Wednesday, June 4, 2008

सुसंगती सदा घडो, सुजनवृत्त कानी पडो...

हाथरूणात उन्हे शिरली अन्‌ आम्ही उठलो. हाती मशेरी घेतली. दूरचित्रवाणीसंच लाविला. आमची आवडती वाहिनी म्हणजे इंड्या टीव्ही! रामसे बंधु पिक्‍चरवाले, "नगिना'कार हरमेश मल्होत्रा, डेव्हिड धवन प्रभृतींना एकसमयावच्छेदेकरून पाहण्याचे भाग्य आम्हांस तेथे लाभते! आताही प्रातःसमयी तेथे ब्रेकिंग न्यूज सुरूच होती. - "नागिन से शादी!'
ते पाहताच आम्ही चमकलोच! मुदपाकखान्यात नजर टाकिली. मनीं म्हटले, असे कार्येक्रम आपण पाहतो हे आत समजले तर गहजब व्हायचा! ही वृत्तवाहिनी खरे तर लेट नाईटच पाहावी!
त्या सरीसृपवंशीय प्राण्यांच्या वैवाहिक आयुष्याचा राष्ट्रभाषिक हैदोसदुल्ला जोरात सुरू होता. मनीं म्हटले, एखाद्याला नागिण हीच जर त्याची राखी सावंत वाटत असेल, तर आपण बातमी देण्यापलीकडे काय करणार?
ते भूतां परस्परे जडलेले मैत्र जीवांचे एका डोळ्याने अवलोकितानाच दुसऱ्या डोळ्याने आमचे वृत्तपत्रवाचनही सुरू होते. हे आम्ही खास कमावलेले योगसामर्थ्य! कचेऱ्यांतील राजकारणात बहुउपयोगी! एक डोळा संगणकाच्या पडद्यावर, दुसरा संपादकांच्या केबिनमध्ये कोण जाते-येते यावर, या सवयीच्या योगे हे सामर्थ्य प्राप्त होते!
असो. मशेरी लावताना आम्ही नेहमीच असे भरकटतो!

तर मुद्दा असा, की येणेप्रकारे आमचे पाहणे व वाचणे व लावणे सुरू असताना अचानक आमच्यासमोर कुंद काही धुरकटले! दृष्टी उर्ध्वात गेली! मेंदूला पहिल्याच पेगात येतात तशा मुंग्या आल्या! आणि...
... आणि समोर शनिवारवाड्याची मागची बाजू अवतरली. सकाळवाड्याच्या भव्य नेपथ्यावरील नाट्य आमच्या चर्मचक्षुंसमोर उलगडू लागले. पाहतो तो समोर साक्षात्‌ संभाजी महाराजांचा पार्टी!
तोच गोरापान चेहरा. तोच कपाळावरून मागे सरकलेला कुरळा कोंबडा. तीच सरळ नासिका. तेच लालचुटूक ओठ. त्यावर तेच खिरे-खुरे उद्वेगी हास्य! डिट्टो कॉन्वहर्जन्सकेसरी!!
पाहता पाहता त्यांनी कंसात लेखणी उपसून स्वगत सुरू केले. -
""मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना? वडवानलाने समुद्र तर प्राशन केला नाही ना? लोकमतचा सेल तर वाढला नाही ना? मग आम्हीच का बरे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मागे लागून अनावश्‍यक आणि अतिरंजित वृत्तांकन करावे? निघेल तेव्हा निघेल. पण आम्ही आमची वाहिनी काढू आणि तिच्या मागे लागू!... नाही आबासाहेब, नाही. यापुढे पहिल्या पानी आम्ही अनावश्‍यक आणि अतिरंजित बातम्या कदापि छापणार नाही...''

अचानक नभोवाणी व्हावी तसा आवाज आला - "अहो दात घासताय की मोरी? किती वेळ लावताय?' ही आमची औरंगजेब. तिच्या त्या नर्मकर्कश प्रेमकुजनाने आमच्या नजरेसमोरील धुंद एकदम दूर झाले.
चूळ भरता भरता आमच्या लघुगुरू अशा दोन्ही मेंदूंनी आम्ही विचार करू लागलो.
आपण भल्यासकाळी असे कोंडुऱ्यात कसे सापडलो? मशेरी जास्तच कडक होती की पेपरातच काही गारूड होते?
म्हणून पुन्हा ते पत्र हाती घेतले. तर त्याच्या पहिल्याच पानी एक चौकट. - "... या प्रकारच्या (पक्षी ः अनावश्‍यक आणि अतिरंजित) वार्तांकनापासून दूर राहण्याचा निर्णय "सकाळ'ने घेतला आहे; त्यामुळे गुन्हेगार ठरविलेल्या संजय दत्तबाबतच्या बातम्या आतील पानात प्रसिद्ध करण्याचा निर्णय "सकाळ वृत्तपत्र समुहा'ने घेतला आहे. - कार्यकारी संपादक.'

मुंबै सकाळमधील ही चौकट वाचून आम्हांस अगदी गदगदून आले!
श्‍वासनलिकेत हुंदका दाटला! पापण्यांचे केस ओलावले!
केवढी ही विधायकता!
केवढी ही वाचकाभिमुखता!
केवढी ही निरागसता!!

योग्य आणि बरोबरच आहे त्यांचे!
काय म्हणून सभ्य-सुसंस्कृत विधायक वाचकांनी वाचायच्या त्या तुमच्या गुंडा-पुंडांच्या बातम्या, पुढाऱ्यांचे कलगीतुरे, नट्यांचे नखरे, भामट्यांच्या भानगडी अन्‌ कुलंग्यांची कुलंगडी?
हाच कित्ता सर्व वृत्तपत्रांनी गिरविला तर...?

आणि आम्हांस विविध वृत्तपत्रांची निरागस गोंडस स्वच्छ सुंदर आवश्‍यक व नरंजित बातम्यांनी विनटलेली पहिली पाने दिसू लागली.
अहाहा! ओहोहो!!
काय ते पेपर, काय ती पाने...
कोरी करकरीत!!!
फक्त जाहिराती.
त्याही केवळ वुडवर्डस्‌ ग्राईपवॉटरच्या!
""काय झाले? बाळ रडत होते...
अगं मग त्याला दोन थेंब पगारवाढ का देत नाहीस?
तू उपसंपादक असताना तुलाही मी हेच दिले होते...'' अशा.

पण स्वप्ने कशास पाहावयाची?
आजचेच वास्तव पाहा ना!
मुंबै सकाळच्या पहिल्या पानावर आहेत फक्त आवश्‍यक व नरंजित बातम्या.
नक्षलवादी जेरबंद, मित्राकडून हत्या, संप अटळ....
अहाहा! ओहोहो!
किती धोरण-सुसंगत! किती विधायक!

आमच्या (व सर्क्‍युलेशन मॅनिजरांच्या) मनीं आले, ही अशीच सुसंगती सदा घडो, सुजनवृत्त कानी पडो!
तथास्तु!!

No comments: