हणाल्या, "आबा, वाचली ना ती बातमी?''
"कोणती? दरोड्याची?''
"तुमचं बाई काईतरीच! अवो, ती नै का ती अल्बमची...''
"कोणत्या अल्बमची? आता लग्नाच्या आल्बमच्या बातम्यासुद्धा पेपरात यायला लागल्या काय? बघू बघू.,'' असं म्हणत आबांनी मटाला हात घातला. अशा बातम्या दुसरं कोण छापणार, असं म्हणत मटाकडे पाहता पाहता त्यांना तिथल्या तिथे एक कवन सुचले (ही त्यांची महाविद्यालयातली फुटाणी सवय. तंबाखूबरोबरच जडलेली.) : "किती छान हा कागद । किती देखणी छपाई ।। आत मांडलेत बाबा । वर टांगलीय बाई ।।' हे गुणगुणत ते नेहमीप्रमाणे स्वतःवरच खुश होत होते, तेवढ्यात बाई कृतक्‌कोपाने म्हणाल्या, "छे बाई, तुमाला काईच माईत नसतं... अहो, सीएमसाहेबांचा अल्बम येतोय. गाण्यांचा!''
"आं'', आबा अवाक्‌.
"हो. ही बघा ना बातमी. आणि हा आमचा इंटेलिजन्स रिपोर्ट. त्या बातमीवरूनच बनवलाय,'' बाई म्हणाल्या, "तुमच्यावर एक सिनेमा येतोय ना, म्हणून सीएमसाहेबांवर एक आल्बम काढणार आहेत.''
"अहो पण काढणार कोण तो आल्बम? रितेश?''
त्या अभिषेकच्या नादानं रितेशनं नसतं खूळ भरवलेलं दिसतंय सायबांच्या मनात. मावळात शेती करायची सोडून ते बापलेक नाचत्यात पिक्‍चरमध्ये. त्यांचं बघून रितेशनीबी डॅडींना नाचवलं असनार आल्बममध्ये.
"नै बाई. तो नाही. आम्ही सगळा पंचनामा केलाय.'' गृहखात्यात आल्यापासून बाईंची राजभाषा भल्तीच बदललीय. "आमच्या रिपोर्टनुसार काल व्हाईट हाऊसमध्ये सीएमसाहेब, काकाजी उल्हास पवार आणि लोकमुद्राकार कपिलजींची एक बैठक झाली. त्यात हे ठरलं.''
"व्हाईट हाऊसमध्ये? कुठं पुण्यात, रोहिणीच्या हापिसात? पोराचं लग्न काढलंय की काय त्यांनी?''
""छे बाई, तुमाला काईच माईत नसतं. साहेबांना दृष्टी आलीय ना, तेव्हा त्यांनी सामान्य प्रशासनातून नामांतराचा जीआर काढलाय. "वर्षा'ला आता "व्हाईट हाऊस' म्हणायचं.'' बाई पदरात तोंड लपवत खुखु हासत म्हणाल्या.
""असाहे का ते? बरं मग काय झालं त्या बैठकीत?'' आबांनी डोळे नेहमीप्रमाणे लहान-मोठे करीत विचारले.
""तिथं किनई असं ठरलं म्हणे... म्हंजे आमचा अहवाल अजून किनई पूर्ण व्हायचाय, पण त्याचे सॅलिएंट फीचर्स सांगते... की कोणी गाणी लिहायची, कोणी गायची असं सगळं ठरवलं बाई त्यांनी तिथं.''
""कोण लिहिणारे गाणं?''
""कोण काय? कपिलजी!''
आबांना कोणीतरी सांगितलेलं आठवलं, छात्रभारतीत तो काय गाणी म्हणायचा... युग की जडता के खिलाफ एक इन्किलाब है वगैरे. त्यातली निम्मी सरफरोशी की तमन्ना महानगरात गेली, निम्मी दिनांकात. बाकी मग सगळ्या साथींचं होतं तेच झालं. साथी "हात' बढाना...
बाई सांगतच होत्या, ""लोकगीत लिहिलंय म्हणे त्यांनी सीएमसायबांवर...
इंटरनॅशनल डोले तुजे कोल्याचे जाले
जाल्यात मी कुनाच्या गावायचा नाय...
आणिक त्याला संगीतबद्ध कुणी केलेय ठाऊकै का?''
""नाही.''
""मलाही माहित नाही,'' बाईंनी गृहखात्याला न शोभणारी प्रांजळ कबुली दिली, ""पण कोणीतरी पत्रकारच असेल बघा.''
""सगळेच पत्रकार काही तसे नाहीत. परवा लोकसत्ताने कसं ठोकलं त्यांना पाहिलं ना?'' आबा म्हणाले.
""ते त्या प्रधानजींचं काम. वुमन हेटर कुठले!'' बाईंना प्रधानांची ही बाजू कुठून कळली कोण जाणे?
""अहो पण मटानेसुद्धा सगळं बैजवार दिलं होतंच की!''
""बाई बाई किती हो भोळे तुम्ही! ती साप भी मरे आणि लाठी भी ना टुटे अशी पत्रकारिता होती. सीएमची सगळी प्रश्‍नोत्तरं छापून त्यांनी जो मेसेज जायला हवा तो दिलाच की!''
""मग नक्की तो प्रताप त्यांचाच.'' आबांना का कोण जाणे पण आनंद झाला!
""पण हे पत्रकार मुळात वाईट्टचं असतात बाई. आपल्या खात्यात थोड्या बदल्या केल्या तरी लगेच काहीच्या काही छापतात म्हणे,'' बाईंना अजून खातं नवं असल्याने बऱ्याच गोष्टींचा अंदाज यायचा आहे.
""हो ना,'' आबा पुन्हा खिन्न झाले. मग उसळले, ""आमच्या बदल्यांच्या बातम्या छापता. आणि त्यांचं कोण छापणार? परवा त्या लोकमतमध्ये एवढ्या बदल्या झाल्या. गुन्हेवार्ताहर चक्क मंत्रालयात पाठवला त्यांनी. कोण काय बोललं त्यांना?''
""ही गंभीर बाब आहे,'' बाई एकदम सिरियस झाल्या, ""यात काही तरी गडबड असणार बघा. क्राईम रिपोर्टरला मंत्रालयात पाठवतात म्हणजे याचा अर्थ काय? मी बरोबर छडा लावते याचा.''
आबांना मोठीच गंमत वाटली. ते म्हणाले, ""कसा काय लावणार पण तुम्ही छडा?''
त्यावर बाईंनी समोरची कागदपत्रं उचलली. त्यांची लाटण्यासारखी सुरनळी केली. आणि जाता जाता त्या म्हणाल्या, ""साहेब, तुम्ही वेलदोडे खातो असं सांगता. पण कोणी नसताना गुपचूप तंबाखूचा बार भरता हे सिक्रेट जसं आम्हाला कळलं ना अगदी तसाच याचाही छडा लावू! अखेर पत्रकारांची बिंगं काय! कधी ना कधी फुटतातच!!''

Wednesday, June 4, 2008

सुसंगती सदा घडो, सुजनवृत्त कानी पडो...

हाथरूणात उन्हे शिरली अन्‌ आम्ही उठलो. हाती मशेरी घेतली. दूरचित्रवाणीसंच लाविला. आमची आवडती वाहिनी म्हणजे इंड्या टीव्ही! रामसे बंधु पिक्‍चरवाले, "नगिना'कार हरमेश मल्होत्रा, डेव्हिड धवन प्रभृतींना एकसमयावच्छेदेकरून पाहण्याचे भाग्य आम्हांस तेथे लाभते! आताही प्रातःसमयी तेथे ब्रेकिंग न्यूज सुरूच होती. - "नागिन से शादी!'
ते पाहताच आम्ही चमकलोच! मुदपाकखान्यात नजर टाकिली. मनीं म्हटले, असे कार्येक्रम आपण पाहतो हे आत समजले तर गहजब व्हायचा! ही वृत्तवाहिनी खरे तर लेट नाईटच पाहावी!
त्या सरीसृपवंशीय प्राण्यांच्या वैवाहिक आयुष्याचा राष्ट्रभाषिक हैदोसदुल्ला जोरात सुरू होता. मनीं म्हटले, एखाद्याला नागिण हीच जर त्याची राखी सावंत वाटत असेल, तर आपण बातमी देण्यापलीकडे काय करणार?
ते भूतां परस्परे जडलेले मैत्र जीवांचे एका डोळ्याने अवलोकितानाच दुसऱ्या डोळ्याने आमचे वृत्तपत्रवाचनही सुरू होते. हे आम्ही खास कमावलेले योगसामर्थ्य! कचेऱ्यांतील राजकारणात बहुउपयोगी! एक डोळा संगणकाच्या पडद्यावर, दुसरा संपादकांच्या केबिनमध्ये कोण जाते-येते यावर, या सवयीच्या योगे हे सामर्थ्य प्राप्त होते!
असो. मशेरी लावताना आम्ही नेहमीच असे भरकटतो!

तर मुद्दा असा, की येणेप्रकारे आमचे पाहणे व वाचणे व लावणे सुरू असताना अचानक आमच्यासमोर कुंद काही धुरकटले! दृष्टी उर्ध्वात गेली! मेंदूला पहिल्याच पेगात येतात तशा मुंग्या आल्या! आणि...
... आणि समोर शनिवारवाड्याची मागची बाजू अवतरली. सकाळवाड्याच्या भव्य नेपथ्यावरील नाट्य आमच्या चर्मचक्षुंसमोर उलगडू लागले. पाहतो तो समोर साक्षात्‌ संभाजी महाराजांचा पार्टी!
तोच गोरापान चेहरा. तोच कपाळावरून मागे सरकलेला कुरळा कोंबडा. तीच सरळ नासिका. तेच लालचुटूक ओठ. त्यावर तेच खिरे-खुरे उद्वेगी हास्य! डिट्टो कॉन्वहर्जन्सकेसरी!!
पाहता पाहता त्यांनी कंसात लेखणी उपसून स्वगत सुरू केले. -
""मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना? वडवानलाने समुद्र तर प्राशन केला नाही ना? लोकमतचा सेल तर वाढला नाही ना? मग आम्हीच का बरे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मागे लागून अनावश्‍यक आणि अतिरंजित वृत्तांकन करावे? निघेल तेव्हा निघेल. पण आम्ही आमची वाहिनी काढू आणि तिच्या मागे लागू!... नाही आबासाहेब, नाही. यापुढे पहिल्या पानी आम्ही अनावश्‍यक आणि अतिरंजित बातम्या कदापि छापणार नाही...''

अचानक नभोवाणी व्हावी तसा आवाज आला - "अहो दात घासताय की मोरी? किती वेळ लावताय?' ही आमची औरंगजेब. तिच्या त्या नर्मकर्कश प्रेमकुजनाने आमच्या नजरेसमोरील धुंद एकदम दूर झाले.
चूळ भरता भरता आमच्या लघुगुरू अशा दोन्ही मेंदूंनी आम्ही विचार करू लागलो.
आपण भल्यासकाळी असे कोंडुऱ्यात कसे सापडलो? मशेरी जास्तच कडक होती की पेपरातच काही गारूड होते?
म्हणून पुन्हा ते पत्र हाती घेतले. तर त्याच्या पहिल्याच पानी एक चौकट. - "... या प्रकारच्या (पक्षी ः अनावश्‍यक आणि अतिरंजित) वार्तांकनापासून दूर राहण्याचा निर्णय "सकाळ'ने घेतला आहे; त्यामुळे गुन्हेगार ठरविलेल्या संजय दत्तबाबतच्या बातम्या आतील पानात प्रसिद्ध करण्याचा निर्णय "सकाळ वृत्तपत्र समुहा'ने घेतला आहे. - कार्यकारी संपादक.'

मुंबै सकाळमधील ही चौकट वाचून आम्हांस अगदी गदगदून आले!
श्‍वासनलिकेत हुंदका दाटला! पापण्यांचे केस ओलावले!
केवढी ही विधायकता!
केवढी ही वाचकाभिमुखता!
केवढी ही निरागसता!!

योग्य आणि बरोबरच आहे त्यांचे!
काय म्हणून सभ्य-सुसंस्कृत विधायक वाचकांनी वाचायच्या त्या तुमच्या गुंडा-पुंडांच्या बातम्या, पुढाऱ्यांचे कलगीतुरे, नट्यांचे नखरे, भामट्यांच्या भानगडी अन्‌ कुलंग्यांची कुलंगडी?
हाच कित्ता सर्व वृत्तपत्रांनी गिरविला तर...?

आणि आम्हांस विविध वृत्तपत्रांची निरागस गोंडस स्वच्छ सुंदर आवश्‍यक व नरंजित बातम्यांनी विनटलेली पहिली पाने दिसू लागली.
अहाहा! ओहोहो!!
काय ते पेपर, काय ती पाने...
कोरी करकरीत!!!
फक्त जाहिराती.
त्याही केवळ वुडवर्डस्‌ ग्राईपवॉटरच्या!
""काय झाले? बाळ रडत होते...
अगं मग त्याला दोन थेंब पगारवाढ का देत नाहीस?
तू उपसंपादक असताना तुलाही मी हेच दिले होते...'' अशा.

पण स्वप्ने कशास पाहावयाची?
आजचेच वास्तव पाहा ना!
मुंबै सकाळच्या पहिल्या पानावर आहेत फक्त आवश्‍यक व नरंजित बातम्या.
नक्षलवादी जेरबंद, मित्राकडून हत्या, संप अटळ....
अहाहा! ओहोहो!
किती धोरण-सुसंगत! किती विधायक!

आमच्या (व सर्क्‍युलेशन मॅनिजरांच्या) मनीं आले, ही अशीच सुसंगती सदा घडो, सुजनवृत्त कानी पडो!
तथास्तु!!

Sunday, June 1, 2008

कविता : एक विणे!

हम आह भी भरते हैं
तो हो जाते है बदनाम
वो कविताभी करते हैं
तो चर्चा नही होता...

आम्हांस एक कविता काय झाली अन्‌ जणू काही सकाळमध्ये एक्‍स्‌क्‍स्युजिव्ह बातमी प्रसिद्ध झाली असा गदारोळ झाला! (आता कविता म्हणजे काय व झाली म्हणजे काय असे तुम्ही विचाराल. तर कविता म्हणजे एरवी सरळ लिहावयाच्या ओळी मध्येच कुठेही तोडून एका खाली एक लिहिल्या की जे होते त्यास कविता म्हणतात! आय ऍम राईट ना, संजीवजी खांडेकर?) पण यात आमची काडीमात्र चूक नाही! पत्रकार म्हटला की त्याला काही दोष-दुर्गुण आपोआपच चिकटतात. एक म्हणजे तो स्वतःला विकिपेडिया समजू लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाने भरण्यासाठी "लळीत' वगैरे लिहिता लिहिता कविता पाडू लागतो. (आता कविता पाडणे म्हणजे काय असे तुम्ही विचाराल, तर काही काहींना म्हणे असे असते, की आधी पाऊस पडतो आणि मग जंत पडावा तशा कविता पडतात! त्याला 'पाऊसवेणा' म्हणतात!)

पत्रसृष्टीला ही कविताकारांची लागण फार पूर्वीपासूनची आहे. पण पूर्वी एक बरे असायचे, की तेव्हाचे कविताकार थोर थोर तरी असायचे. उदाहरणार्थ एकेकाळी सकाळमध्ये कुसुमाग्रज (पक्षी : वि. वा. शिरवाडकर) होते. (पण तेही नाही टिकले! आता ते टिकले नाही, म्हणजे काय असे तुम्ही विचाराल, तर त्याचाही एक थोर किस्सा आहे. थोर संपादक नानासाहेब परूळेकर यांनी शिरवाडकरांना सांगितले होते, की "तुम्हाला सरळ लिहिता येते हे एकच तुमचे क्वालिफिकेशन मानतो!' तर बहुधा शिरवाडकरांना सरळ लिहिता न आल्याने त्यांनी सकाळ सोडला असावा! असो.)

तर बहुधा या प्रसंगाचा धडा घेऊन तमाम कविताकार जे भूमिगत झाले ते झालेच! (आता भूमिगत झाले म्हणजे काय, असे तुम्ही विचाराल तर हे कविताकार हल्ली फक्त छायाचित्र ओळी यांसारख्या माध्यमातूनच प्रकट होतात व एरवी एखाद्या पानगृहात बसून बेसावध सहकाऱ्यांना पीळ मारतात!) तर अशा या भूमिगत कविताकारांचा शोध घेण्याची एक दंशमोहिम (पक्षी ः स्टिंग ऑपरेशन) आम्ही आमच्या बहिर्जी नाईक्‍सच्या साह्याने नुकतीच पार पाडली. आणि अहो आश्‍चर्यम्‌! ज्यांचा कुणाला संशयही येणार नाही, असे बोरूबहाद्दरही कविता रचत असल्याचे आम्हांस आढळून की हो आले!!
पेश करीत आहोत त्यातील काही निवडक कविता -

तर आमच्या पहिल्या कविताकाराचे नाव आहे चंदुअंकल कुलकर्णी! ठाण्यातील लोकसत्ताच्या कार्यालयात ते एकदा गेले असता त्यांना सदरहू कविता स्फुरली असा प्रवाद आहे. ते लिहितात :
""मी येतोऽऽऽ आणिक जातोऽऽऽ
येताना कधी चॉकलेट आणितो...
आणि जाताना टिफिन मोकळा नेतोऽऽऽ...
येतोऽऽऽ आणिक जातोऽऽऽ''


"जय महाराष्ट्र'कार साथी प्रकाश अकोलकरांचे काव्य त्यांच्या प्रकृतीला साजेल असेच शायरीबाजाचे असते. त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये अनेक कविता असल्याची चर्चा प्रेस क्‍लबमध्ये आहे. परवा म्हणे त्यांनी प्रेस क्‍लबमध्ये ही कविता सादर केल. सुदैवाने तेव्हा त्यांच्याकडे अन्य कोणाचे नसले, तरी आमच्या बहिर्जी नाईक्‍सचे लक्ष होते. ते गात होते. -
"जै जै महाराष्ट्र घ्या ना, जै जै महाराष्ट्र घ्या ना...
पुस्तक आमुचे किती मोलाचे, शिवसेनेच्या इतिहासाचे
कन्सेशन त्यां कसले मागता विकत घेऊनी वाचा ना...''
(वास्तविक साथी प्रकाशभाईंनी आपले हे पुस्तक अनेकांना तसेच दिले असल्याचीही आमची माहिती आहे. पण लोकांना कदर आहे का कशाची?)

आमचे पुढचे कविताकार आहेत समस्त कास्तकारांचे तारणहार क्रांतिवीर निशिकांतजी भालेराव! कवितेचे नाव आहे ः "जट्रोफाचा मळा'
"जट्रोफाच्या मळ्यात कोण गं उभी
ऍग्रोवन वाचिते मी रावजी
रावजी, पेपर काढण्यापरी वो आमची शेती बरी...
द्राक्षाची गं तु चांदणी
भरला बांधा केळीवाणी
मंजुळा, इव्हेंट करू एखांदा गं तुझ्या बांधावरी!''
(सकाळने भरविलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये त्यांना हे काव्य सुचले असे सांगणारे सांगतात! त्यांच्या "ग्रीनहौस पुरवा महाराज, मला आणा इस्त्रायली साज...' या कवितेला यंदाचा जैन ठिबक सिंचन पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आमचे बहिर्जी नाईक्‍स कळवितात.)

कविता आणि प्रेमभावना यांचा अन्योन्य (जैसा पत्रकार आणि पाकिट!) संबंध आहे. पण बोरूबहाद्दरांचा मात्र या भावनेवर फारसा विश्‍वास दिसत नाही. (त्यांचे लफड्यावर अधिक प्रेम!) परवा तर सकाळच्या एका लहानखुऱ्या महिला पत्रकाराने मुंबईतल्या कुठल्याशा किल्ल्यावर प्रेमकूजन करीत बसलेल्या जोडप्यांना चांगलेच घाबरवून सोडले! (म्हणून आम्ही मुलींना सांगतो, की मुंबई सकाळमध्ये जाऊ नका. अकाली म्हाताऱ्या व्हाल!!) असो. तर असे असले, तरी आमच्या बहिर्जी नाईक्‍सच्या म्हणण्यानुसार अनेक पत्रकार लपूनछपून प्रीतीकाव्यही लिहित आहेत. त्यातलीच ही एक विदग्ध कविता. शीर्षक आहे - "क्राईम रिपोर्टरची कविता'
तुझं खळबळजनक चालणं
तुझं सनसनाटी पाहणं
तुझ्या सुसाट स्मितानं
धाडकन्‌ कोसळतं चांदणं
ही चकमक चकमक नजर
हे एन्काऊंटरी कटाक्ष
किती हृदयांचं हत्यकां
तू केलं सर्वांसमक्ष
इश्‍काच्या टोळीयुद्धात
तू असशील महामाहीर
नाही ऐरागैरा
प्रणयाचा खंडणीखोर!

नक्कीच भारतीय दंडविधानाच्या कुठल्याशा कलमाखाली ही कविता लिहिण्यात आली असणार. तिचे कवी आहेत लोकमतचे श्‍यामसुंदर सोन्नार. किती पोएटिक नाव! जणू फडक्‍यांच्या कादंबरीचा नायक. पण हा माणूस क्राईम करतो! नावात काय आहे म्हणतात तेच खरे! काही काही नावं अशीच फसवी असतात.

आमच्या प्रशांत दीक्षितांचे मात्र तसे नाही. नावाप्रमाणेच ते हल्ली अगदी प्र-शांत असतात. सध्या ते कोटातल्या कचेरीत एकांतवास अनुभवत आहेत. मात्र त्यामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला कसा सर्वोदयी बहर आला आहे. अलीकडेच "टेलिग्राफ' वाचता वाचता ते विनोबांच्या साहित्याचेही परिशिलन करीत असतात. त्यांची ही कविता काहीशी "संथ वाहते कृष्णामाई'च्या चालीवर जाते. -
""संथ वाचतो मी गीताई
अंकामधल्या कशाकशाशी मजला घेणे नाही...''

अशा उदंड कविता आहेत. पण यातील आम्हांस भावली ती कविता काही वेगळीच आहे. दुर्दैवाने तिचे कविताकार कोण आहेत व ती कोणत्या संदर्भात लिहिली याचा पत्ता आमच्या बहिर्जी नाईक्‍सनाही लागू शकलेला नाही.
या अत्यंत चिंतनगर्भ कवितेचे नाव आहे "अभिनंदनाचे अभंग.' (तुकोबांच्या गाथेत जसे सालोमालोचे अभंग तसेच हे अभिनंदनाचे अभंग दिसतात. संशोधन व्हायला हवे!) तर ती कविता अशी आहे. -
घालीन लोटांगण वंदिन चरणम्‌
डोळ्याने पाहिन रुप तुझे
प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन
भावे ओवाळीन म्हणे थोरा!

तथास्तु!!