Saturday, March 22, 2008

शेळी शिंकली...

होय, शेळीला शिंक आली.
चांगली सटकून शिंक आली.

पाहता पाहता बातमी कानोकानी झाली. मंत्रालयात, विधान भवनात, आमदार निवासात कुजबुज सुरू झाली. अधिवेशन नसल्याने सध्या मुंबईत फारसे आमदार नव्हतेच. होते त्यांनी पटापट मतदारसंघात मोबाईल लावले. पीएंना रेल्वेचे आरक्षण करायला धाडले.
शेअरबाजारचा कारभार नुकताच कुठे सुरू झाला होता. निर्देशांक "कालच्या बंद'हून थोडासा वर गेला होता. पण दलालांच्या मुखावर आनंद नव्हता. बेपारी मंडळींचे एक वेगळेच माहितीचे महाजाल असते. त्यातून ही बातमी आणखी काही काळातच अहमदाबाद, सूरत, वडोदरा अशी होत होत सिंगापूर, दुबई, मलेशिया, अमेरिका, ब्रिटन अशी पसरणार होती. त्यानंतर काय होणार हे दलालांच्या चेहऱ्यावर आताच वाचता येत होते.

इकडे वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर अद्याप आपल्या नेहमीच्या गतीने विविध वृत्तपत्र कार्यालयांतल्या संगणकांवर बातम्यांचा रतीब घालत होते. पण हे आणखी काही काळच. यानंतर ज्या वेगाने फ्लॅश आणि अपडेट्‌स येणार होते त्यांपुढे संगणकांच्या सीपीयूचा वेगही कमी पडणार होता.
मंत्रालयातल्या पत्रकारकक्षाला मात्र नेहमीप्रमाणेच अद्याप जाग आलेली नव्हती. एका उर्दू पेपरचा लांब दाढीवाला वार्ताहर तोंडावर वृत्तपत्र ठेऊन कोचावर पेंगत पडला होता. नव्यानेच या बिटला आलेला एका दैनिकाचा पत्रकार उगाच आपल्या हातात मोठे स्कूप असल्याचा आव आणत खिडकीशी उभा राहून मोबाईलवरून बहुतेक त्याच्या चॅनेलमधील मैत्रिणीशी मोठ्याने बोलत होता. काही फुटकळ पत्रकार आज कुठे जावे याचा विचार करीत वृत्तपत्रांची चाळवाचाळव करीत खुर्च्यांवर बसले होते. बाकी सर्व शांत होते.

आणि जणू काही कोणी आधीच ठरविल्यानुसार एका विशिष्ट क्षणी तमाम वृत्तपत्रांच्या कार्यालयातले दूरध्वनी, संपादकांचे, वृत्तसंपादकांचे, मुख्य वार्ताहरांचे मोबाईल किणकिणू लागले. पण अजूनही सगळाच गोंधळ होता.

मध्ये मुंटावाल्यांची सकाळची बैठक सुरू होती. तेवढ्यात मुकेशकुमारांना मोबाईल आला. - शेळी शिंकली. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर "रोजा'तली शेळ्यांमधून फिरणारी अल्लड, नटखट, मोहक मधु तरळून गेली. पण गेले ते (पानभर चित्रपट परिक्षणाचे) दिन गेले! मॅनेजमेन्टच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे एक सुस्कारा सोडत ते कामाकडे वळले आणि प्रवीणला म्हणाले, चांगली बातमी आहे. शेळी शिंकली. पण आपल्याला काय त्याचं? ते (पक्षी ः संजीवकुमार!) मुख्य अंकात बघतील. आपण परवा ठरल्याप्रमाणे आज कुत्र्यांचीच बातमी चालवू.

साबडे अद्याप घरीच होते. सोमवारच्या अंकात आलेला "म्हाताऱ्यांनी काय घोडं मारलंय...?' हा आपलाच लेख ते चौदाव्यांदा वाचत होते. "अमिताभने तरूण मुलीच्या प्रेमात पडायचं नाही हा अट्टहास का?' हा आपलाच सवाल वाचताना त्यांना जाम गुदगुल्या होत होत्या. अखेर (एकदाचा) त्यांनी तो जिया खानचे छायाचित्र असलेला लेख बाजूला ठेवला. शेळी कशामुळे शिंकली हे नक्की समजलेले नव्हते. पण आपला त्याविषयावरचा अग्रलेख लिहून ठेवलेला बरा असे म्हणत त्यांनी संपादकांना (पक्षी : राऊत, गणपतीवाले) दूरध्वनी लावला.
साबडे दूरध्वनीवरून बोलत होते त्यावेळी खांडेकरसुद्धा त्यांच्या दूरध्वनीवरून बोलत होते. खास विलासरावांची खास शिकागोहून खास मुलाखत घेतल्यानंतरचे बहुत सुकृतांची जोडी असे खास भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ते पाहून डेस्कवरल्या तमाम उपसंपादकांच्या मनात, विलासराव मुंबईत आल्यानंतर जे सांगणारच होते, ते ऐकण्यासाठी अमेरिकेत "एसटीडी' करून पैसे वाया घालविण्याची खरेच आवश्‍यकता होती का, असा "मटा कौल' तरळत होता. पुन्हा खास विलासरावांनी खास मुलाखतीत असे काय खास सांगितले हा "आजचा प्रश्‍न' होताच. बहुत सुकृत दूरध्वनीवर अजूनही बोलतच होते. शेळी शिकागोत नसल्याने ती शिंकल्याचे अद्याप त्यांना कळायचे होते.

लोकसत्तात मात्र वेगळी परिस्थिती होती. साथी समरसेन यांची कॉपी केव्हाच तयार होती. उपसंपादकांच्या टेबलावर ती आपटून ते आपल्या आताच झोपेतून उठल्यासारख्या आवाजात खडसावत होते, ""आता वृत्तांतमध्ये टाकून तिची वाट लावू नका. पहिल्या पानावर घ्या. संपादकांशी (पक्षी : कुमार केतकर, एनआरआय एडिटर, लोकसत्ता) बोललोय मी.''
उपसंपादकाने कॉपी पाहिली. हेडिंग होतं, ""शेळी जाते जिवानिशी आणि नेते म्हणतात शिंकली कशी?'' त्याने कॉपीवरून झरझर नजर फिरवली. दुष्काळ, गहू, चे गव्हेरा, साखर, शिंक, दूध, जयप्रकाश, लोहिया, शेळी, मायावती असे बरेच काही नेहमीचे त्यात असल्याचे पाहून "हॅ यात काय विशेष?' असे त्याला वाटले. मात्र या पोलिटिकल बातमीत चे गव्हेरा या गव्हावरच्या रोगाचा उल्लेख कशासाठी? हे काही केल्या त्याला समजेना. मग त्याने ती कॉपी तशीच कंपोझिंगला सोडली.

सकाळची सकाळ अजून उजाडायची होती. मुख्य वार्ताहर पद्मभूषण यांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम भुजबळसाहेबांना वेकअप कॉल लावला. मग संगमनेरला दूरध्वनी केला. राज्यात सर्वत्र आलबेल असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी बेलापूरला संपादकांच्या घरी दूरध्वनी केला व राजधानी मुंबईत आज काही विशेष नसल्याचे शुभवर्तमान दिले. तोवर मृणालिनी नानिवडेकरांचेही (प्रतिनिधी, सकाळ न्यूज नेटवर्क, सकाळचे सावत्र भावंड, केअर ऑफ उत्तम कांबळे, नाशिक) नागपूरशी बोलणे झाले होते. मग त्यांनी नेहमीप्रमाणे भ्रमणध्वनीवरून दूरध्वनीमागोमाग दूरध्वनी करण्यास सुरूवात केली. कुठून तरी त्यांना समजलेच की शेळी शिंकली. मग पुन्हा त्यांनी भ्रमणध्वनीवरून दूरध्वनीमागोमाग दूरध्वनी करण्यास सुरूवात केली. त्यावर त्यांना पुन्हा समजले की शेळी शिंकली. अखेर त्यांनी नासिक(!)च्याच आरोग्य विद्यापीठाला व राहुरीच्या कृषी महाविद्यालयाला दूरध्वनी लावला. पाणी घालून दोन कॉलम होईल एवढा मजकूर जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर त्या चार कॉलमी ललितवृत्त लिहिण्यास बसल्या.

त्यांची बातमी लिहिणे सुरूच असताना मधु कांबळे ठाणे श्रीस्थानकात पोचले होते. रात्री आठपर्यंत कोणता ना कोणता कक्ष अधिकारी आपणांस याविषयीची माहिती देईलच याची खात्री असल्याने ते तसे आरामात होते.
मंत्रालय, विधान भवन, आमदार निवास, वृत्तपत्रांची कार्यालये यांत शेळीच्या शिंकेची चर्चा सुरू असताना तिकडे धारावीतल्या झोपडपट्टीत, घाटकोपर-भांडुपच्या चाळींमध्ये, मलबार हिल-जुहूच्या बंगल्यांमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणेच चालले होते. लोकल खच्चून भरून धावत होत्या. रस्ते, दुकाने फुलून गेली होती. विमानांची उड्डाणे सुरळीत होती. बारामतीतील काटेवाडीमध्ये, लातूरच्या बाभूळगावात, सांगलीच्या भिलवडी-वांगीतही सगळे नेहमीप्रमाणेच चालले होते. पाऊस पडत होता, शेतकरी आत्महत्या करीत होते, दरोडे पडत होते आणि शेळी साधे पडसे झाल्याने शिंकत होती...

आजकाल शेळीची शिंकही केवढी मोठी बातमी होऊ शकते याचा तिला पत्ताही नव्हता.

No comments: