Saturday, March 22, 2008

लेले आणि मी

"तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजत असलात, तरी तुम्ही एक नंबरचे गाढव आणि घोडे आहात, विसोबा!''

शेजारचे लेले रोज सकाळी आपला म.टा. वाचून झाल्यानंतर "लोकसत्ता' घेऊन जायला डॉक्‍टर टिकेकरांकडे जात. आज त्यांनी आमच्याकडे कशी वाकडी वाट केली आणि तेही इतकी फणफणत हे काही आम्हांला उमजले नाही. मग लक्षात आले, की डॉक्‍टर आता महाराष्ट्राचे राहिले नाहीत. एशियाटिक झालेत! पूर्वी ते आणि लेले असा दोन निवृत्तांचा टिचकीसंवाद चालायचा. परंतु आता एशियाटिकमध्ये बऱ्याच शस्त्रक्रिया करायच्या असल्याने, बऱ्याच जणांना "टाटा' करायचा असल्याने डॉक्‍टरांकडे लेलेंना देण्यासाठी वेळ नसणार. आम्ही तसे रिकामे. त्यामुळे लेलेंनी आज त्यांची पायधूळ आमच्या खाटेवर झाडली असावी.

"बरोबर आहे लेले तुमचं. आम्ही दोन्हीही आहोत. खेचर! पण तुम्हांला सकाळी-सकाळी एवढं चिडायला काय झालं? आज मटाऐवजी सामना वाचलात काय?''
"चिडू नको तर काय? तुम्ही हे जे उद्योग चालवलेत त्याने सगळे खुश आहेत असं वाटलं काय तुम्हांला?''
"कोणते उद्योग लेले?''
"भिंतीला तुंबड्या लावण्याचे!... अहो विसोबा, आम्हांलाही कळतात बातम्या म्हटलं. आता तुम्ही दैनिकाचं काम पाहात नाही. त्यामुळे रिकामा वेळ भरपूर. तेव्हा सुचतात असे काही भंकस उद्योग, याच्या-त्याच्या टोप्या उडवायचे. कुणाला गणपतीवाले म्हणता, कुणाला एनआरआय एडिटर! कुणाच्या नावाने काहीबाही गाणी लिहिता, कविता करता. पेपरांवर टीका करता. ही काही सभ्य माणसाची लक्षणं नाहीत!''
"लेले, अहो, ती एक निर्विष भंकस असते. ती एवढी मनावर घ्यायची नसते. कोणी घेतही नसेल म्हणा... पण तुमचे कलंदर, टिचकीबहाद्दर, झालंच तर आताचे सूर्यभट्ट, चकोर, तंबी दुराई, विनोदी पक्षनेता, स्वतःचा नावपत्ता सांगत परत टोपणनावाने लिहिणारा मामू हे लोक राजकारणी, नट-नट्या, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर लिहितात ते मात्र तुम्हांला चालतं! आणि आम्ही पत्रकारांबद्दल लिहिलं तर तुम्हांला राग येतो, याला काय म्हणायचं? हे म्हणजे आमच्या हिंदुहृदयसम्राटांप्रमाणे झालं! ते कुणालाही काहीही म्हणणार. त्यांना कोणी काही म्हटलं तर मात्र कचेऱ्या तोडणार! हे वागणं तुम्हांला तरी पटतं का लेले?''
"ते वेगळं आणि हे वेगळं. तुम्हांला आपलं चांगलं काही दिसतच नाही.''
"तसं नाहीये लेले. आजकाल मटासुद्धा आम्हांला आवडायला लागलाय. खूपच बदललाय तो! लोकसत्ताचं एडिट आणि ऑपेड पेज वाचलं नाही तर चुकल्यासारखं होतं आम्हांला. लोकमतची रविवार पुरवणी, सकाळचे जागर, मुक्तपीठसारखे वेगळे उपक्रम... भावतं आम्हाला हे सारं. पण लेले, हैदराबादला स्फोट होऊन चाळीसेक माणसं मेल्याची बातमी देताना "हादराबाद' असं थिल्लर हेडिंग देण्याचा "मट्ट'पणा कोणी केल्यावर मग भंकसशिवाय करणार काय?''
"म्हणजे तुम्ही आता सगळे पेपर सुधारायला निघालात म्हणा की! तुम्ही स्वतःला समजता तरी कोण म्हणतो मी!''
"लेले, प्रश्‍न तो नाही. प्रश्‍न हा आहे की आम्ही सगळे मिळून स्वतःला, म्हणजे प्रिंट इंडस्ट्रीला काय समजतो?''
"मी नाही समजलो!''
"असं बघा, आम्ही पेपरवाले त्या चॅनेलवाल्यांना किती झोडून काढत असतो...''
"मग झोडायला नको? अगदी ताळतंत्र सोडलाय त्यांनी. किती अतिरंजित आणि भडकपणाने दाखवतात हो सगळं. पाहावत नाही. दिवसभर आपलं तेच ते दळण. परवा ऐश्‍वर्या गर्भारशी आहे की नाही याची समीक्षा चालू होती. नशीब तिचे सोनोग्राफी रिपोर्ट दाखवले नाहीत! हल्ली मी बातम्यासुद्धा एकट्यानेच पाहतो. आजुबाजूला नातवंडं असली की अवघडायला होतं हो!''
"मराठी पेपरांत तेवढं होत नाही अजून! पण आम्हीही चॅनेलवाल्यांच्या फार मागे नाही आहोत, लेले. ही ही रंगीत पानं, रंगीत मोठमोठे फोटो, ग्लॉसी पुरवण्या, त्यांचे विषय सगळंच चॅनेल्सच्या वळणावर चाललेलं आहे. तिकडं लाफ्टर चॅलेंज असतं, तर इकडं हास्यरंग. तिकडं सिरियल्स असतात, तसं इकडं "तू सुखी राहा'सारख्या क्रमशः कादंबऱ्या. तिकडं कुकरी शोज तर इकडं पाककृती. तिकडं बातम्यांमध्ये विनोद करायला लागले, तर इकडे पहिल्या पानावर विनोदी लेख बातम्या म्हणून यायला लागले. इकडं मटा-लोकसत्ता असेल तर तिकडं आयबीएन असतो. इकडं वार्ताहर-संध्यानंद तसा तिकडं इंडिया टीव्ही-आजतक.... एकूण काय, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी! आणि वर आम्ही त्यांना पत्रकारितेचा धर्म शिकवणार. ही भोंदूगिरी नाही वाटत तुम्हांला?''
"भोंदूगिरीचं माहित नाही. पण विसोबा, तुमचं ऐकल्यावर असं वाटू लागलंय की त्या जशा वृत्तवाहिन्या तशाच तुमच्या या पत्रवाहिन्या! आहे काय आणि नाही काय!!''

No comments: