Friday, April 18, 2008

राजा भिकारी, माझी बातमी "फिरवली'!

काही दिवसांपूर्वीची गोष्ट.
दूरवरून ढोल-ताशांचा आवाज येत होता.
म्हटले, की दह्यकाल्याचो उत्सौ आलाय. कुठे गोपिकांची तर प्रॅक्‍टिस चालू नसेल ना! पाह्यला हवे! म्हणून मजल-दरमजल करीत निघालो, तर काय! लालबागेतल्या वार्ताहरच्या कचेरीत आनंदीआनंद गडे साजरा केला जात होता. मनीं म्हटले, कुणाचा हॅप्पी बर्थडे तर नाही ना इथे? महाराष्ट्र टाइम्सपासमध्ये तर वाचल्याचे स्मरत नाही.
मनीं आले, आयुष्यात एकदा तरी मटामध्ये आपला वाढदिवस छापून आला पाह्यजे! म्हणजे कसे जन्माला आल्याचे सार्थक होईल! पण हे चिंतन बाजूला सारून आम्ही प्रस्तुत कामामध्ये लक्ष घातले, की वार्ताहर का बरे आनंदले आहे?
मनीं आले, कोणत्याही मराठी दैनिकांत दोनदाच खराखुरा आनंदोत्सव साजरा केला जातो, एकदा पगारवाढ झाली की आणि दुसऱ्यांदा... पगारवाढ झाली की! असेच काही आक्रीत नसेल या पत्रात घडले?
या विचाराने आम्ही सरळ आत गेलो, तर फाटकावरील दरवानाने हटकले, ""अबी काम नय है यहॉं. सब पेपर ठोकनेवाले भर गये!''
मनीं आले, आम्ही चेहऱ्यावरून एवढे का बिजले दिसतो?
तरीही मनी श्रेष्ठ धारिष्ट्य धरून आम्ही म्हणालो, ""आम्हांस काम नको! आयुष्यात ते कधी करावे लागू नये म्हणून तर मित्रा आमची सर्वांची खेचरगिरी सुरू असते संपादक होण्याची! तू फक्त आमची एवढीच उत्सुकता शमव, की हे ढोल-ताशे आणि नगारे का बरे वाजत आहेत?''
त्यावर त्या चहाटळ दरवानाने आमच्याकडे अशी नजर टाकली, की मनीं आले, आम्ही चेहऱ्यावरून सुभाष झासुद्धा दिसतो की काय?
"उत्सुकता शमव' या शब्दप्रयोगाचा हा परिणाम असावा! शिवाय त्यात तो दरवान म्हणजे वार्ताहर आणि चौफेरच्या बातम्यांवर वाढलेला जीव! जीव घेऊन आम्ही तेथून सटकलो, ते थेट शिवाजीरावांच्या समोरच येऊन आदळलो.

क्रिकेटमहर्षी शिवाजीराव सावंत. मटाच्या वृत्तसंपादकपदी होते, तेव्हाचे शिवाजाराव आणि आताचे शिवाजीराव, एक वय सोडले तर तसूभरही फरक नाही. मनीं म्हणालो, काय सांगावे, जाकिटसुद्धा तेच असेल... मटाच्या सेंडऑफ पार्टीत घातलेले!
त्यांना आदरयुक्त प्रणिपात करून आम्ही वदलो, ""सलाम आलेकुम सावंतसो! मनीं शंका घेऊन आलोय, की हा उत्सौ कशाचा मनवता आहात तुम्ही?''
त्यांनी आधी टेबलावरील वृत्तपत्रांचे चघाळ गोळा केले. मग शिपायास सौहार्दपूर्ण साद दिली. त्याच्या हाती त्या चघाळातील काही वृत्तपत्रे दिली, व म्हणाले, ""बाहेर उपसंपादकांना द्या आणि सांगा, की खुणा केल्यात तेवढ्याच बातम्या फिरवा. मराठीचं काही अडलं तर मला विचारायला या. डिक्‍शनरी पाहात बसून वेळ घालवू नका. काय?''
सुपारीचे खांड तोंडात सारत त्यांनी सराईत "मटाईता'प्रमाणे राऊंड दी विकेट चेंडू टाकला, ""विसूमियॉं, आजचा दिवस वार्ताहर ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिन आहे! तुम्हांस आमची संस्कृती व परंपरा माहितच असेल...''
"हो...'', आम्ही ज्ञानदिवा पाजळला, ""शतकाची परंपरा आहे वार्ताहरला. म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळीसुद्धा वार्ताहर निघत होता...''
"लाहौल विलाकुवत! साफ गलत!'' आमचा त्रिफळा.
"विसूमियॉ, तो फुल्यांच्या काळातला वार्ताहर वेगळा. आमचा हा ट्रिपलफुल्यांवाला वार्ताहर!... आमच्याकडे किती वार्ताहरी आहेत ठाऊक आहे का?''
"नाही.'' आमचा ज्ञानदीप मघाच विझला होता.
"सगळ्या मराठी-इंग्रजी दैनिकांचे असतील, तेवढे सगळे वार्ताहर आमचे! शिवाय आमचे असे वेगळेच! म्हणजे सगळ्यांहून जास्त वार्ताहरी व हरिणी आमच्याच!''
शिवाजीरावांचा हा स्कोरबोर्ड आमच्या मेंदूत जाम जाईना!
"झापड मिटा विसूमियॉं! अहो, आम्ही सगळ्याच दैनिकांच्या बातम्या फिरवून छापत असतो. तेव्हा त्यांचे ते आमचेच नाही का झाले?''
आम्ही मनीं म्हणालो, अच्छा, तर ही संस्कृती आहे होय येथे? म्हणजे तिलाही शतकांची परंपरा आहेच की! पहिले ज्ञात मराठी पत्र म्हणजे "मुंबई अखबार'. त्यातही प्रातोप्रांतीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या फिरवून घेतल्या जात असत. तेच त्यांचे बातम्यांचे प्रमुख साधन होते, असे लेल्यांचा इतिहास सांगतो!
आम्ही फ्रंटफूटवर जाऊन विचारले, "पण त्यात काय येवढा आनंद मानायचा?''
"आनंद त्याचा नव्हे, विसूमियॉं. आनंद याचा आहे, की पह्यल्यांदाच एका बड्या मराठी दैनिकाने आमची बातमी फिरवून छापली आहे. तीही पहिल्या पानावर! मुंबैत फ्लायर म्हणून! पुण्यात अँकर म्हणून! म्हणून आमचे लोक खुश आहेत.''
शिवाजीरावांच्या या बाऊन्सरने आम्ही गारदच झालो.
पाहतो तो खरेच की तेथील एक वार्ताहरिणी गुणगुणत होती : राजा भिकारी, माझी बातमी फिरवली!
"छे छे! तुमची काही तरी गफलत होतेय. असे होणे शक्‍यच नाही. आता लोक उचलतात आंग्ल दैनिकांतल्या बातम्या. पण तेवढे चालतेच ना! बिच्चारे वार्ताहरी आणि वार्ताहरिणी रोज रोज कुठून आणणार बरे नव्या नव्या बातम्या?... आणि समजा चोरल्या अन्य दैनिकांतल्या बातम्या, तरी त्यात शर्मो-हया वाटण्याचे काय कारण? त्यांचा उद्देश तर निर्मल, कोमल, मंगल असाच असतो ना?... वाचकांचा माहितीचा अधिकार जपण्याचा!..''
आमच्या या बॅटिंगनंतर शिवाजीरावांनी एक तुच्छतादर्शक पॉज घेतला.
जरा खुर्चीवर रेलले आणि मग म्हणाले, ""हेच तर आम्हीही म्हणतोय ना केव्हापासून, तर आम्हांला तुम्ही फालतू समजता! तेव्हा आता विसूमियॉं चला, आपण सगळी वृत्तपत्रे मिळून हेच म्हणू या! आपण सगळे एकाच माळेचे मणी होऊ या!!''

शिवाजीरावांचे हे स्लेजिंग होते किंवा कसे, याचा निर्णय आम्हाला अजून घेता आलेला नाही...

---------------------------------------------------
स्वाध्याय -
1) वार्ताहरचा सोमवार, दि. 6 ऑगस्ट 2007चा अंक मिळवून, त्यातील पहिल्या पानावरील "एक कोटीची झोपडी' या मुख्य बातमीची उचलेगिरी करणारे वृत्तपत्र कोणते याचा शोध घ्या व आपले उत्तर 4321वर एसेमेस करा.
2) अशाच प्रकारची बातम्यांची उचलेगिरी मिरर, हिंदुस्तान टाईम्स आदी आंग्लपत्रांतही चालते का, याचा "डोळस'पणे शोध घ्या व ती माहिती आपल्या संपादकांना देऊन शाबासकी मिळवा.
3) फिरवलेल्या बातम्यांखाली "अनुवादित', "स्वैर रूपांतर', "भाषांतर', "परकीय कल्पनेवरून' असे छापावे काय, यावर वृत्तसंपादकांशी चर्चा करा.

No comments: